कार्स्ट ही चुनखडी, डोलोमाइट आणि जिप्सम यांसारख्या पाण्यात विरघळणाऱ्या कार्बोनेट खडकांच्या विरघळण्यापासून निर्माण होणारी स्थलाकृती आहे. चुनखडक किंवा डोलोमाइट खडकांच्या प्रदेशात हवेतील कार्बन डाय-ऑक्साइडामुळे किंचित अम्लधर्मी झालेले पृष्ठभागावरील पाणी खडकांच्या फटींतून झिरपत खाली जाते, तेव्हा चुन्याचा काही अंश त्या पाण्यात विरघळतो. त्यामुळे तेथील खडकांच्या फटी रुंदावतात, भूमिगत पाण्याचे मार्ग मोठे होतात व खडकात पोकळी तयार होते. भूगर्भातील जलनिस्सार प्रारूपामुळे पृष्ठभागावरील पाणी मर्यादित होऊ शकते, ज्यामध्ये काही नद्या किंवा तलाव विलुप्त झालेले दिसतात. तेथील लुप्त झालेले जलप्रवाह भूपृष्ठाखालून वाहू लागतात व पुढे खालच्या पातळीवर कोठेतरी बाहेर येतात. त्यामुळे अशा प्रदेशात भूपृष्ठाखाली लहानमोठ्या विद्रावजन्य गुहा तयार होतात; दीर्घ काळानंतर काहींच्या छपरापासून लोंबणारे व तळावर उभे असलेले अधोमुख व ऊर्ध्वमुख लवणस्तंभ तयार होतात; जमिनीवर विवरे तयार होऊन त्यांत जलप्रवाह लुप्त होतात; काही प्रवाह भूमीवर वेड्यावाकड्या घळया पाडतात; काही वेळा वरील भार सहन न होऊन गुहांची छपरे कोसळतात. अशा कोसळलेल्या गुहा एकत्र होऊन तेथे लांबट दरी बनते. अशा प्रदेशात छोट्या प्रवाहांचा बहुदा अभावच असतो; कारण पावसाचे पाणी चटकन जमिनीतच शिरते. गुहांच्या भिंतीवरही क्षारांचे चित्रविचित्र आकाराचे थर पडद्यासारखे साचलेले दिसतात आणि तळावर क्षारांचे थर व त्यांचे बनलेले लहानमोठे बांध दिसतात. वटवाघुळांसारखे काही प्राणी गुहांचा तात्पुरता आश्रय घेतात, तर काही अधिक काळ गुहेत राहतात. काही गुहा तेथील आश्चर्यकारक नैसर्गिक दृश्यांमुळे प्रवाशांचे आकर्षण ठरल्या आहेत. पर्यटकांचे प्रमुख आकर्षण म्हणजे विद्रावजन्य गुहांतील अधोमुख व ऊर्ध्वमुख लवणस्तंभ असते.

क्रोएशियाजवळील चुनखडीयुक्त दिनारिक आल्प्स

ज्या प्रदेशात विरघळलेला खडक बहुदा त्या खडक चुऱ्याच्या ढिगाऱ्याने आच्छादला जातो किंवा अविद्राव्य खडकाच्या थराने बंदिस्त केलेला असतो, अशी कार्स्ट वैशिष्ट्ये केवळ भूपृष्ठाच्या पातळीखालीच आढळू शकतात. तेथे न विरघळलेल्या पदार्थांमुळे तयार झालेली मृदा व पाणी यांवर शेती होऊ शकते. योग्य परिस्थिती निर्माण झाल्यास क्वॉर्ट्झाइटसारखे अधिक अपक्षय (विदारण) प्रतिरोधक खडकांतदेखील कार्स्ट भूमिस्वरूप बनू शकते. प्राचीन कार्स्ट भूमिस्वरूपाच्या अभ्यासाचे महत्त्व पेट्रोलियम भूगर्भशास्त्रात आहे; कारण जगातील ५०% हायड्रोकार्बन साठा कार्बोनेट खडकात असतो आणि यातील बराचसा भाग सच्छिद्र कार्स्ट प्रणालींमध्ये आढळतो.

