रोकडे, कुशाबा : (१९१०–१ सप्टेंबर १९८७).  महाराष्ट्रातील तमाशा परंपरेतील प्रसिद्ध ढोलकीवादक. त्यांचे पूर्ण नाव कुशाबा शंकर रोकडे (अवसरीकर) असे होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी (बु.) येथे एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील शंकरराव रोकडे (अवसरीकर) यांनी शंकरराव अवसरीकर सह गुणाजी मास्तर नारायणगावकर तमाशा मंडळ स्थापन केले होते. या  वातावरणातच कुशाबा यांची जडणघडण झाली. ते औपचारिक शिक्षणापासून वंचित राहिले; तथापि, त्यांच्याकडे उपजत कलाप्रतिभा होती. लहानपणापासूनच त्यांना तालवाद्यांची आवड होती. सुरुवातीस त्यांनी तमाशात नाच्याची भूमिका साकारली. पुढे तमाशातील विविध कामे करीत असताना त्यांनी ढोलकीवादनाकडे विशेष लक्ष दिले. त्यांच्या वादनातील प्रावीण्य लक्षात घेऊन त्यांच्या वडिलांनी त्यांना तबल्याचे शिक्षण घेण्यासाठी पाठविले. या प्रशिक्षणामुळे ते तबला आणि ढोलकी या दोन्ही वाद्यांमध्ये पारंगत झाले. पुढे त्यांनी ढोलकीवादनालाच आपले प्रमुख कार्यक्षेत्र बनविले.

रोकडे हे डबल ढोलकी वादनासाठी विशेष प्रसिद्ध होते. एक ढोलकी पुढे आणि दुसरी पाठीवर बांधून एकाच वेळी दोन्ही ढोलक्यांवर वादन करण्याची त्यांची शैली वैशिष्ट्यपूर्ण होती. त्यांच्या या कौशल्यामुळे तमाशा रसिकांमध्ये त्यांना मोठी लोकप्रियता लाभली. त्यांच्या स्वतंत्र ढोलकीवादनासाठी तमाशांच्या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहत असत. तमाशा क्षेत्रात त्यांना आदराने कुशाभाऊ म्हणून संबोधले जाई. त्यांच्या  ढोलकीवादानात  ताकद, चपळता, लयबद्धता आणि वैविध्य यांचा सुंदर मिलाफ दिसून येत असे. तमाशातील नृत्यांगनांच्या नृत्यास अनुरूप वादन करण्याचे त्यांचे कौशल्य उल्लेखनीय होते. त्या काळात तमाशा क्षेत्रात कडक ढोलकीवादनाचा हात म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या वादनाचा प्रभाव पुढील पिढीतील अनेक ढोलकीवादकांवर पडला.

रोकडे यांनी आपल्या तमाशा मंडळाबरोबरच संगीतबारीतील कलावंतांनाही साथसंगत केली. सलग दोन-तीन तास गळ्यात ढोलकी अडकवून वादन करण्याची त्यांची क्षमता विशेष मानली जात असे. ढोलकीच्या विविध ठेक्यांचा, बोलांचा आणि लयींचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांच्या वादनात भावपूर्णता आणि नाट्यमयता आढळते. त्यांनी कलगीतुरा या चित्रपटासाठी ढोलकीवादन केले. तसेच दादू इंदुरीकर यांच्या गाढवाचं लग्न या लोकनाट्यातील त्यांच्या ढोलकीवादनामुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. या नाटकाचे अल्पावधीत सुमारे तीन हजार प्रयोग झाले. त्या निमित्ताने नाटकातील कलाकारांचा सन्मान करण्यात आला होता. दिल्लीहून प्रकाशित होणाऱ्या द विकली या इंग्रजी नियतकालिकानेही या प्रयोगाची सचित्र दखल घेतली होती.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात त्यांनी लोकशाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांच्यासह विविध कार्यक्रमांत सहभाग घेतला. चळवळीतील पोवाडे आणि स्फूर्तिगीतांना त्यांनी ढोलकीची प्रभावी साथ दिली. अत्यंत प्रेमळ, मितभाषी आणि कलानिष्ठ व्यक्तिमत्त्व असलेल्या कुशाबा रोकडे यांनी तमाशातील ढोलकीवादनाला स्वतंत्र प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कलेचा गौरव विविध पुरस्कारांनी करण्यात आला. तमाशा रसिकांमध्ये त्यांनी स्वतःचा स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण केला. आयुष्यभर ढोलकीकलेची सेवा करणाऱ्या या प्रतिभावंत ढोलकीवादकाचे वृद्धापकाळाने निधन झाले.

संदर्भ : क्षेत्र संशोधन

समीक्षण : जगतानंद भटकर