बोले, सीताराम केशव : (२८ जून १८६९-१४ जानेवारी १९६१). आधुनिक महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे समाजसुधारक, शेतकरी-कामगार नेते आणि अस्पृश्योद्धार चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते. सी. के. बोले, बाबासाहेब बोले, सीतारामपंत या नावांनीही परिचित. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यामधील गुहागर तालुक्यातील पालशेत या गावी केशव व यशोदा या दाम्पत्यापोटी झाला. बालपण मुंबईत गेले. वडील मुद्रण व्यवसायाशी संबंधित असल्यामुळे कायदेपंडित विश्वनाथ नारायण मंडलिक, लेखक विनायक कोंडदेव ओक आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांसारख्या विद्वानांचा सहवास त्यांना लाभला.
बोले यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मुंबईत झाले. अँग्लो-व्हर्नाक्युलर शाळेत शिकत असताना मुख्याध्यापक कृष्णशास्त्री गोडबोले यांच्या समतावादी व बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोनाचा बोले यांच्यावर विशेष प्रभाव पडला. मुंबईतील एल्फिन्स्टन आणि विल्सन हायस्कूलमध्ये शिक्षण घेत १८८९ मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. विद्यार्थीदशेतच त्यांचा विवाह पांडुरंग रामजी मयेकर यांची मुलगी लक्ष्मी हिच्याशी झाला. न्यायमूर्ती के. टी. तेलंग, रानडे यांसारख्या समाजसुधारकांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी समाजसेवा हेच जीवनध्येय स्वीकारले. या प्रेरणेतून त्यांनी विठोबा गोविंद पाटील, देवजी भिकाजी पेवेकर आणि नामदेव धर्माजी चोरगे या समविचारी तरुणांच्या सहकार्याने जुना नागपाडा येथे ‘ज्ञानवर्धक मंडळी’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेतर्फे व्याख्याने, रात्रशाळा आणि विविध सामाजिक-शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असत. याच काळात पालशेत येथील वास्तव्यात त्यांना जातिभेद, अस्पृश्यता आणि सामाजिक विषमतेचे प्रत्यक्ष दर्शन झाले. त्यात त्यांच्या आजोबांना उच्च मानल्या जाणाऱ्या जातींच्या मुलांनी एकेरी संबोधित करणे, पडवीत स्वतंत्रपणे भोजनास बसविणे व भोजनानंतर उष्टे काढावयास लावणे असे प्रकार होत. या अनुभवांमुळे बहुजन समाजाला जातिभेद आणि सामाजिक विषमतेतून मुक्त करण्याची प्रेरणा त्यांच्या मनात दृढ झाली.
बोले हे ‘केसरी’, ‘सुधारक’, ‘दीनबंधू’ ही वर्तमानपत्रे नियमित वाचत असत. महात्मा जोतीराव फुले यांनी समता, सामाजिक न्याय आणि बहुजनोद्धाराच्या तत्त्वांवर उभारलेल्या सत्यशोधक चळवळीचा, तसेच गोपाळ गणेश आगरकरांच्या ‘सुधारक’मधून मांडल्या जाणाऱ्या पुरोगामी सामाजिक विचारांचा त्यांच्या मनावर खोलवर प्रभाव पडला. त्यांनी राजकीय सुधारणांना प्राधान्य देणारा मार्ग न स्वीकारता मानवी समानतेचा पुरस्कार करत समाजसुधारकांचा पक्ष स्वीकारला.
