‘कोर्ट’ या चित्रपटाचे प्रतिकात्मक चित्र

वास्तववादी शैलीतील भारतीय चित्रपट. चैतन्य ताम्हाणे लिखित आणि दिग्दर्शित ‘कोर्ट’ हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट आहे. यामध्ये मराठी आणि हिंदी, गुजराती, इंग्रजी या भाषांचा वापर करण्यात आलेला आहे. भारतीय समाजातील मूलभूत विषमता आणि अमानुष व्यवस्था यांचे दर्शन या चित्रपटात कलात्मक पद्धतीने होते. ‘प्युअर सिनेमा’ आणि ‘स्लो सिनेमा’ या वर्गवारीतही या चित्रपटाचा समावेश केला जातो.

नारायण कांबळे या ज्येष्ठ दलित विद्रोही लोकगायक आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या न्यायालयीन लढाईभोवती हा चित्रपट फिरतो. मुंबईतील सत्र न्यायालयात त्यांच्यावर खटला चालू आहे. त्यांच्या एका लोकगीताच्या सादरीकरणामुळे एका सफाई कामगाराने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवलेला आहे. अरेषीय पद्धतीने उलगडणाऱ्या या चित्रपटात नारायण कांबळे, वकील, न्यायाधीश आणि इतर पात्रांच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्याचे भाग दाखवत, न्यायालयीन प्रक्रियेतील धीम्या गतीची आणि अनाठायी तांत्रिक गुंतागुंतीची झलक यात दाखवली आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक समूहांचे अनेक स्तरांवरील जगणे, सामाजिक उतरंड, जातीय व वर्गीय राजकारण आणि त्यांतून झालेली माणसांची जडणघडण; तसेच एकमेकांविषयी त्यांचे असणारे पूर्वग्रह आणि कूपमंडूक वृत्ती — या सर्वांतून उभे राहिलेले सामान्य माणसांचे वास्तवविश्व दिसून येते.

या चित्रपटाच्या पटकथेत अनेक सूक्ष्म दृक्‌घटक चित्रपटीय भाषेत पेरलेले असून ते चित्रपटीय अनुभवाचे मूल्यवर्धन करणारे आहेत. कथानकातील लहानलहान घटनासदृश प्रसंग चित्रपटाचा आशय सुसंगत करण्यासाठी प्रेरक ठरतात. उदाहरणार्थ, मुंबईत आलेल्या परप्रांतीयांविषयीचे विनोदी नाटक; उपहारगृहात सादर केलेले, ब्राझीलच्या रस्त्यावर गायले जाणारे पुर्तगाली गीत.

या चित्रपटासाठी बहुतांश कलाकार जाणीवपूर्वक अव्यावसायिक किंवा सर्वसामान्य माणसे निवडलेली आहेत. यासाठी एकूण १८०० व्यक्तींची निवडचाचणी झाली आणि ही कलाकार निवडप्रक्रिया एक ते दीड वर्ष चालली. प्रमुख कलाकारांपासून पार्श्वभूमीतील कलाकारांपर्यंत सर्वांची निवड वैयक्तिक रीत्या अनेक चाळण्या लावून करण्यात आली. या कलाकारांच्या अनेक कार्यशाळा घेण्यात आल्या. त्यांना वैयक्तिक स्तरावर संशोधनही करायला लावण्यात आले. या चित्रपटातील कलाकार निवडीचे आंतरराष्ट्रीय स्तरावरही कौतुक झाले. प्रत्यक्ष चित्रीकरणापूर्वी सर्व कलाकारांकडून भरपूर सराव करून घेण्यात आला आणि त्यांच्या नैसर्गिक अभिनयावर भर देण्यात आला.

