उदास, गजानन राजाराम : (२८ मार्च १९२१ – १८ जानेवारी १९९५). भारतातील भूवैज्ञानिक, कुशल अन्वेषण शास्त्रज्ञ आणि दूरदर्शी प्रशासक. भारत सरकारच्या परमाणू ऊर्जा विभागाच्या अंतर्गत असलेले अणुखनिज प्रभागाचे (Atomic Minerals Division) ते माजी संचालक होते. या प्रभागाला आज अणुखनिज संचालनालय (Atomic Minerals Directorate for Exploration and Research, AMD – एएमडी) म्हणून ओळखले जाते. भारताच्या अणुखनिज अन्वेषण कार्यक्रमाचे ते प्रमुख शिल्पकार असून त्यांचे यूरेनियम संसाधनांचा शोध, कार्बोनाटाइट भूविज्ञान, दुर्मीळ मृत्तिका मूलद्रव्ये (Rare Earth Elements), फ्लोराइट खनिजीकरण आणि सामरिक (strategic) खनिजांच्या संशोधनात अत्यंत मोलाचे योगदान आहे.
उदास यांचा जन्म अहमदनगर (आताचे अहिल्यानगर) येथे झाला. त्यांचे बालपण देशभक्तीपूर्ण वातावरणात गेले, त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी १९४२च्या स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग घेतला आणि त्यासाठी त्यांना चार महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षाही भोगावी लागली. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून (तेव्हाचे बॉम्बे विद्यापीठ) भूविज्ञान विषयात एम.एस्सी. पदवी संपादन केली (१९४४). पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी स्वातंत्र्यपूर्व भारतातील उत्तर-पश्चिम सीमाप्रांतातील (सध्याचे पाकिस्तान) चित्राल येथील अँटिमनी खाणीत खाण व्यवस्थापक म्हणून कार्य केले. १९४७च्या फाळणीनंतर ते पाकिस्तानात अडकले; परंतु अत्यंत धोकादायक परिस्थितीत पठाणाचा वेष धारण करून त्यांनी भारतात परतण्याचा साहसी प्रवास केला. भारतात परतल्यानंतर १९५० मध्ये त्यांची नव्याने स्थापन झालेल्या अणुखनिज प्रभागात नियुक्ती झाली. त्यानंतर ते झारखंड राज्यातील सिंहभूम पट्ट्यातील जादुगुडा येथील प्रारंभीच्या यूरेनियम अन्वेषण आणि खाण विकास कार्याशी खाण भूवैज्ञानिक म्हणून जोडले गेले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रायोगिक खाणकाम सुरू केले आणि दोन अन्वेषण बोगदे (exploratory adits) विकसित करण्यात आले. पुढे याच साठ्यावर भारताची पहिली यूरेनियम खाण उभारली गेली, त्यामुळे देशाच्या अणुऊर्जा कार्यक्रमाला भक्कम पाया प्राप्त झाला. त्याचबरोबर त्यांनी याच पट्ट्यातील नरवापहाड आणि भाटीण या यूरेनियमच्या खाणींचा विकास करण्यात मोठे योगदान दिले.
उदास यांनी कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात देशातील दुर्गम भागांत व्यापक क्षेत्रीय सर्वेक्षण केले. भूवैज्ञानिक नकाशांकन, रेडिओमेट्रिक सर्वेक्षण, खनिज अन्वेषण आणि भूशास्त्रीय तपासण्या यांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. कठीण भौगोलिक परिस्थितीत काम करून त्यांनी यूरेनियमयुक्त भूगर्भीय संरचनांची ओळख पटविण्यास आणि संभाव्य खनिज क्षेत्रे शोधण्यास महत्त्वपूर्ण हातभार लावला. त्यांनी १९६५ मध्ये प्रख्यात भूवैज्ञानिक प्रा. सुखेशवाला यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरातमधील अंबाडोंगर येथील कार्बोनाटाइट आणि अल्कलाइन खडकांवर संशोधन करून पीएच.डी पदवी प्राप्त केली. अंबाडोंगर कार्बोनाटाइटवरील त्यांचे संशोधन भारतातील अग्रगण्य आणि मूलभूत संशोधनांपैकी एक मानले जाते. या अभ्यासामुळे फ्लोराइट आणि दुर्मीळ मृत्तिका मूलद्रव्यांच्या खनिजीकरणाचे आर्थिक महत्त्व अधोरेखित झाले. त्यांनी कार्बोनाटाइट, अल्कलाइन खडक, फेनिटायझेशन, फ्लोराइट साठे, समस्थानिक भूविज्ञान आणि खनिज अन्वेषण यांवर अनेक शोधनिबंध प्रकाशित केले. कार्बोनाटाइट भूविज्ञान आणि सामरिक खनिजांच्या अभ्यासातील अग्रणी तज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती निर्माण झाली. १९६६-६७ मध्ये त्यांनी सागर विद्यापीठातील (आताचे डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठ) भूविज्ञानाच्या प्रगत अध्ययन केंद्रात अभ्यागत शास्त्रज्ञ म्हणून कार्य केले.