बोले यांची १८९० मध्ये ‘कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी’ या संघटनेच्या कोषाध्यक्षपदी निवड झाली. भंडारी समाजाच्या उन्नतीबरोबरच हिंदू धर्मातील व्यापक सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करणाऱ्या या संस्थेतून त्यांनी सार्वजनिक कार्यास प्रारंभ केला. १८९१ मध्ये काही काळ अबकारी खात्यात दुय्यम निरीक्षक म्हणून त्यांनी सरकारी सेवा केली; मात्र नोकरीच्या निमित्ताने दारू प्राशन करावी लागत असल्यामुळे त्यांच्या मनात नैतिक द्वंद्व निर्माण होऊन त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. १८९१ त्यांनी ‘मराठा ऐक्येच्छू सभे’चे सभासद होऊन समाजसुधारणेच्या कार्याला वाहून घेतले. १८९३ मध्ये मुंबई येथे झालेल्या हिंदू-मुस्लीम दंगलीदरम्यान बोले यांचे वडील केशवराव यांनी दंगेखोर मुसलमान जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला; तथापि यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. वडिलांच्या पश्चात बोले यांनी माझगाव येथील बेने इस्त्राईल परोपकारी मंडळींच्या मराठी शाळेत शिक्षकाची नोकरी पत्करली. यादरम्यान, गोविंद कृष्णाजी दळवी यांच्या ‘मराठा प्रॉव्हिडंट फंड’ या लोकोपयोगी संस्थेच्या स्थापनेला त्यांनी कृष्णराव अर्जुन केळूसकरांच्या समवेत हातभार लावला. तसेच वडिलांच्या ‘कित्ते भंडारी धर्म अथवा धर्मस्थान व्यवस्थापक मंडळी’ या संस्थेचे जातिऐक्याचे कार्यही विश्वस्त या नात्याने पुढे सुरू ठेवले.
मुंबई इलाख्यात १८९६–९७ मध्ये प्लेगची साथ, दुष्काळ आणि ब्रिटिश सरकारच्या धोरणांमुळे निर्माण झालेल्या संकटकाळात त्यांनी जनतेच्या गाऱ्हाण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. तसेच सामाजिक सुधारणा साध्य करण्यासाठी त्यांनी सरकारशी आवश्यक तेथे सहकार्य केले, परंतु स्वाभिमान न सोडता आपली तत्त्वनिष्ठा कायम जपली. याच सुमारास पत्नी आणि पुत्रवियोगाचे दुःख त्यांच्यावर कोसळले. पुढे रघुनाथ तात्या पावसकर यांची कन्या लक्ष्मीबाई हिच्याशी त्यांचा दुसरा विवाह झाला. पूर्णवेळ सामाजिक कार्य चालू असताना आपला निर्वाह चालू राहण्यासाठी बोले यांनी पितळेचा कारखाना चालू करून तो पुढे तीनेक वर्षे चालवला.
फेब्रुवारी १९०६ मध्ये मराठा ऐक्येच्छू सभेच्या माध्यमातून त्यांनी सक्तीचे व मोफत शिक्षण लागू करण्याची मागणी सरकार आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मंचावर मांडली. त्या काळी अस्पृश्य गणल्या जाणाऱ्या समुदायातील डॉ. भीमराव रामजी आंबेडकर १९०७ मध्ये मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांच्या सार्वजनिक सत्कारासाठी कृष्णराव केळूसकर यांच्यासह बोले यांनीही पुढाकार घेतला. डॉ. आंबेडकर आणि बोले यांच्यात पुढे दीर्घकाळ सहकार्याचे संबंध निर्माण झाले.
मुंबईतील कापड उद्योगात १९०९ मध्ये मंदी आली, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कामगार बेरोजगार झाले. तेव्हा बोले यांनी हरिश्चंद्र तालचेरकर आणि भिवाजी नरे यांच्या सहकार्याने ‘कामगार हितवर्धक सभा’ स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कामगारांसाठी व्याख्याने, मोफत शाळा, व्यसनमुक्ती उपक्रम आणि कायदेशीर सल्ला देण्यासारखी कामे केली. कामगारांसाठी ‘होलिका संमेलन’ आयोजित करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. १९११ साली ‘आर्यन ब्रदरहूड’ संस्थेच्या वतीने आयोजित सर्वजातीय सहभोजनाच्या कार्यक्रमातही बोले यांनी सहभाग घेतला. यावर काहींनी आक्षेप घेत त्यांना प्रायश्चित्त घेण्यास सांगितले. मात्र, बोले यांनी प्रायश्चित्त घेण्यास ठाम नकार दिला.
बोले यांच्या निःस्वार्थी आणि लोकहितार्थ केलेल्या कार्याची दखल घेऊन तत्कालीन सरकारने १९११ मध्ये त्यांना ‘जस्टिस ऑफ दि पीस’ (जे. पी.) ही बहुमानाची पदवी बहाल केली. १९१२ मध्ये त्यांची नेमणूक ‘मुंबईचे मानसेवी इलाखा दंडाधिकारी’ म्हणून झाली; तसेच करवीर पीठातर्फे शंकराचार्य श्री विद्यानंद भारती यांनी सत्कार्यासाठी व परोपकारासाठी आपले जीवित समर्पित करून निःस्वार्थी बुद्धीने कार्यरत असणाऱ्या बोलेंना ‘सत्कार्यप्रदीप’ ही पदवी प्रदान केली.
