दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वताच्या कॉर्डिलेरा सेंट्रल या पर्वतश्रेणीतील एक जागृत ज्वालामुखी आणि शिखर. स्थानिक भाषेनुसार ‘Coto’ चा अर्थ होतो ‘मान’ आणि ‘paxi’ चा अर्थ ‘चंद्र’ असा होतो. या ज्वालामुखीच्या माथ्यावरील ज्वालामुखी कुंड अर्धचंद्र कोरीसारखे दिसते, म्हणून त्याला कोटोपाक्सी असे संबोधले जाते. या पर्वताला स्थानिक अँडियन लोक पवित्र मानतात. पाऊस आणणारा देव म्हणून त्याची पूजा करतात. दक्षिण अमेरिकेतील एक्वादोर या देशाच्या मध्यवर्ती भागात हा ज्वालामुखी आहे. कोटोपाक्सी ज्वालामुखीचे स्थान ०° ४२′ ५०″ द. अक्षांशावर आणि ७८° २६′ १६″ प. रेखांशावर आहे. जगातील सर्वाधिक उंचीवरील ज्वालामुखींपैकी एक कोटोपाक्सी ज्वालामुखी असून ज्वालामुखी क्रियेतून येथे तीव्र उताराचा लाव्हाशंकू (शिखर) निर्माण झालेला आहे. पॅसिफिक  महासागराभोवतालचे ‘पॅसिफिकचे अग्निकंकण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्वालामुखीप्रवण मालिकेतीलच हा जागृत ज्वालामुखी आहे. कबेसा डेल इंका (इंकाज हेड) या एका लहान शंकूचा अपवाद वगळता हा ज्वालामुखी शंकू चोहोबाजूंनी जवळजवळ सारख्याच आकाराचा दिसतो. तो त्याच्या पायथ्यालगतच्या उंच मैदानापासून सुमारे ३,८०० मी. उंचावर असून त्याच्या पायथ्यालगतची रुंदी सुमारे २३ किमी. इतकी आहे. या शिखराची उंची ५,९११ मी. असून एक्वादोरमधील चिंबोराझो (६,३१० मी.) या  शिखराच्या खालोखाल हे दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. एक्वादोरची राजधानी असलेल्या कीटो शहरापासून दक्षिणेस सुमारे ५० किमी. वर, तर कोटोपाक्सी प्रांताच्या राजधानीचे ठिकाण असलेल्या लाटकुंग या शहराच्या ईशान्येस ३१ किमी. वर हा ज्वालामुखी आहे. पर्वताच्या माथ्यावरील दुहेरी कडा असलेल्या ज्वालामुखी कुंडाचा उत्तर-दक्षिण व्यास ७०० मी. व पूर्व-पश्चिम व्यास ५०० मी. असून त्याची खोली ३६६ मी. आहे. या पर्वताला दीर्घकालीन जोरदार ज्वालामुखी उद्रेकाचा इतिहास असून आजअखेर या ज्वालामुखीचे अनेक वेळा उद्रेक झाले आहेत.

