ब्लॅक, सर जेम्स डब्ल्यू. : (१४ जून १९२४ — २२ जून २०१०). स्कॉटिश औषधिशास्त्रज्ञ. अनेक महत्त्वाच्या रोगांच्या उपचारासाठी अत्यावश्यक असणारी औषधे विकसित केल्याबद्दल ब्लॅक यांना गर्ट्रड बी. एलिअन आणि जॉर्ज हर्बर्ट हिचिंग्ज यांच्यासमवेत १९८८ चे वैद्यक वा शरीरक्रियाविज्ञान विषयाचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले.
ब्लॅक यांचा जन्म स्कॉटलंडमधील अडिंगस्टन या गावात झाला. ऑश्टरडेरनच्या प्राथमिक शाळेत आणि नंतर कौड्नबेथ माध्यमिक शाळेत त्यांचे अध्यापन झाले. पुढे त्यांनी विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे त्यांचे वैद्यकीय महाविद्यालयातील वस्तीगृहात राहण्याचा खर्च माफ करण्यात आला. त्यांनी सेंट अँड्र्यू विद्यापीठातून वैद्यकीय पदवी संपादन केली (१९४६). पुढील १० वर्षे त्यांनी विविध विद्यापीठांमध्ये अध्यापन केले आणि त्यानंतर इम्पीरियल केमिकल इंडस्ट्रीजमध्ये वरिष्ठ औषध-शास्त्रज्ञ या पदावर रुजू झाले (१९५८). त्यानंतर ते स्मिथ क्लाइन अँड फ्रेंच लॅबोरेटरीजमध्ये जीवशास्त्रीय संशोधन विभागाचे प्रमुख झाले (१९६४) आणि वेलकम रिसर्च लॅबोरेटरीजमध्ये उपचारात्मक संशोधन संचालक म्हणून सामील झाले (१९७८). ते १९८४ पासून लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये विश्लेषणात्मक औषधिशास्त्राचे प्राध्यापक होते आणि १९९३ मध्ये तेथेच ते गुणश्री प्राध्यापक झालेत. १९९२—२००६ या काळात त्यांनी स्कॉटलंडमधील डंडी विद्यापीठाचे कुलपती म्हणून काम पाहिले; त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून विद्यापीठाने सर जेम्स ब्लॅक सेंटर उभारले. त्यामध्ये कर्करोग, उष्णकटिबंधीय आजार आणि मधुमेह यांच्या संशोधन करण्यात येते. १९८१ मध्ये त्यांना सर (Knighthood) हा किताब देण्यात आला आणि २००० मध्ये ते ऑर्डर ऑफ मेरिटचे सदस्य बनले.
ब्लॅक यांचे संशोधन सेरोटॉनीन या संप्रेरकाचा जठरात तयार होणाऱ्या आम्लाच्या स्रावावरील परिणाम आणि हृदय धमनीत मेद साठून अरुंद होणे यांवर केंद्रित होते. हृदयाची धमनी हृदय स्नायूंना रक्त आणि ऑक्सिजन पुरवते. अरुंद हृदय धमनीतून कमी रक्त उपलब्ध होते. त्यामुळे हृदयाच्या त्या भागातील स्नायू मरतात. ऑक्सिजनची अतितीव्र कमतरता निर्माण झाली तर हृदयाचे काम बंद होते.
ब्लॅक यांच्या लक्षात आले की, रोग्याच्या हृदय-स्नायूंना पुरेसे ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. हृदय-स्नायूंना पुरेसे ऑक्सिजन बाहेरून पुरवणे कठीण आहे. अणीबाणीच्या प्रसंगी शरीरात अॅड्रिनॅलीन (एपिनेफ्रिन) संप्रेरक स्रवते. या संप्रेरकामुळे हृदय उत्तेजित होऊन हृदयाचे ठोके वाढतात आणि हृदय-स्नायूंची ऑक्सिजनची गरज वाढते. पेशींच्या बाह्य पृष्ठावर अॅड्रिनॅलीन-ग्राही रेणू असतात. पेशींना ॲड्रिनॅलीन उपलब्ध झाले नाहीत, तर हृदय-स्नायूंची ऑक्सिजनची प्रमाण गरज कमी होऊन वेदना होणार नाही, असा त्यांचा कयास होता.
ब्लॅक यांनी हृदयविकार उपचारासाठी बीटा ब्लॉकर्स या नव्या औषधांचा शोध लावला. सुरुवातील त्यांनी प्राथमिक रेणू प्रॉप्रॅनोलॉल मिळाला. त्याच्या रेणूचा काही भाग आकाराने अॅड्रिनॅलीन रेणूसारखा होता. तो पेशीवरील अॅड्रिनॅलीन-ग्राहीवर चिकटून बसल्याने उच्च रक्तदाब कमी करण्यास वापरला जाऊ लागला. पुढे त्यापासून जास्त प्रभावी बीटा ब्लॉकर्स औषध जगभर उपलब्ध झाले. अन्जायना पेक्टोरिसमुळे (छातीत तीव्र वेदना होणे) श्वास घुसमटून हृदयाला ऑक्सिजन कमी मिळाल्याने होणाऱ्या तीव्र वेदना बीटा ब्लॉकर्समुळे कमी करता आले. बीटा ब्लॉकर्सचे पुढीलप्रमाणे आणखीही काही उपयोग आहेत : हृदयाच्या ठोक्यांची लय नियमित ठेवणे, उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवणे, हातापायाचे थरथरणे कमी करणे, अर्धशिशी पासून दिलासा इत्यादी.
ब्लॅक यांना गॅस्ट्रिन आणि हिस्टामीन या दोन्ही संप्रेरकांमुळे जठरात हायड्रोक्लोरिक आम्ल स्रवण्यास उत्तेजन मिळते, याची कल्पना होती. हायड्रोक्लोरिक आम्लाचा अतिरिक्त स्राव झाला तर जठरात व्रण होऊ शकतात. ब्लॅक आणि सहकारी संशोधकांनी तब्बल नऊ वर्षे प्रयत्न केले आणि सिमेटिडीन रेणू शोधला.
ब्लॅक यांना पुढीलप्रमाणे काही प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले : लास्कर द बेकी क्लिनिकल मेडिकल अॅवार्ड, मुलार्ड अॅवार्ड, आर्त्व्वा बॅल्येत ल तुअर आरोग्य पुरस्कार, वैद्यक क्षेत्रातील बहुमानाचे समजला जाणारा वुल्फ पुरस्कार, शीले पुरस्कार, वेलकम ट्रस्टचे सुवर्ण पदक इत्यादी. ब्लॅक यांना प्रख्यात औषध कंपनीनी १९८८ मध्ये जेम्स ब्लॅक फाउंडेशन ही संशोधन संस्था स्थापण्यास मदत केली.
ब्लॅक यांचे दीर्घ आजारानंतर लंडनमध्ये निधन झाले.
कळीचे शब्द : #पृथक्करणात्मक #औषधशास्त्र
संदर्भ :
- https://www.nobelprize.org/prizes/medicine/1988/black/biographical/
- https://www.nature.com/articles/4641292a
- https://www.nobelprize.org/prizes/medicine/1988/black/facts/
- https://en.wikipedia.org/wiki/James_Black_(pharmacologist)
समीक्षक : मोहन मद्वाण्णा