पहिल्या महायुद्धकाळात बोले यांनी भंडारी फलटण उभारण्याचा प्रयत्नही केला. १९१८ मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रेरणेने त्यांनी ‘पीपल्स युनियन’ (लोकसंघ) या संस्थेची स्थापना केली. बहुजन समाजाला राजकीय प्रतिनिधित्व आणि सामाजिक समता मिळवून देणे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश होता. जानेवारी १९१९ मध्ये सेंच्युरी मिलच्या संपात, तसेच त्यापूर्वी झालेल्या जी. आय. पी रेल्वेच्या संपावेळी बोले यांनी कामगार हितवर्धक सभेच्या माध्यमातून यशस्वी मध्यस्थी केली. शिवाय, २५ जुलै १९१९ रोजी ‘मुंबई गिरणी कामगारांची स्थिती’ या नावाची पुस्तिका प्रसिद्ध करून कामगारांच्या विदारक स्थितीवर प्रकाश टाकला. तसेच, त्या वर्षी मुंबईत डिसेंबर महिन्यात सुमारे दीड लाख कामगारांची मोठी परिषद भरवण्यात योगदान दिले. कामगारांचे हक्क सनदशीर मार्गाने मांडणे, औद्योगिक वादांत समन्वय साधणे आणि सरकारी हस्तक्षेपातून समेटाचा सुवर्णमध्य साधण्याची हातोटी हे त्यांच्या कामगार धोरणाचे मर्म होते.
मुंबई इलाख्यात १९१९ मधील महागाई आणि दुष्काळाच्या काळात बोले यांनी लोकसंघ आणि कामगार हितवर्धक सभा यांच्या माध्यमातून मुंबईत स्वस्त धान्याची दुकाने सुरू करून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. कामगारांच्या हक्कांसाठी भांडवलदारांविरुद्ध आवाज उठविण्याबरोबरच त्यांनी कोकणातील खोतीकुळांच्या न्याय्य हक्कांसाठी जमीनदारांविरुद्ध संघर्ष उभारला. खोती पद्धतीचे उच्चाटन आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक मुक्तीचा त्यांनी सातत्याने पुरस्कार केला. ८ मार्च १९२० रोजी बोले यांनी कोकणात पिके बुडाल्यामुळे खोती असलेल्या गावांतील कुळांकडून सारा गोळा करू नये अशी विनंती सरकारला केली. भांडवलशाही कामगारांना पिळून काढते म्हणून गिरणीधंद्याचे राष्ट्रीयीकरण करावे, तर जमीनदारशाही शेतकऱ्यांना छळते, म्हणून रशियातील पद्धतीप्रमाणे जमिनी वाटून दिल्याशिवाय शेती व शेतकरी यांची केव्हाही सुधारणा होणार नाही असे ठाम मत त्यांनी पुढे ‘नवयुग’ मधून व्यक्त केले.
नोव्हेंबर १९२० मध्ये ते मुंबई उत्तर मतदारसंघातून प्रांतिक विधिमंडळावर मराठे आणि तत्समान जातींसाठी राखून ठेवलेल्या जागेवरून निवडून आले. सदस्य म्हणून त्यांनी सक्तीचे व मोफत शिक्षण, बहुजन व अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, कामगार संरक्षण, स्त्रियांना मतदानाचा हक्क, कोकणातील वाहतूक व्यवस्था आणि इतर अनेक लोकहिताच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. ६ ऑक्टोबर १९२२ रोजी बोले यांनी कोकणातील खोती पद्धत कालबाह्य झाली असून ती रद्द करावी असा ठराव सर्वप्रथम मांडला, तर १९२३ मध्ये न्यायालये, पाणवठे यांसारखी सरकारी सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांसाठी खुली करण्याचा ऐतिहासिक ठराव मांडून तो संमत करून घेतला. या ठरावाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांनी पुढेही सातत्याने प्रयत्न केले. पुढे १९२७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाडच्या चवदार तळ्याचा जो सत्याग्रह झाला, त्यामागे बोले यांच्या या ठरावाचे कायदेशीर अधिष्ठान होते, असे म्हणता येईल.
