इंग्लंडमधील एक अत्यंत महत्त्वाचा आणि अद्वितीय संरक्षित पाणथळ प्रदेश. इंग्लंडच्या पूर्व भागात असलेला हा प्रदेश प्रामुख्याने प्रशासकीय व ऐतिहासिक दृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या नॉरफॉक काउंटीमध्ये असून त्याचा दक्षिणेकडील काही भाग सफॉक काउंटीमध्ये विस्तारलेला आहे. त्यामुळे याला अधिकृतपणे नॉरफॉक आणि सफॉक ब्रॉड्झ म्हणून ओळखले जाते. ऑक्सफर्ड एन्सायक्लोपीडियानुसार ब्रॉड्झ हा शब्द प्रामुख्याने एखाद्या प्रदेशातील नद्यांच्या प्रवाहामुळे तयार झालेल्या उथळ आणि विस्तीर्ण सरोवरांसाठी वापरला जातो. हा ब्रॉड्झ प्रदेश ग्रेट ब्रिटनचा सर्वांत मोठा संरक्षित पाणथळ भूभाग असून तो इंग्लंडमधील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा अंतर्गत जलमार्ग मानला जातो. त्याचा विस्तार सुमारे ३०३ चौ. किमी. क्षेत्रावर झालेला आहे. या प्रदेशाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला आहे. दलदलीचा प्रदेश, उथळ तलाव, संथ वाहणाऱ्या नद्या आणि विस्तृत कुरणांनी युक्त अशी या प्रदेशाची नैसर्गिक रचना आहे. त्यामुळे हा प्रदेश पर्यटकांना आणि निसर्गप्रेमींना एका वेगळ्या जगाचा अनुभव देते.

ब्रॉड्झची निर्मिती पूर्णपणे नैसर्गिक नसून ती मानवी क्रियेतून आणि त्यानंतर घडलेल्या नैसर्गिक बदलांतून झाली आहे. हे एक आश्चर्यकारक ऐतिहासिक सत्य आहे. अनेक शतके असे मानले जात होते की, हे तलाव नैसर्गिक आहेत; परंतु १९६० च्या दशकातील संशोधनानंतर हे सिद्ध झाले की, हे प्रत्यक्षात मध्ययुगीन काळातील पीट कोळशाच्या उत्खननाचे खड्डे आहेत. बाराव्या शतकात स्थानिक मठ आणि रहिवासी इंधनासाठी पीटाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असत. या उत्खननामुळे जमिनीवर प्रचंड आकाराचे खड्डे तयार झाले. चौदाव्या शतकाच्या सुमारास समुद्राच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे हे खड्डे पाण्याने भरले गेले आणि आज आढळत असलेल्या विस्तीर्ण सरोवरांचे स्वरूप त्यांना प्राप्त झाले. मानवनिर्मित खोदकामाचे निसर्गाशी झालेले हे एकत्रीकरण जागतिक स्तरावर दुर्मिळ मानले जाते.

ब्रॉड्झच्या भौगोलिक रचनेत जलमार्गांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथे जलवाहतुकीस योग्य अशा सात प्रमुख नद्यांचे जाळे पसरलेले आहे; ज्यामध्ये ब्युर, येर, थर्न, अँट, वेव्हनी, चेट आणि वेनसम या नद्यांचा समावेश होतो. या नद्या एकमेकींशी जोडलेल्या असून त्यांची एकूण लांबी २०० किमी. पेक्षा जास्त आहे. या जलमार्गांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्णपणे जलपाश विरहित आहेत. त्यामुळे नौकाविहार करताना कोणतेही अडथळे येत नाहीत; मात्र हे जलमार्ग समुद्राच्या भरती-ओहोटीच्या थेट प्रभावाखाली असतात. उत्तरेकडील नद्यांचा भाग अधिक विस्तीर्ण असून दक्षिणेकडील भाग अधिक शांत आणि संकुचित आहे. येथील ब्रॉड्झच्या आकारांत बरेच फरक आढळतात. बार्टन ब्रॉड आणि हिकलिंग ब्रॉड हे येथील काही प्रसिद्ध आणि मोठे तलाव आहेत; जे जैवविविधतेने नटलेले आहेत.

पर्यावरणीय दृष्टिकोणातून ब्रॉड्झ हा प्रदेश अत्यंत संवेदनशील आणि समृद्ध आहे. येथे अनेक दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी आढळतात. पक्षीनिरीक्षकांसाठी हे नंदनवन असून येथे बिटर्न, मार्श हॅरियर आणि किंगफिशर यांसारखे पक्षी मोठ्या संख्येने दिसतात. तसेच येथे आढळणारे ‘स्वालोटेल’ फुलपाखरू हे केवळ याच प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे. येथील वनस्पतींमध्ये प्रामुख्याने विविध प्रकारचे लव्हाळे आणि दलदलीतील वनस्पतींचा समावेश होतो; ज्याचा वापर पूर्वी छप्पर बांधण्यासाठी केला जात असे; मात्र सध्या या परिसंस्थेला प्रदूषणाचे मोठे आव्हान आहे. शेतीतून येणारे नायट्रेट्स आणि सांडपाण्यातील फॉस्फेट्समुळे पाण्याचे यूट्रोफिकेशन होऊन शेवाळाचे प्रमाण वाढत आहे; ज्यामुळे मूळ जलचर धोक्यात आले आहेत.

ब्रॉड्झचे संरक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी १९८९ मध्ये ‘ब्रॉड्झ अथॉरिटी’ या विशेष संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेला राष्ट्रीय उद्यानांप्रमाणेच अधिकार आहेत; तसेच त्यांच्याकडे जलमार्गांच्या वाहतुकीचे व्यवस्थापन करण्याची अतिरिक्त जबाबदारीदेखील आहे. पर्यटनातून मिळणारा महसूल आणि निसर्ग संवर्धन यांचा समतोल राखण्याचे मोठे काम ही संस्था करते. नद्यांच्या काठांची होणारी धूप थांबविण्यासाठी बोटींच्या वेगावर मर्यादा घालणे, गाळ काढणे आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध प्रकल्प राबविले जातात. हवामान बदलामुळे वाढणारी समुद्राची पातळी हा या सखल प्रदेशासाठी भविष्यातील सर्वांत मोठा धोका मानला जात असून त्यादृष्टीने अनुकूलन योजना आखल्या जात आहेत.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस रेल्वेचे जाळे विस्तारल्यानंतर ब्रॉड्झ हे सुट्ट्या घालविण्यासाठीचे एक प्रमुख केंद्र बनले. येथे नौकाविहार (बोटिंग) हा पर्यटनाचा मुख्य कणा आहे. ‘नॉरफॉक व्हॅरी’ नावाची पारंपरिक व्यापारी जहाजे ही या प्रदेशाची सांस्कृतिक ओळख आहे. आज ही जहाजे पर्यटकांसाठी जतन करून ठेवली आहेत. या प्रदेशात केवळ जलपर्यटनच नाही, तर ऐतिहासिक पवनचक्क्या आणि मध्ययुगीन फ्लिंट चर्चचा वारसादेखील पाहायला मिळतो. येथील शांतता आणि निसर्गाचे सानिध्य लेखकांना आणि कलाकारांना नेहमीच प्रेरणा देत आले आहे.

 

संदर्भ :

  • Ellis, E. A., The Broads, Collins, 2017.
  • McGraw Hill, 2006.
  • Oxford Encyclopedia.

समीक्षक : वसंत चौधरी