आजपर्यंत ज्ञात जागृत ज्वालामुखी उद्रेकांची एकूण संख्या ८७ असून त्यांपैकी पहिल्या ज्वालामुखी उद्रेकाची नोंद इ. स. १५३४ मध्ये झालेली आहे. इ. स. १७४४, १७६८, १८७७ आणि इ. स. १९०४ मध्ये झालेले उद्रेक हे सर्वांत मोठे ऐतिहासिक उद्रेक ठरले आहेत. इ. स. १७४४ व इ. स. १७६८ मध्ये झालेल्या उद्रेकांमुळे लाटकुंग हे शहर पूर्णपणे उध्वस्त झाले होते. इ. स. १८७७ मधील उद्रेक लहर (बर्फाच्छादित प्रदेशावरील लाव्हाजन्य पदार्थांचे प्रवाह) निर्मितीच्या दृष्टीने विशेष प्रसिद्ध ठरला. या उद्रेकातील अग्निदलिक पदार्थ व लाव्हाजन्य पदार्थांच्या चिखलाचा प्रवाह पश्चिमेस १०० किमी. पेक्षा अधिक अंतरावरील पॅसिफिक महासागरापर्यंत, तर पूर्वेस अ‍ॅमेझॉन या नदीच्या खोऱ्यापर्यंत वाहत गेला होता. अशा लहरमुळे (चिखली लाव्ह्यामुळे) ज्वालामुखी शिखराच्या सभोवतालच्या उतारावर अनेक दऱ्यांची निर्मिती झालेली दिसते. त्यानंतर इ. स. १९०४ मध्ये झालेला ज्वालामुखी उद्रेकही अलीकडच्या काळातील मोठा उद्रेक होता. इ. स. १९४० व २०१५ मध्ये लहान उद्रेक झाले होते. सर्वांत अलीकडे ऑक्टोबर २०२२ ते जुलै २०२३ या कालावधीत बरेच उद्रेक झाले होते. या उद्रेकांच्या वेळी राख, वायू आणि वाफेचे लोट ज्वालामुखी कुंडापासून वातावरणात २०० ते २,५०० मी. उंचीपर्यंत जाऊन ते वेगवेगळ्या दिशांना दूरपर्यंत विखुरले होते. काही वेळा तर हे लोट २.५ किमी. उंचीपर्यंत जाऊन सर्वत्र विखुरलेले आढळले आहेत. ज्वालामुखी उद्रेकांबरोबरच या भागात सातत्याने भूकंपाचे धक्केही बसतात.

कोटोपाक्सी पर्वताच्या पायथ्यालगतची भूमी अनेकदा तीव्र भूकंपाच्या धक्क्यांनी उध्वस्त झालेली आहे किंवा याच्या ज्वालामुखी कुंडातून बाहेर फेकलेल्या स्पंजाश्म (पमीस दगड) आणि राखेखाली गाडली गेलेली आहे. ज्वालामुखी उद्रेक आणि भूकंपाचे धक्के यांमुळे लाटकुंग शहराची अनेकदा हानी झालेली आहे. खुद्द या संमिश्र ज्वालामुखी पर्वताची निर्मिती गर्द रंगाचा ट्रॅचिटीक लाव्हा व फिकट रंगाची राख यांचे आलटूनपालटून एकावर एक थर साचून झालेली आहे. या ज्वालामुखी पर्वताच्या सभोवतालचा पायथ्याचा प्रदेश गवताळ प्रदेशाने व्यापलेला असून पर्वताचा वरचा भाग कायमस्वरूपी हिमाच्छादित असतो. निरभ्र आकाश असताना कीटो आणि लाटकुंग या दोन्ही शहरांपासून हे ज्वालामुखी शिखर दिसते.

कोटोपाक्सी शिखर सर करण्याचा पहिला प्रयत्न इ. स. १८०२ मध्ये प्रसिद्ध भूगोलज्ञ व प्रवासी अ‍लेक्झांडर फोन हंबोल्ट यांनी केला होता; परंतु ते माथ्यापर्यंत पोहोचू शकले नव्हते. त्यामुळे हा पर्वत चढून जाण्यायोग्य नाही, अशी धारणा झाली होती. इतर गिर्यारोहकांनी इ. स. १८३१ व इ. स. १८५८ मध्ये केलेले प्रयत्नही अयशस्वी झाले होते; त्यामुळे ही धारणा अधिकच पक्की झाली. जर्मन शास्त्रज्ञ व प्रवासी व्हिल्हेल्म रेस यांनी मात्र २८ नोव्हेंबर १८७२ रोजी आणि त्यानंतर मे १८७३ मध्ये ए. स्टुबेल यांनी या पर्वताच्या माथ्यावर पोहोचण्यात यश मिळविले. याशिवाय इतरही अनेक गिर्यारोहकांनी हे शिखर सर केले आहे. कोटोपाक्सी आणि त्याच्या सभोवतालचा गवताळ प्रदेश कोटोपाक्सी राष्ट्रीय उद्यान म्हणून संरक्षित केला आहे. पर्यटकांचे हे प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे.

संदर्भ : Kerrod, Robin, Volcanoes and Earthquakes, 2000.

समीक्षक : शंकर चौधरी