बक, लिंडा : (२९ जानेवारी १९४७). अमेरिकन शास्त्रज्ञ. त्यांना रिचर्ड अॅक्सल यांच्यासह २००४ मधील गंध संवेदना ग्रहण विषयीच्या संशोधनासाठी शरीरक्रियाविज्ञान वा वैद्यकशास्त्र विषयाचे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.
बक यांचा जन्म अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातील सिॲटल शहरात झाला. त्यांनी मानसशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र विषयात वॉशिंग्टन विद्यापीठातून विज्ञानातील बी. एस. पदवी प्राप्त केली (१९७५). पुढे त्यांनी रोगप्रतिक्षमता या विषयात टेक्सास विद्यापीठाच्या साउथ वेस्टर्न मेडिकल सेंटरमधून पीएच.डी. पदवी संपादन केली (१९८०). कोलंबिया विद्यापीठ आणि न्यूयॉर्क शहरात त्यांनी पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणूनही काम केले. कोलंबिया विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्चच्या प्रयोगशाळेत १९८२ पासून त्यांनी रिचर्ड ॲक्सल यांच्यासह संशोधनाला सुरुवात केली. पुढे त्या हॉवर्ड ह्युजेस मेडिकल इन्स्टिट्यूट आणि बॉस्टनमधील चेताजीवशास्त्र विभाग यांत कार्यरत होत्या (१९८४—९१). सिॲटल मधील फ्रेड हचिन्सन कॅन्सर रिसर्च सेंटरच्या सदस्य पदावर कार्यरत होत्या (२००२). पुढील संशोधनासाठी नंतर त्या सिॲटलमधील वॉशिंग्टन विद्यापीठात शरीरक्रियाशास्त्र आणि जीवभौतिकशास्त्र विभागांशी संलग्न झाल्या (२००३).
नाकाच्या अंतस्त्वचेमध्ये गंध संवेदनेशी संबंधित पेशी असतात. त्याच्या पृष्ठभागावरील ग्राहक रेणूना गंधदायक रेणू चिकटले की मेंदूकडे संकेत पाठवले जातात. नंतर मेंदूमध्ये संकेतांचा अर्थ लावला जातो आणि त्यानुसार आवश्यक प्रतिक्रिया दिल्या जातात किंवा पूरक प्रतिसाद दिले जातात. या संशोधनातूनच बक यांना कामगंध (फेरोमोन्स) म्हणजे शरीराबाहेर परिणाम करणाऱ्या संप्रेरकांवर संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली. पुढील संशोधनात त्यांनी कामगंध जगण्याच्या आदिम प्रेरणांशी प्रतिक्षिप्त क्रियांद्वारे कश्याप्रकारे जोडल्या आहेत यावर प्रकाश टाकला. रिचर्ड ॲक्सलसह त्यांनी उंदरांमध्ये गंध संवेदनेशी संबंधित जनुके आणि यावरील कामाचे वर्णन केले. उंदरांमध्ये विविध गंध संवेदी पेशी आणि त्यांद्वारे निर्माण झालेल्या संकेतांचा समन्वय यावर त्यांनी काम केले. उंदीर, माणूस अशा सस्तन प्राण्यांत जवळजवळ एक हजार जनुके केवळ गंध संवेदनेशी, गंध जाणणे, गंध ओळखणे याच्याशी संलग्न आहेत, हे त्यांनी शोधून काढले.

बक यांनी वास आणि चव या दोन संवेदना एकमेकांशी निगडित असतात, हे संशोधनातून सिद्ध केले. माणसासह सर्वच सस्तन प्राण्यांच्या पिल्लांना वासाची संवेदना त्यांच्या जातीच्या प्रौढांपेक्षा जास्त महत्त्वाची असते, हे त्यांनी दाखवून दिले. माणसाना सु. दहा हजार भिन्न प्रकारांचे वास ओळखता येतात. तसेच गंध संवेदना आणि त्या गंधाशी संबंधित अन्य घटना, वस्तू यांची आपला मेंदू सांगड घालतो आणि त्या स्मृती दीर्घ कालपर्यंत टिकून राहू शकतात हेही त्यांनी शोधून काढले.
बक यांना पुढील अनेक मानसन्मान प्रदान करण्यात आले : टाकासागो ॲवार्ड, युनिलिव्हर उद्योगसमूहाचे सायन्स ॲवार्ड, लेविस रोसेनस्टिएल ॲवार्ड आणि कॅनडाच्या गेर्डनर फाउंडेशनचे इंटरनॅशनल ॲवार्ड. त्यांना अमेरिकन असोसिएशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्सचे सदस्यत्व आणि नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसने संस्थेचे सदस्यत्व बहाल करण्यात आले.
बक सिॲटलमधील फ्रेड हचिन्सन कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये अद्यापही कार्यरत आहेत.
कळीचे शब्द : #गंध संवेद ग्रहण, #नोबेल पारितोषिक
संदर्भ :
- https://www.nobelprize.org/prizes/medicine/2004/buck/cv/
- https://www.nobelprize.org/prizes/medicine/2004/buck/biographical/
- https://www.nature.com/scitable/topicpage/gpcr-14047471/
- https://web.archive.org/web/20140810131608/http://superstarsofscience.com/scientist/linda-b-buck
समीक्षक : मोहन मद्वाण्णा