अणुकेंद्रकीय ऊर्जेच्या शांततामय वापराचा प्रसार करणारी आणि आण्विक शस्त्राचा लष्करी उद्देशासाठी वापर करण्यास प्रतिबंध घालणारी एक सर्वोच्च आंतरराष्ट्रीय संस्था. ही संस्था अणुऊर्जेच्या शांततामय वापराचा प्रसार करते आणि
अण्वस्त्रांच्या वापराला आळा घालते. या संस्थेची स्थापना ऑक्टोबर १९५६ मध्ये झाली आणि २९ जुलै १९५७ रोजी संस्थेचे कायदे व नियम प्रत्यक्षात अंमलात येऊन सर्व सदस्य देशांना लागू झालेत. संस्थेचे मुख्यालय ऑस्ट्रीयातील व्हिएन्ना येथे आहे. ‘शांतता आणि विकासासाठी अणू’ हे संस्थेचे ब्रिदवाक्य आहे. या संस्थेचे सदस्य देश १८१ असून सध्या राफेल मारियानो ग्रोसी हे संस्थेचे महानिदेशक आहेत (एप्रिल, २०२६).
अण्वस्त्र प्रसारबंदी करार, १९६८ नुसार सर्व अण्वस्त्रधारी नसलेल्या देशांना आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेसोबत एक सुरक्षा करार करणे बंधनकारक आहे. त्या कराराचा एक भाग म्हणून संस्थेला अणू कार्यक्रमांवर देखरेख ठेवण्याचा आणि अणू सुविधांची तपासणी करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. अर्थसंकल्प व इतर कार्यक्रमांना मंजुरी देण्यासाठी आणि संस्थेच्या सर्वसाधारण धोरणांवर चर्चा करण्यासाठी सदस्य देशांमधून एकूण ३५ सदस्य देशांचे एक नियामक मंडळ असते. हे मंडळ वर्षातून सुमारे पाच वेळा बैठक घेते. संस्थेची वैधानिक कार्ये पार पाडणे, सुरक्षा करारांना मंजुरी देणे आणि महासंचालकांच्या नियुक्तीला मंजुरी देणे आणि नवीन सदस्यांना प्रवेश देणे इत्यादी जबाबदाऱ्या नियामक मंडळ पार पाडते.
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या कार्यांमध्ये वैद्यकशास्त्र, कृषी, जलस्रोत आणि उद्योग या क्षेत्रांचा समावेश होत असून या क्षेत्रांमध्ये अणुऊर्जेच्या उपयोगांवर संशोधन; तांत्रिक माहिती आणि कौशल्यांच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी परिषदा, प्रशिक्षण कार्यक्रम, शिष्यवृत्ती आणि प्रकाशनांचे आयोजन; विशेषतः अविकसित देशांना तांत्रिक साहाय्य प्रदान करणे आणि किरणोत्सर्ग सुरक्षा उपायांची स्थापना करणे आण्विक तंत्रज्ञानाच्या शांततामय वापराच्या विकासासाठी प्रोत्साहन देणे; आण्विक तंत्रज्ञान आणि आण्विक द्रव्यांच्या गैरवापराविरुद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवर खबरदारी घेणे; आण्विक सुरक्षा (विकिरण संरक्षणासह) व आण्विक सुरक्षा प्रमाणकांचा आणि त्यांच्या अंमलबजावणीचा पुरस्कार करणे इत्यादी महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश असून याकामी संस्थेला संबंधित प्रशासन साहाय्य करते.
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था ही संविधी या संयुक्त राष्ट्रापेक्षा वेगळ्या अशा सनदेने स्वतःच्या वेगळ्या आंतरराष्ट्रीय करारातून उदयास आली असली, तरी ती संयुक्त राष्ट्र आमसभा व सुरक्षा समिती या दोघींना आपल्या कार्याची माहिती देते.
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचा दैनंदिन कारभार सचिवालयाद्वारे चालतो, ज्याचे प्रमुख महासंचालक असतात आणि त्यांना सहा उपमहासंचालक मदत करतात. सचिवालयाच्या विभागांमध्ये अणुऊर्जा, अणुसुरक्षा, अणुविज्ञान व उपयोजन, सुरक्षा उपाय आणि तांत्रिक सहकार्य यांचा समावेश आहे. या संस्थेची विभागीय कार्यालये कॅनडाच्या आँटॅरिओ प्रांतातील टोराँटो येथे आणि जपानमधील टोकियो येथे आहेत. या व्यतिरिक्त तिची दोन संबंध कार्यालये न्युयॉर्क प्रांतात शास्त्रीय आणि तांत्रिक सहकार्यासाठी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था आंतर शासकीय मंच म्हणून कार्य करते.
संदर्भ :
- Fischer, David, International Atomic Energy Agency, Intl Atomic Energy Agency, 1997.
- https://www.britannica.com/topic/International-Atomic-Energy-Agency
- https://www.iaea.org/resources/iaea-publication/nuclear-medicine-handbook-slides
समीक्षक : अनिल पडोशी