अभिजात हिंदुस्थानी संगीतातील एक गायनप्रकार. तो सुगम शास्त्रीय म्हणजेच उपशास्त्रीय संगीत विभागात गणला जातो. भारताच्या उत्तर भागात प्रामुख्याने याचे गायन केले जाते. अर्धशास्त्रीय संगीतामध्ये या प्रकाराला स्थान मिळाले आहे. गायकीच्या दृष्टीने अर्धशास्त्रीय संगीतातील ठुमरी ही अधिक संथ, भारदस्त आणि वजनदार असून त्यामानाने कजरीवगैरे प्रकार अधिक चंचल प्रकृतीचे आहेत. कजरी हा प्रकार उत्तर भारतीय संगीत परंपरेतील अनुक्रमे होरी, चैती, कजरी, सावनी या ऋतुगीतांमध्ये गणला जातो. ही ऋतुगीते ठुमरी अंगाने गायिली जाणारी असून कजरी वर्षा ऋतूशी संबंधित आहे.

सुरुवातीला कजरीचे निरनिराळ्या मंगलप्रसंगी महिलांद्वारे सामूहिक गायन केले जात असे. याला ‘ढुनमुनिया कजरी’ असेही म्हटले जाते. सर्वसाधारणपणे पूर्वांचल प्रदेशात भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात विशेषतः तृतीयेच्या दिवशी ‘कजरी तीज पर्व’ यामध्ये रात्रभर जागून याचे गायन होत असे. सध्या निरनिराळ्या विषयांचा समावेश कजरी गायनामध्ये होत असला तरी मूळ विषय ‘देवी माहात्म्य’ हा होता. कालांतराने श्रृंगार रस, लोकजीवनाचे वर्णन आणि कौटुंबिक नातेसंबंध इत्यादी विषय यामध्ये येत गेले. उत्तर भारतातील मिर्झापूरमध्ये कजरी गाण्यांचे मोठे फड रंगतात, त्यांत पुरुषांबरोबर स्त्रियाही भाग घेतात. कित्येकदा दोन फडांमध्ये सवाल−जबाबही रंगतात. ह्या गीतांमध्ये शृंगाररसाला प्राधान्य असते.

 

भोजपुरी संत लक्ष्मीसखी, रसिक किशोरी यांच्या कजरी रचना प्रसिद्ध आहेत. अमीर खुसरो, बहादूरशाह जफर, श्रीधर पाठक बलदेव, बदरीनारायण उपाध्याय यांच्यादेखील रचना आढळून येतात. भारतरत्न बिस्मिल्लाखाँसारख्या प्रसिद्ध शहनाईवादकानेही कजरीच्या लोकधुनी विलक्षण कौशल्याने हाताळलेल्या दिसून येतात. बाई सुंदराबाई, सिद्धेश्वरीदेवी, रसूलनबाई, गिरिजादेवी, शोभा गुर्टू इत्यादी प्रसिद्ध गायिकांनी आपल्या गायनाद्वारे कजरीच्या अनेक रचना भारतभर प्रसिद्ध केल्या.

संदर्भ :

• आचरेकर, बा. ग. भारतीय संगीत व संगीतशास्त्र, मुंबई, १९७४.

समीक्षक : वर्षा देवरुखकर