छायाचित्र

शिंगचिएन काओ : (जन्म : ४ जानेवारी १९४०). नोबेल पारितोष‍िक प्राप्त पहिले चिनी लेखक, नाटककार आणि चित्रकार. चीनमधील च्यांगशी प्रांतातल्या कानचौ गावी जन्म. वडील बँकेत कारकून तर आई वाय.एम.सी.ए. (‘यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन’) ची सदस्या आणि जपानविरोधी नाट्यचळवळीत सक्र‍िय होती. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांचे कुटुंब नानचिंग मध्ये स्थायिक झाले. लहानपणापासूनच आईमुळे त्यांना कलेची आणि विव‍िध भाषांची गोडी लागली. पुढे त्यांनी बीजिंगमधून फ्रेंच भाषेत पदवी घेतली आणि एका आंतरराष्ट्रीय पुस्तकांच्या दुकानात काम करू लागले.

चीन मधील सांस्कृतिक क्रांतीने काओ शिंगचिएन यांच्या व्यक्तिमत्त्वावर, जीवनदृष्टीवर आणि साहित्यिक जाणिवांवर अत्यंत खोल परिणाम केला. चिनी सरकारच्या संशयाचे लक्ष्य ठरलेल्या काओ यांना ग्रामीण भागातील पुनर्शिक्षण छावण्यांमध्ये पाठविण्यात आले, जिथे त्यांनी अनेक वर्षे कठोर परिश्रम केले. या अनुभवांनी त्यांच्या साहित्याला वैयक्तिक स्वातंत्र्य, भीती आणि मानवी अस्तित्वाच्या प्रश्नांची तीव्र जाणीव करून दिली. “वैचारिक स्वातंत्र्य आणि सर्जनशीलता दडपून टाकण्याच्या त्या भयानक काळात, छळ होईल या भीतीने मी तेव्हा स्वतःची अनेक हस्तलिखिते फाडून-जाळून टाकली,” असे ते सांगतात.  या काळाचे प्रभावी चित्रण त्यांनी ‘एका माणसाचे बायबल’ ‘ई क रन त शंगचिंग’ (इं. भा. : One man’s Bible) या १९९९ साली प्रकाशित कादंबरीत केले आहे. या साहित्यकृतीत सांस्कृतिक क्रांतीच्या काळातील मानवी जीवनातील ताण, विस्थापन आणि मानसिक आघात यांचे वास्तववादी दर्शन घडते.

१९८०च्या दशकाच्या सुरुवातीला, ते चीनच्या साहित्य आणि नाट्यवर्तुळात सक्र‍िय झाले. त्यांच्या नाटकांवर पारंपरिक चिनी ऑपेरा (संग‍ीत‍िका), लोकसंस्कृती तसेच विसाव्या शतकातील यूरोपीय नाट्यविचारांचा प्रभाव दिसून येतो. काओ यांची ओळख करून देणारी पहिली लघुकादंबरी ‘हान ये च्चुंग द शिंग च्छन’ (इं. भा. : Stars in the Cold Night) ही १९७९ मधे प्रसिद्ध झाली. मात्र त्यांच्या अनेक साहित्य तथा नाट्यकृतींना चिनी सत्ताधाऱ्यांनी व्यवस्थाविरोधी आणि वादग्रस्त मानले. १९८७ मध्ये त्यांनी स्वतःला “पूर्व आणि पश्चिम संस्कृतींच्या संगमबिंदूवर उभा असलेला लेखक” असे संबोधले. परंतु त्यांच्यावरील टीका आणि राजकीय दबाव वाढत गेल्याने त्यांनी फ्रान्समध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. १९८९ साली थिएनआनमन स्क्वेअर मधील विद्यार्थ्यांचे आंदोलन खोडून काढण्यात आले. त्या घटनेचा निषेध नोंदवत त्यांनी चीनची नागरिकता सोडून दिली आणि कायमचे फ्रेंच नागरिक बनले. (१९९७)

काओ हे कोणत्याही एका पठडीत बसणारे लेखक कधीच नव्हते. त्यांनी चिनी ताओवाद, बौद्ध चिंतन, चिनी लोकपरंपरा आणि यूरोपियन आधुनिकतावाद यांचा संगम घडवून स्वतःची स्वतंत्र लेखन शैली निर्माण केली. तरी देखील त्यांच्या कादंबरी आणि कथा साहित्यावर १९व्या शतकातील जर्मन-ज्यू लेखक, फ्रांट्स काफ्का (१८८३-१९२४) यांचा खोल प्रभाव जाणवतो. एकाकीपण, परकेपण, विसंगती आणि एका विचित्र व्यवस्थेत अडकून पडणे, या भावना त्यांच्या साहित्यात ठळकपणे दिसून येतात, ज्या काफ्कासदृश वाटतात. त्यांच्या नाटकांवर देखील विसाव्या शतकातील आयरिश नाटककार सॅम्युएल बेकेट (१९०६ – १९८९) ह्यांचा प्रभाव जाणवतो. तुटक संवादरचना, अत्यल्प रंगमंचीय मांडणी, या गोष्टी त्यांनी बेकेटकडून घेतल्या असव्यात. त्यांच्या ‘Bus Stop’ नाटकाची तुलना अनेकदा बेकेटच्या ‘वेटिंग फॉर गोदो’ (१९५४) या नाटकाशी केली जाते. दोन्ही नाटकांमध्ये अंतहीन प्रतीक्षा आणि अनिश्चिततेमध्ये अडकलेल्या व्यक्तींचे चित्रण केलेले आहे.

