उत्तर कोकणातील मुरुड-जंजिरा येथील आफ्रिकन वंशाच्या सिद्दी नामक मुसलमान सत्ताधीशांनी पाडलेली नाणी. इ. स. सोळाव्या शतकात सिद्दींची सत्ता मुरुडजवळच्या भागात निजामशाहीशी संगनमताने प्रस्थापित झाली. त्यानंतर कधी आदिलशाही तर कधी मोगलांचे नाममात्र सार्वभौमत्व मान्य करून सिद्दींनी आपले स्वतंत्र अस्तित्व राखण्यात नेहमीच यश मिळवले. छ. शिवाजी महाराजांपासून उत्तर पेशवाईपर्यंत मराठ्यांशीही सिद्दींचा खूपवेळेस संघर्ष झाला. इ. स. १७३४ च्या जंजिरा मोहिमेनंतरही सिद्दींचे अस्तित्व पूर्णपणे नष्ट झाले नाही. ब्रिटिशांशीही सिद्दींचा संघर्ष झाला. इ. स. १७४६ मध्ये सुरतेचा नवाब तेगबख्त खान मरण पावल्यावर त्याच्या वारसांतील सत्तासंघर्षातही सिद्दींनी ब्रिटिशांना पाठिंबा दिल्याने त्या बदल्यात काठेवाड किनारपट्टीवर जाफराबाद येथील काही प्रदेश ब्रिटिशांनी त्यांना दिला. पुढे इ. स. १७८० नंतर सिद्दींच्या अंतर्गत सत्तासंघर्षाचा फायदा मिळून मराठ्यांच्या ताब्यात अखेरीस जंजिरा येण्याची चिन्हे दिसू लागली, मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. मराठ्यांच्या आश्रयास आल्याने नाना फडणीसांनी सिद्दी बालू मिया याला सुरतेजवळ सचिन येथे काही प्रदेश दिला. यानंतर इ. स. १८३४ सालापासून सिद्दींवर ब्रिटिशांचे वर्चस्व प्रस्थापित झाले व इ. स. १९४८ मध्ये जंजिरा संस्थान भारतात विलीन झाले. कोकण किनारपट्टीखेरीज गुजरात किनारपट्टीवरही दोन ठिकाणी सिद्दींचा अंमल होता. यांत चांदी, तांबे व सोन्याच्या नाण्यांचा समावेश होतो.

सिद्दींच्या प्रदेशातील चांदीचे रुपये हा अंकुशी रुपयांचाच एक प्रकार होता. हे रुपये इ. स. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात पेशव्यांनी पाडल्यावर त्याचा दख्खनमध्ये अनेक ठिकाणी प्रसार झाला. पेशव्यांनी पाडलेल्या अंकुशी रुपयांपेक्षा यांत वेगळे उठून दिसणारे चिन्ह म्हणजे मागील बाजूस देवनागरी लिपीतील ‘ज’ हे अक्षर तिरके उमटवलेले दिसते. एका लहानशा वर्तुळात ‘ज’ हे अक्षर असलेली ही नाणी जंजिऱ्याचे चिन्ह दर्शवितात, असे संशोधकांचे मत आहे. यालाच काही ब्रिटिशकालीन अभ्यासकांनी ‘हबशी निशाणी’ असाही शब्द वापरला आहे. व्यापारानिमित्ताने जंजिरा राज्यात आलेल्या अंकुशी रुपयांवर ‘ज’ हे चिन्ह उमटवून सिद्दी शासक त्यांचे चलन सुरू ठेवत. मुळात सिद्दींनी त्यांच्या प्रदेशात पाडलेले रुपये या ‘ज’ चिन्हांकित रुपयांपेक्षा वेगळे आहेत. त्यांवरही वर्तुळांकित ‘ज’ अक्षर असून, मुख्य भिन्नत्वदर्शक चिन्ह म्हणजे, पुढील बाजूस जिथे तीन ओळींत मोगल बादशाहचे नाव असते तिथे, वरील ओळ ही खालील ओळीच्या आरशातील प्रतिमेप्रमाणे अंकित केलेली आढळते. उपलब्ध साधनांत असे रुपये पाडण्यामागील कारणांचा स्पष्टपणे उल्लेख सापडत नाही. मात्र तत्कालीन चलनव्यवस्थेच्या परिप्रेक्षात याचे स्पष्टीकरण देणे शक्य आहे. तत्कालीन बाजारात अनेक प्रकारची, विविध शुद्धतेची नाणी चलनात असत. जर स्वत: नाणी न पाडता फक्त इतर राज्यांमधील नाण्यांवरच एखादे चिन्ह उमटवून ती स्वत:च्या प्रदेशात चालवल्यास त्यांमधील शुद्धतेवर सिद्दींचे नियंत्रण राहिले नसते. शुद्धतेवर नियंत्रण ठेवल्यास सिद्दींचे या व्यवस्थेवर आपसूकच वर्चस्व राहत असल्यामुळे सराफांकडून आकारली जाणारी तूटही विशिष्ट मर्यादेतच राहणे क्रमप्राप्तच होते. त्यामुळेच सिद्दींनी अशी वेगळी नाणी स्वत:हून पाडणे हे आर्थिकदृष्ट्या त्यांच्या फायद्याचे होते. आणि नाणे व राजकीय सत्ता या दोहोंमधील परस्परसंबंधाचा सिद्दींनी किमान चांदीच्या रुपयांपुरता तरी विचार केलेला दिसत नाही, कारण जंजिरा संस्थानातील सर्व रुपये हे मुळात पेशव्यांनी मोगल बादशाहच्या नावे पाडलेल्या अंकुशी रुपयाचेच प्रकार होते.

