सिंग, तेजिंदर हरपाल : (२८ जून १९३५ – १० नोव्हेंबर २०२१). भारतीय कापूस शास्त्रज्ञ. नगदी पीक (कॅश क्रॉप) कापूस यामध्ये मोलाचे संशोधन करून त्यांनी शेतकऱ्यांना कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या जाती विकसित केल्या.
सिंग यांचा जन्म लुधियानातील भैनी दारोसा या खेडे गावात झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण (शेती क्षेत्रातील) पंजाबमधेच झाले. पंजाब कृषी विद्यापीठात त्यांनी साहाय्यक कापूस संशोधक (१९६९) व त्यानंतर वनस्पती संशोधन विभागाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहिले. वनस्पती प्रजनन विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी कापूस व इतर पिकांच्या प्रजननाच्या कामाला प्राधान्य दिले. त्यांचे कापसावरील संशोधन उल्लेखनीय ठरले. त्यांनी एल. एस. नेगी, एस. एन. सिक्का आणि आ. भै. जोशी यांच्याबरोबर भारतीय कृषी संशोधन संस्थेत कापसावर काम केले. याकामी त्यांना अमेरिकेकन शास्त्रज्ञ एस. जी. स्टीफन्स यांचे सहकार्य लाभले. त्यांनी भारताच्या एकात्मिक कापूस उत्पादन प्रकल्पात मोलाची भूमिका पार पाडली.
सिंग यांनी कापसाचे अंकुरण कसे होते आणि कापसाच्या उत्पादनातील टप्पे कोणते याबाबत सखोल अभ्यास करून आपल्या सहकाऱ्यांसमवेत कमी कालावधीत अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित केल्या. यासाठी त्यांनी देशी व अमेरिकन दोन्ही जातींच्या कापसावर काम करत १८ जाती विकसित केल्या. पंजाबमध्ये या जातींची प्रत्यक्ष लागवड करून हेक्टरी चांगल्या उत्पन्नाचा पडताळा घेतला. यामुळे भारतातील कापूस संशोधन व उत्पादन नकाशात पंजाबला महत्त्वाचे स्थान मिळाले. त्यांनी विकसित केलेल्या कापसाच्या विविध जातींची लागवड करुन शेतकऱ्यांनी आपला फायदा करून घेतला.
सिंग यांच्या या कामगिरीमुळे त्यांना नऊ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. यात जी.ए स. खुश पुरस्कार महत्त्वाचा मानला जातो. पंजाबच्या राज्यपालांनी ‘लीडर ऑफ सर्व्हे टीम’ म्हणून त्यांचा १९८४ साली सन्मान केला. त्यांनी विकसित केलेल्या जातीबद्दल त्यांना पंजाब कृषी विद्यापीठ व नागपूरच्या कापूस संशोधन व विकास संस्थेने (२००९) पुरस्कार देऊन सन्मानित केले.
सिंग यांचे लुधियाना येथे निधन झाले.
कळीचे शब्द : #कापूस #कृषिशास्त्रज्ञ
संदर्भ :
समीक्षक : अ. पां. देशपांडे