संपातदिन. २१ मार्च आणि २३ सप्टेंबर या दोन दिवसांना विषुवदिन म्हणून ओळखले जाते. या दोन दिवशी पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी दिनमान व रात्रिमान समसमान असते, म्हणजे १२ तासांचा दिवस व १२ तासांची रात्र असते. म्हणून या दोन दिवसांना विषुवदिन असे म्हणतात. ईक्विनॉक्स हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ ‘समान रात्र’ असा होतो. विषुववृत्तावरील दिनमान व रात्रिमान नेहमीच समसमान म्हणजे १२-१२ तासांचे असते; परंतु विषुववृत्तापासून उत्तरेस आणि दक्षिणेस दिनमान आणि रात्रिमानात असमानता होत गेलेली आढळते. पृथ्वी परिभ्रमण करीत असताना सामान्यपणे २१ मार्च व २३ सप्टेंबर या दोन दिवशी सूर्य खगोलीय विषुववृत्तावर असतो, त्यामुळे त्या दिवशी विषुववृत्तावर सूर्याची किरणे लंबरूप पडतात. या दोन दिवशी प्रकाशवृत्त बरोबर दोन्ही ध्रुवांतून जाते आणि प्रत्येक अक्षवृत्ताला बरोबर निम्म्यावर छेदते. प्रकाशवृत्त म्हणजे उजेडाचा व अंधाराचा भाग वेगळी करणारी काल्पनिक रेषा होय. त्यामुळे या दिवशी पृथ्वीचा बरोबर निम्मा भाग उजेडात व त्याच्या विरुद्ध बाजूचा निम्मा भाग अंधारात असतो. या दिवशी सूर्य बरोबर पूर्वेस उगवतो व पश्चिमेस मावळतो.

सूर्याच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे (साधारणपणे २२ डिसेंबर ते २१ जून) आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे (साधारणपणे २१ जून ते २२ डिसेंबर) होणाऱ्या भासमान भ्रमणाला अनुक्रमे उत्तरायण व दक्षिणायन असे म्हणतात. उत्तरायणाची कमाल मर्यादा कर्कवृत्त (२३.५ अंश उ. अक्षवृत्त) आणि दक्षिणायनाची कमाल मर्यादा मकरवृत्त (२३.५ अंश द. अक्षवृत्त) असते. २१ जून रोजी सूर्याचे उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते आणि २२ डिसेंबर रोजी दक्षिणायन पूर्ण होऊन उत्तरायन सुरू होते. उत्तरायणाच्या कालावधीत २१ मार्च रोजी आणि दक्षिणायनाच्या कालावधीत २३ सप्टेंबर रोजी सूर्य बरोबर विषुववृत्तावर आलेला असतो. या दोन दिवशी पृथ्वीवर सर्व ठिकाणी दिनमान व रात्रिमान समसमान असते. म्हणून या दोन दिवसांना ‘विषुवदिन’ असे म्हणतात.

पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करते, त्या भ्रमणमार्गाला अयनवृत्त किंवा क्रांतिवृत्त म्हणतात. हे अयनवृत्त खगोलीय विषुववृत्ताला ज्या  दोन बिंदूंत छेदते, त्या छेदनबिंदूंना संपात किंवा संपातबिंदू किंवा अयनबिंदू म्हणतात. २१ मार्च रोजी अयनवृत्त खगोलीय विषुववृत्ताला दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना छेदते, त्याला वसंत संपात म्हणतात. या दिवसापासून उत्तर गोलार्धात उन्हाळ्याला सुरुवात होते. २३ सप्टेंबर रोजी अयनवृत्त खगोलीय विषुववृत्ताला उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना छेदते, त्याला शरद संपात असे म्हणतात. या दिवसापासून उत्तर गोलार्धात हिवाळ्याला सुरुवात होते. २१ मार्च व २३ सप्टेंबर या दिवशी सूर्य बरोबर खगोलीय विषुववृत्तावर असल्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी १२ तासांचा दिवस व १२ तासांची रात्र असते. म्हणून या दिवसांना विषुवदिन किंवा संपातदिन असे म्हणतात. या दिवशी सूर्य बरोबर पूर्वेस उगवतो व पश्चिमेस मावळतो. थोडक्यात, विषुवदिन म्हणजे पृथ्वीची अशी विशिष्ट स्थिती की, त्या दिवशी दिनमान आणि रात्रिमानाचा कालावधी समान असतात. त्या दिवशी पृथ्वीचे उत्तर व दक्षिण ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात. पृथ्वीच्या या स्थितीला ‘पृथ्वीची संपात स्थिती’ म्हणतात.

संदर्भ : Blackwood, Algernon, Day and Night Stories, London, 1917. 2. Mitchell, Joe, Winter Solstice, 2022.

समीक्षक : शंकर चौधरी