कार्स्ट हा इंग्रजी शब्द एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मन भाषेतील कार्स्ट शब्दावरून घेतला गेला होता. हा शब्द जर्मन

सोन डूंग गुहा, व्हिएटनाम

भाषेच्या वापरात फार पूर्वीपासून होता. खरेतर हा शब्द दिनारिक आल्प्सच्या पर्वतरांगांमध्ये आढळणाऱ्या अनेक भूविज्ञान, भूमिरूप विज्ञान आणि जलविज्ञान विषयक वैशिष्ट्यांचे वर्णन करण्यासाठी वापरला गेला होता. इटलीच्या ईशान्य कोपऱ्यापासून ट्रीएस्ट शहराच्या वर, बाल्कन द्वीपकल्प ओलांडून पूर्वेकडील एड्रिअ‍ॅटिकच्या किनारपट्टीवर कोसोवो आणि उत्तर मॅसिडोनियापर्यंत, जेथे शार पर्वतांचा समूह सुरू होतो, तेथे कार्स्ट भूमिस्वरूपे आढळतात. कार्स्ट क्षेत्र सर्वांत वायव्य विभागात आहे, ज्याचे प्रारंभिक स्थलाकृतिक संशोधनात इटली आणि स्लोव्हेनिया यांदरम्यानचे पठार म्हणून वर्णन केले आहे.

हिमालय, आग्नेय आशियातील फिलिपीन्स, इंडोनिशिया, यूरोपातील इंग्लंड, ऑस्ट्रिया, फ्रान्स ते स्वित्झर्लंड, इटलीमधून यूगोस्लाव्हिया व स्लोव्हेनियापर्यंत गेलेला दक्षिण व मध्य आल्प्सचा चुनखडकाचा प्रदेश, अमेरिकेतील काही राज्यांत, क्यूबा इत्यादी देशांच्या काही भांगात आढळणाऱ्या अशा प्रकारच्या भूमिस्वरूपाला कार्स्ट भूमिस्वरूप म्हणतात. मध्य यूरोपातील स्लोव्हेनिया या देशात अशी भूमिस्वरूपे आढळणारा प्रदेश ‘कार्स्ट भूप्रदेश’ हा त्या देशातील एक स्वतंत्र प्राकृतिक विभाग मानला जातो. येथील वैशिष्ट्यपूर्ण खडकरचनेमुळे येथे अनेक गुहांची व भूमिगत नद्यांची निर्मिती झाली आहे. महाराष्ट्रात अहमदनगरजवळील डोंगरात चुनखडकाच्या थरात विद्रावजन्य गुहा पाहायला मिळतात.

व्हिएटनाममधील फाँग न्हा-के बंग राष्ट्रीय उद्यानातील सोन डूंग गुहा ही जगातील सर्वांत मोठी गुहा असून त्याखालोखाल चीनमधील मियाओ रूम गुहा, संयुक्त संस्थानातील मॅमथ गुहा आणि मेक्सिकोतील सॅक अ‍ॅक्टन गुहा प्रसिद्ध आहेत. मेघालयातील क्रेम लिआट प्रा-उमिम-लॅबिट ही भारतातील सर्वांत मोठी गुहा असून तिची लांबी ३१ किमी आहे. विशाखापटनमच्या उत्तरेला सुमारे ९२ किमी अंतरावर असलेल्या बोरा गुहेने सुमारे एक चौ. किमी. क्षेत्र व्यापलेले आहे. ही गुहा गोस्थानी नदीचे उगमस्थान म्हणून उभी आहे. बोरा गुहा क्षैतिज समतल १०० मी. आणि उभ्या समतल ७५ मी. वर उघडते. ही गुहा समुद्रसपाटीपासून सुमारे ८०० ते १,३०० मीटर उंचीवर स्थित आहे आणि विविध प्रकारचे प्रभावी स्पीलोथेम्स (पाण्यातून खनिजे साचून गुहेत तयार झालेली रचना) स्पष्टपणे प्रदर्शित करते. गुहेत मजबूत कठडा (रेलिंग्जने) जोडलेल्या चांगल्या संरचित पायऱ्या आहेत, ज्यामुळे या गुहेत प्रवेशयोग्यता वाढते.

जगातील सर्वांत मोठ्या १० गुहा (सन २०२४)

अनुक्रमांक गुहेचे नाव स्थान
१. सोन डूंग गुहा फाँग न्हा-के बंग राष्ट्रीय उद्यान (व्हिएटनाम)
२. मियाओ रूम गुहा झियुन काउंटी, ग्विझौ प्रांत, चीन
३. मॅमथ गुहा केंटकी राज्य, संयुक्त संस्थाने
४. सॅक अ‍ॅक्टन गुहा मेक्सिको
५. सिस्टेमा डॉस ओजोस गुहा क्विंटाना रू राज्य, मेक्सिको
६. ज्युअल गुहा ब्लॅक हिल्स, साउथ डकोटा, सं. संस्थाने
७. मुलू लेणी गुनुंग मुलु नॅशनल पार्क, बोर्निओ बेट
८. सिस्टेमा ऑक्स बेल हा गुहा मेक्सिको
९. ऑप्टीमिस्टीचना गुहा कोरोलिव्हका, युक्रेन
१०. शुआंगहेडाँग गुहा जाळे चीन

समीक्षक वसंत चोधरी