या चित्रपटाचे छायाचित्रण तटस्थ व निरीक्षणात्मक शैलीत केलेले आहे. चित्रपटातील दोन दृश्ये वगळता सर्व दृश्ये स्थिर कॅमेऱ्याने चित्रित केलेली आहेत. कॅमेरा शक्यतो पात्रांपासून दूर ठेवून चित्रचौकटीतील सर्व घटक दिसतील अशाप्रकारे बहुतांश चित्रीकरण झालेले दिसते. काही दृश्ये सलग पाच मिनिटांच्या लांबीची आहेत. १९९० ची दाखवलेली मुंबई, बहुतांश दृश्यांचे चित्रीकरण वास्तव स्थळांवर, न्यायालयाचे वास्तववादी देखावे, निर्मितीचा दर्जा राखण्यासाठी लहानशा दृश्याकरिता प्रत्यक्ष रेल्वेमध्येही चित्रीकरण ही चित्रपटाची काही इतर ठळक वैशिष्ट्ये होत. यातील कपडेपट आणि रंगभूषा अतिवास्तव आहेत. प्रकाशयोजनेतही कुठल्याही प्रकारची प्रकाशीय नाट्यमयता टाळलेली आहे. उदासीन छटा असलेला रंगपट निळ्या, पिवळ्या आणि राखाडी छटांमध्ये आहे.

चित्रपटात पार्श्वसंगीताचा अभाव आहे; मात्र विद्रोही नायकाच्या तोंडी दोन अर्थगर्भ विद्रोही गीते आहेत. संभाजी भगत यांनी ही गीते लिहिली, गायली आणि संगीतबद्ध केली आहेत. एक पुर्तगाली गीताचाही यात समावेश आहे. न्याय प्रक्रियेतील कंटाळवाण्या, धीम्या गतीचा अनुभव देण्यासाठी चित्रपटाची गती अत्यंत संथ ठेवली आहे, जाणीवपूर्वक असे संकलन केले आहे. चित्रपटाचे रंगसंपादन (कलर ग्रेडिंग) जर्मनीतील बर्लिन येथे करण्यात आले.

या चित्रपटाचे निर्माते विवेक गोम्बर यांनी वैयक्तिक रीत्या झू एंटरटेनमेंट या संस्थेच्या माध्यमातून या चित्रपटाची निर्मिती केली. दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांचा हा पहिलाच पूर्ण लांबीचा चित्रपट असून चित्रपट निर्मितीचे औपचारिक प्रशिक्षण नसताना एक माहितीपट आणि एक लघुपट यांच्या निर्मितीच्या अनुभवावर त्यांनी या चित्रपटाचे यशस्वी दिग्दर्शन केले. त्यावेळी त्यांचे वय पंचवीस वर्षे होते. गीतकाराच्या व्यक्तिरेखेची भूमिका साकारणारे अभिनेता वीरा साथीदार, कलाकार निवड प्रमुख सच्चित पुराणिक तसेच या चित्रपटाचे नेपथ्यकार व संकलक या सर्वांचा हा पहिलाच चित्रपट होता.

या चित्रपटाने ७१व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘होरिझन्स’ विभागात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पुरस्कार पटकावला, तसेच दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांना ‘लुईजी डी लॉरेन्टीस’ पुरस्काराने गौरवण्यात आले. याशिवाय ‘कोर्ट’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर एकूण ३० हून अधिक पुरस्कार पटकावले आहेत.

भारतामध्ये ‘कोर्ट’चे पहिले प्रदर्शन २०१४ च्या मुंबई चित्रपट महोत्सवातील आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक विभागात झाले. त्यानंतर, १७ एप्रिल २०१५ रोजी हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या संवेदनशील विषयामुळे चित्रपटगृह चालकांनी निर्मात्याकडून हमीपत्रही घेतले होते.

‘कोर्ट’ने ६२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ हा ‘सुवर्ण कमळ’ पुरस्कार जिंकला. तसेच, ८८व्या अकादमी पुरस्कारांमध्ये (ऑस्कर) ‘सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट’ या श्रेणीसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून त्याची निवड करण्यात आली होती.

संदर्भ :

  • Bhushan, Nyay, “Oscars : India Selects ‘Court’ For Foreign-Language Category”, The Hollywood Reporter, Retrieved 24 September 2015.

समीक्षक : संतोष पाठारे