काओ यांची सर्वाधिक गाजलेली कादंबरी ‘लिंग शान’ ( १९९०, इं. भा., Soul Mountain). ही कादंबरी आत्मशोध, आठवणी, निर्वासन, मानवी स्वातंत्र्य, लोकसंस्कृती आणि अस्तित्वाच्या प्रश्नांचा शोध घेणारी बहुपर्यायी साहित्यकृती मानली जाते. या कादंबरीची कथा एका सामान्य माणसाभोवती फिरते. गंभीर आजार झाल्याची चुकीची वैद्यकीय माहिती मिळाल्यानंतर तो आपल्या जीवनाचा आणि अस्तित्वाचा अर्थ शोधण्यासाठी चीनच्या दक्षिण-पश्चिम भागातील दुर्गम पर्वतीय आणि आदिवासी प्रदेशांत प्रवासाला निघतो. या प्रवासात त्याला विविध लोकसंस्कृती, लोककथा, धार्मिक श्रद्धा, प्राचीन परंपरा आणि निसर्गाशी जवळीक असलेले जीवन अनुभवायला मिळते. प्रवास जसजसा पुढे सरकतो, तसतसे बाह्य जगाचे वर्णन अंतर्मनाच्या शोधात रूपांतरित होते. ही कादंबरी अंशतः आत्मचरित्रात्मक स्वरूपाची आणि प्रायोगिक शैलीतील साहित्यकृती आहे.  काओ यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर करताना या कादंबरीचा विशेष उल्लेख करण्यात आला होता. कारण त्यांना दिला गेलेला नोबेल पुरस्कार हा कोणत्याही एका साहित्यकृतीसाठी नसून, त्यांच्या संपूर्ण साहित्यिक कार्यासाठी देण्यात आला होता. त्यांच्या कलेचे वर्णन करतांना, नोबेल समितीने, “वैश्व‍िक मान्यता, तीक्ष्ण अंतर्दृष्टी आणि भाषिक चातुर्य यांनी नटलेले साहित्य,” असे केले आहे. काओ शिंगचिएनच्या लिखाणामुळे, ‘चिनी साहित्यासाठी नवीन दालने खुली झाली आहेत’, असेही त्यात म्हटले आहे.

लु श्युन (१८८१-१९३६) किंवा मो यान (१९५५) यांच्याप्रमाणे काओ भारतात सर्वसामान्य वाचकांमध्ये परिचित नाहीत. परंतु भारतीय अभ्यासक, रंगकर्मी, अनुवादक आणि जागतिक साहित्याचे गंभीर वाचक, यांच्या वर्तुळात त्यांचे साहित्य आशियाई आधुनिकतावादाचे प्रतीक मानले जाते. त्यांची Soul Mountain ही कादंबरी भारतीय वाचकांना भावली. आत्मशोध, आणि आध्यात्मिकवेधाचा प्रवास दाखवणारी ही कादंबरी भारतीय साहित्याशी जवळीक साधून जाते. काही अभ्यासक काओंच्या साहित्याची तुलना निर्मल वर्मा (१९२९ – २००५), अज्ञेय (१९११- १९८७) आणि ओ.व्ही. विजयन (१९३०-२००५) यांच्या चिंतनशील लेखनाशी करतात. भारतीय प्रयोगशील रंगभूमी  आण‍ि काओंच्या नाटकांमध्ये वास्तववादाचा आणि अत्यल्प नेपथ्य रचनेचा वापर हे साधर्म्य जाणवते. काओ ह्यांना २००० साली नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर अनेक भारतीय विद्यापीठांमध्ये त्यांच्या साहित्याचा गंभीर अभ्यास सुरू झाला. आशियाई साहित्य, रंगभूमी अभ्यास अशा अभ्यासक्रमांमध्ये त्यांच्या साहित्याचा समावेश होऊ लागला. चीनविषयी केवळ राजकीय दृष्टिकोनातून नव्हे, तर आधुनिक चिनी साहित्याच्या दृष्टीने विचार करण्यासही त्यामुळे चालना मिळाली.

काओ यांच्या लेखनात तत्त्वज्ञान आणि दृश्यकलेचा सुंदर संगम दिसून येतो. विसाव्या शतकातील चीनमधील राजकीय उलथा-पालथीचा, तसेच सांस्कृतिक क्रांतीचा, खोल प्रभाव त्यांच्या प्रत्येक कलाविष्कारात पाहायला मिळतो.  साहित्य आणि रंगभूमीबरोबरच काओ हे प्रसिद्ध चित्रकार देखील आहेत. त्यांच्या चित्रांमध्ये चीनच्या शाई चित्रशैलीचा प्रभाव दिसून येतो. त्यांच्या सर्व कलाप्रकारांना वेगळेपणा देणारी गोष्ट म्हणजे, त्यांचा कलात्मक स्वातंत्र्यावर असलेला ठाम विश्वास होय. काओंनी अत्यल्प कादंबरीलेखन करूनही, त्यांचे लेखन जागतिक साहित्यात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ८६ वर्षांचे काओ, विविध कलाक्षेत्रांत अजूनही सक्रिय आहेत.

संदर्भ :

समीक्षक : सानिया कर्ण‍िक