बहुजन समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी बोले यांनी १९२५ मध्ये ‘नवयुग’ हे साप्ताहिक सुरू केले. या साप्ताहिकात त्यांनी कोकण रेल्वेची आवश्यकता बोलून दाखवली आणि १९२६ मध्ये थेट प्रांतिक विधिमंडळात या योजनेचा पाठपुरावा सरकारकडे केला. त्याच वर्षी त्यांनी ग्रामजोशींच्या वंशपरंपरागत दक्षिणा हक्काच्या विरोधात जोशी वतन विधेयक मांडले. हे विधेयक संमत होऊन या कालबाह्य प्रथेला कायदेशीर आळा घालण्यात महत्त्वाचे पाऊल उचलले गेले. १९२७ मध्ये बोले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई प्रांतिक विधिमंडळावर सरकारनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती झाली. विधिमंडळात महार वतन निर्मूलनासह सामाजिक न्यायाच्या विविध प्रश्नांवर त्यांनी डॉ. आंबेडकरांना सक्रिय पाठिंबा दिला. कामगार चळवळ, अस्पृश्योद्धार आणि सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रातही दोघांचे सहकार्य पुढे कायम राहिले.
बोले यांनी १९२८ मध्ये सायमन आयोगासमोर कोकणचे शेतकरी संघ व तिल्लोरी कुणबी संघाच्या वतीने साक्ष देऊन त्यांची कैफियत मांडली. ब्राह्मणेतर पक्षात उद्भवलेल्या मराठे व मराठेतर संघर्षात ‘नवयुग’मधून बोले पक्षात एकजूट व्हावी अशी बाजू सातत्याने मांडत होते. तसेच ते मुंबईतील सहकारी चळवळीचा प्रसारही करत होते. बोले यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन तत्कालीन सरकारने त्यांना ‘रावबहादूर’ ही पदवी देऊन गौरविले (१ मार्च १९२९). विधिमंडळात नगरपालिका प्रशासन, पोर्ट ट्रस्ट, सार्वजनिक शिक्षणात मागास, मुस्लीम व अस्पृश्य समाजाचे प्रतिनिधित्व, देवदासी प्रथा बंदी, सार्वजनिक वाचनालयांचा विकास, वेश्याव्यवसायावरील नियंत्रण आणि संततीनियमनासंबंधी जनजागृती अशा विविध विषयांवर ठराव व विधेयके मांडली. संततीनियमनाच्या प्रश्नावर माहिती देणारी आरोग्य केंद्रे सरकारने सुरू करावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले, मात्र त्याला फारसा पाठिंबा मिळू शकला नाही. १९३७ च्या निवडणुकीतील पराभवानंतर त्यांचे विधिमंडळातील कार्य संपुष्टात आले.
बोले १९३८ पासून हिंदुमहासभेच्या कार्यात सक्रिय झाले. तत्पूर्वी, ते डॉ. आंबेडकरांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे उमेदवार म्हणून एक निवडणूक हरले होते. पुढे मुंबई प्रांतिक हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. याच काळात ते कोकण प्रांत शेतकरी संघाचे अध्यक्षही होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कोकणातील धान्यटंचाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारकडे महसूल वसुलीत सवलत, नफेखोरीवर नियंत्रण आणि शिधावाटप व्यवस्था प्रभावी करण्याची मागणी केली.
वयाच्या ब्याण्णव्या वर्षी मुंबई येथे ट्रक अपघातात ते जखमी झाले, त्यातच पुढे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- कांबळे, आर. एच., ‘ऐतिहासिक शोधनिबंध’, डायमंड पब्लिकेशन्स, पुणे, २०१८.
- कीर, धनंजय, ‘लोकहितकर्ते बाबासाहेब बोले’, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९७८.
- फडके, य. दि., ‘विसाव्या शतकातील महाराष्ट्र’, खंड ३, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, १९९१.
- फडके, य. दि., ‘विसाव्या शतकातील महाराष्ट्र’, खंड ४, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, १९९३.
- बागूल, योगीराज, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी’, (भाग १), दुसरी आवृत्ती, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, २०१५.
- मोरे, सदानंद, ‘लोकमान्य ते महात्मा’, खंड पहिला, चौथी आवृत्ती, राजहंस प्रकाशन, पुणे, २०१८. (प. आ. २००७).
समीक्षक : श्रद्धा कुंभोजकर
