ए सीझन इन हेल (१८७३). फ्रेंच साहित्यातील प्रतीकवादी चळवळीतील महत्त्वपूर्ण ग्रंथ. फ्रेंच भाषेमध्ये ‘यून सँझाँ आंनांफॅर’ (Une saison en enfer) असे शीर्षक.  फ्रेंच कवी आर्त्यूर रँबो (१८५४-१८९१) यांनी रचलेल्या ह्या ग्रंथात गद्यकवितांचा समावेश आहे. रँबो यांनी स्वतः प्रकाशित केलेला हा एकमेव ग्रंथ आहे. त्याचे प्रकाशन बेल्जियममधील ब्रुसेल्स शहरात करण्यात आले. रँबो हे एक प्रमुख प्रतीकवादी कवी होते. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी या ग्रंथाचे प्रकाशन केले. सदरच्या ग्रंथामध्ये गद्य आणि पद्यांचे असे एकूण नऊ तुकडे आहेत. कवीने त्यांच्या आयुष्याचे व काव्यात्मक प्रवासाचे परीक्षण करून त्याद्वारे आलेल्या आत्मभानाचे आध्यात्मिक कथन यात संग्रहीत केले आहे.

छायाच‍ित्र संदर्भ

हा ग्रंथ लिहीत असताना कवी एका नैतिक संकटातून जात होते. या संकटाचे मूळ कारण त्यांचे पॉल व्हर्लेअन  (१८४४-१८९६) या कवीशी असलेले प्रेमसंबंध होते. पॉल व्हर्लेअन हे प्रतीकवादी कविता चळवळीतील प्रमुख व नावाजलेले कवी होते. वास्तविक जीवनात दोन्ही कवींचे नाते इतके तणावपूर्ण आणि हिंसक होते की, व्हर्लेअन शारीरिकदृष्ट्या आजारी आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाले. एप्रिल १८७३ मध्ये रँबो यांनी व्हर्लेअन यांच्याशी संबंध तोडले व ते आपल्या कुटुंबाकडे परत गेले. शार्लव्हील (Charleville) जवळील रोश (Roche) येथील त्यांच्या शेतात या ग्रंथाची रचना करायला सुरुवात केली. महिन्याभरानंतर व्हर्लेअन यांनी रँबो यांना लंडनला जाण्यास राजी केले. त्या दोघांमधील भांडण इतक्या टोकाला गेले होते की रँबो यांनी व्हर्लेअनचा शेवटचा निरोप घेण्यासाठी त्यांची ब्रुसेल्समध्ये भेट घेतली. रँबो निघत असताना व्हर्लेअननी त्यांच्यावर गोळी झाडली.  रँबो यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि व्हर्लेअन ह्यांना अटक करण्यात येऊन त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. रँबो लवकरच रोश येथे परतले, आणि त्यांनी या ग्रंथाचे लिखाण पूर्ण केले.

रँबो यांनी या ग्रंथात प्रेम, दुःख आणि मानवी परिस्थ‍िती या विषयांवर चिंतन केले आहे. पॉल व्हर्लेअन यांच्या  विरहाने आलेल्या नैराश्याचे वर्णन कवीने आपल्या लेखनात अचूक टिपले आहे. विरहाचा हा काळ आर्त्यूर रँबोसाठी नरकवास ठरला. म्हणून या ग्रंथाचे नाव ‘नरकातील काळ’ (यून सँझाँ आंनांफॅर) असे देण्यात आले. या ग्रंथाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यातील भावनिक तीव्रता आणि व्यक्त होणाऱ्या ज्वलंत प्रतिमा. यात जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न, स्वतःच्या अस्तित्वाची तपासणी आणि सामाजिक अलगतावादाचे चित्रण दिसून येते.

ग्रंथाच्या सुरुवातीला रँबो भूतकाळातील त्या निरागस आणि प्रकाशमय काळाची आठवण करतात, जेव्हा ते सौंदर्य, प्रेम आणि काव्याच्या चमत्कारांवर विश्वास ठेवत होते.पण त्या स्वप्नांचा भंग होताच त्यांच्या ‘नरकयात्रेची’ सुरुवात कशी झाली, हे ते पुढे उलगडतात. दुसरा भाग ‘मोव्हे साँ’ (इं. शी. बॅड ब्लड) मध्ये रँबो स्वतःतील पाप आणि दोषांचा सामना करत बंड, अपराधगंड आणि आत्मसंघर्षाने आकारलेली आपली ‘शापित’ ओळख मांडतात. तिसरा भाग ‘न्वी द लाँफेर’ (इं. शी. नाइट ऑफ हेल)- लिहिताना रँबो ह्यांना कधी मोक्षाची झलक दिसते, तर कधी सैतानाचे आकर्षण वाटते, आणि ते अखेरीस स्वतःच्या भीती, अपराधीपणा आणि मानवी असाहाय्यतेच्या नरकात कोसळलेले आढळतात.

चौथा भाग ‘देलीर १: व्ह्येर्ज फॉल – लेपू अँफेर्नाल (इं. शी.  डिलिरियम I: द फूलिश वर्जिन – द इन्फर्नल स्पाउस) मध्ये रँबो प्रेमात हरलेल्या एक महिलेची काल्पनिक कथा सांगतात. ह्या कथेतून जणू काही ते आपल्या आयुष्याची व्यथा मांडत अहेत असे भासते. पाचवा भाग ‘देलीर २ – आल्शीमी द्यू व्हेर्ब’ (इं. शी. डिलिरियम II: अल्केमी ऑफ वर्ड्स ) मध्ये रँबो, एक कवी म्हणून असलेल्या स्वतःच्या खोट्या आशा आणि तुटलेल्या स्वप्नांचे स्पष्टीकरण देतात.

सहावा भाग ‘लॅम्पोसिब्ल’ (इं. शी. द इम्पॉसिबल) सातवा भाग – ‘लेक्लेर’ (इं. शी. लाइटनिंग) आणि आठवा भाग – ‘मातँ’ (इं. शी. मॉर्निंग)  यांमध्ये आपल्या अंतर्मनाशी आणि बाह्य जगाशी जुळवून घेऊ न शकण्याच्या वेदनेचा आणि अशक्य आदर्शांच्या मागोमाग धावण्याच्या दुःखाचा अनुभव कवी मांडतात.

बरेच समीक्षक असे मानतात की, ह्या गद्यसंग्रहाच्या शेवटचा भाग, ज्याला ‘आ+द्+य’ (इं. शी. फेअरवेल) हे नाव दिले आहे, त्याद्वारे कवीने आपल्या काव्यात्मक प्रवासाचा निरोप घेतला. हा ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर लवकरच रँबो यांनी लेखन सोडले. मात्र हा ग्रंथ प्रतीकवाद चळवळीतील एक अविभाज्य घटक मनाला जातो.

संदर्भ :

  •  https://www.poetryfoundation.org/poets/arthur-rimbaud

समीक्षक  : उज्ज्वला जोगळेकर