हिंदुस्थानी संगीतातील ठुमरीसदृश्य एक गायनप्रकार. तो सुगम शास्त्रीय किंवा उपशास्त्रीय संगीत विभागात गणला जातो. सुगम शास्त्रीय संगीतात ठुमरी हा प्रकार अत्यंत लोकप्रिय असून ठुमरी गायकीच्या अंगानेच दादरासारखे संगीतप्रकार गायले जातात. ठुमरी व दादरा वगैरे प्रकारांत तालाचा फरक असतो. त्याप्रमाणे रचनांमध्ये वर्णित विषयांचाही फरक असतो. गायकीच्या दृष्टीने ठुमरी ही अधिक संथ, भारदस्त आणि वजनदार असून त्यामानाने दादरा हा प्रकार अधिक चंचल प्रकृतीचा आहे. दादरासारख्या गीतप्रकारामध्ये बंदिशीमधील रसनिष्पत्ती करणे हा प्रधान हेतू असतो. तथापि रागसंकल्पना आणि रससंकल्पना यांची सांगड भरतकाळापासून चालत आल्यामुळे या उपशास्त्रीय संगीतप्रकारांतही राग हा आधारासाठी असतो.
श्रृंगाररस हा प्रामुख्याने दादऱ्यामध्ये आढळतो. भारताच्या पूर्व उत्तर प्रदेशात प्रामुख्याने आग्रा व बुंदेलखंड या भागात याचे गायन अधिक होते. जनरंजनासाठी हा प्रकार प्रसिद्ध असून दादरा तालावरून या संगीतप्रकाराचे नाव आलेले दिसून येते. यातील गीतांना दादरा ताल साथ देण्यासाठी वापरला जात असे. याच्या गायनासाठी दादरा तालाव्यतिरिक्त कहेरवा, चंचाल, मुगलाई अथवा सुगम शास्त्रीय संगीतातील इतर ताल वापरले जातात. गरजेनुसार याचे गायन मध्य लयीत किंवा त्याहूनही जलद गतीने केले जाते. दादरा संगीत प्रकारातील स्थायी परंपरेने ब्रज भाषेत रचलेली आहे, तर अंतऱ्यामध्ये अधूनमधून उर्दू भाषा आढळून येते. हे वैशिष्ट्यपूर्ण मिश्रण भारतीय उपशास्त्रीय संगीतातील विविध परंपरांचे सुसंवादी अस्तित्व दर्शवते. सुरुवातीला हा प्रकार कोठीवर जास्त प्रमाणात गायला जात असे; मात्र नंतर विविध गायकांच्या मंचावरील सादरीकरणानंतर या प्रकारास प्रतिष्ठा प्राप्त झाली. काफी, पहाडी, खमाज, मांड या रागांत याचे गायन केले जाते; मात्र रागाच्या शुद्धतेपेक्षा याच्या सादरीकरणात रंजकतेला अधिक प्राधान्य आहे. रसूलनबाई, सुंदराबाई, सिद्धेश्वरीदेवी, गिरिजादेवी, शोभा गुर्टू यांनी या संगीतप्रकाराचे सादरीकरण करून त्याला भारतभर प्रसिद्ध केले.
संदर्भ :
- Ranade, Ashok, Hindustani Music, 2006.
समीक्षक : वर्षा देवरुखकर