उदास यांनी १९७४ मध्ये अणुखनिज संचालनालयाच्या संचालकपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांचा कार्यकाळ संस्थेच्या इतिहासातील एक परिवर्तनकारी पर्व मानला जातो. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली एएमडीमध्ये अनेक मूलभूत सुधारणा राबविण्यात आल्या. त्यांच्या पुढाकाराने १९७४ मध्ये एएमडी चे मुख्यालय नवी दिल्लीहून हैदराबाद येथे स्थलांतरित करण्यात आले. त्याचबरोबर हैदराबादसह विविध प्रादेशिक केंद्रांमध्ये एएमडीची स्वतंत्र कार्यालये आणि प्रयोगशाळा सुविधा उभारण्यात आल्या. आज हैदराबाद हे एएमडीचे प्रमुख केंद्र म्हणून कार्यरत आहे.
उदास हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे समर्थक होते. उच्च-संवेदनक्षम हवाई स्पेक्ट्रोमेट्रिक आणि चुंबकीय सर्वेक्षण तंत्रज्ञानाचा वापर सुरू करून खनिज अन्वेषण अधिक वैज्ञानिक, अचूक आणि परिणामकारक केले. भूविज्ञान, भूभौतिकी, भू-रसायनशास्त्र आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा समन्वय साधून त्यांनी बहुविषयक अन्वेषण पद्धती विकसित केली. सिंहभूम परिसराच्या बाहेरही छत्तीसगडमधील भंडारितोला आणि जजावल यांसारख्या यूरेनियम क्षेत्रांचा शोध लागला. उत्तर-पश्चिम हिमालयाच्या शिवालिक आणि अन्य क्षेत्रांमधील अवसादी खडकामध्ये यूरेनियमच्या अनेक श्रोतांचा शोध लागला. तसेच ओडिशा, बिहार आणि कर्नाटकमध्ये कोलंबाइट-टँटॅलाइट, बेरिल आणि स्पॉड्युमीन यांसारख्या दुर्मीळ धातूंनी समृद्ध नवीन पेग्माटाइट पट्ट्यांची ओळख पटली. त्यांनी १९७६ मध्ये शिलाँग येथे एएमडीच्या ईशान्य विभागाची स्थापना करून ईशान्य भारतातील खनिज अन्वेषण कार्याला नवी चालना दिली. पोखरण येथील पहिल्या अणुचाचणीनंतर (मे १९७४) भारतावर लादण्यात आलेल्या तांत्रिक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नायोबियम-टँटॅलम (Nb-Ta) अन्वेषण गटाची स्थापना केली. या उपक्रमामुळे देशातील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या दुर्मीळ धातूंच्या शोध आणि मूल्यांकनाला नवी दिशा मिळाली. त्यांनी गुजरात, तमिळनाडू आणि मेघालय येथील कार्बोनाटाइट क्षेत्रांमध्ये दुर्मीळ मृत्तिका मूलद्रव्ये आणि दुर्मीळ धातूंच्या अन्वेषणाला विशेष प्रोत्साहन दिले.
उदास यांनी संस्थेतील मानव संसाधन विकासालाही महत्त्व दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे एएमडीमध्ये भाभा अणुसंशोधन केंद्राच्या धर्तीवरील गुणवत्ताधारित पदोन्नती योजना लागू झाली. त्यांनी अनेक तरुण वैज्ञानिकांना संशोधन, नवोपक्रम आणि व्यावसायिक प्रगतीसाठी प्रेरित केले. ते अनेक संशोधकांचे प्रेरणादायी मार्गदर्शकही होते. निवृत्त झाल्यानंतर (१९८१) त्यांनी काही काळासाठी नॉर्थ-ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटी (NEHU) येथे भूविज्ञान विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली.
उदास यांच्या स्मरणार्थ अनेक व्याख्यानमाला आणि वैज्ञानिक कार्यक्रम आयोजित केले जातात. इंडियन सोसायटी ऑफ अप्लाइड जिओकेमिस्ट्स (ISAG) यांच्या वतीने डॉ. जी. आर. उदास स्मृती पदक स्थापन केले आहे. १९९९ मध्ये एएमडीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात हैदराबाद येथील एएमडी संकुलाला डॉ. उदास यांचे नाव देऊन त्यांना अभिवादन करण्यात आले.
उदास यांचे निधन पुणे येथे झाले.
संदर्भ :
https://amd.gov.in/WriteReadData/userfiles/file/Note_on_Dr_Udas_Centenary.pdf
समीक्षक : मिलिंद दुसाने