शाह आलमच्या नावे पाडलेला सिद्दींचा चांदीचा रुपया. छायाचित्र सौजन्य : https://www.numisbids.com/n.php?p=lot&sid=3724&lot=626

तत्कालीन पुरावे पाहता सिद्दी इब्राहिम खान दुसरा याच्या काळातच जंजिऱ्याची स्वतंत्र नाणी पाडण्याची सुरुवात झाली असावी. इ. स. १७८९-१७९४ आणि इ. स. १८०३-१८२५ हा त्याचा शासनकाळ होय. सिद्दी इब्राहिम खान दुसरा यानंतर सिद्दी मुहम्मद खान जंजिऱ्याच्या गादीवर आला आणि त्याच्या शासनकाळातच इ. स.१८३४ मध्ये तेथील रुपयांची टांकसाळ बंद झाली.

जंजिऱ्याच्या रुपयांपेक्षा तेथील तांब्याचे पैसे अधिक प्रमाणात आढळतात. साधारणत: ६ ते ८ ग्रॅमच्या आधारभूत नाण्यांवर ते बेतले असले तरी प्रत्यक्षात वजनात बरीच तफावत आढळते. जंजिऱ्याचे सर्वांत जुने ज्ञात तांब्याचे नाणे हे सिद्दी मुहम्मद खान याच्या नावचे असून, त्यावर फार्सी भाषेत एका बाजूस ‘आलमगीर बादशाह गाझी’ व दुसऱ्या बाजूस ‘सिदी मुहम्मद खान फिदवी’ असा मजकूर आढळतो. औरंगजेबाने सिद्दींना मोगल आरमाराचे प्रमुख नेमले होते हे लक्षात घेतल्यास या मजकुराचा उलगडा होतो. फिदवी या शब्दाचा अर्थ ‘नोकर’ असा होतो. काही नाण्यांवर समोरच्या बाजूस फिदवी या शब्दाऐवजी हिजरी वर्ष येते, तर काही नाण्यांवर बादशाहच्या नावालगत एक आडवी रेषही येते.

तांब्याचा पैसा, सिद्दी इब्राहिमखान तिसरा, (इ.स.१७८९-१७९२). छायाचित्र सौजन्य : https://www.zeno.ru/showphoto.php?photo=129076 

या नाण्यांखेरीज सिद्दी इब्राहिमखान तिसरा याच्या नाण्यांवर पूर्णपणे वेगळाच मजकूर आढळतो. त्यांवर पुढील बाजूस फार्सी लिपीत व भाषेत ‘सिक्का झद दर मुल्क कोकन शाह इब्राहिम मुहम्मद खान’ तर मागील बाजूस ‘मकबूल रहमत अल्लाह’ आणि अन्यही मजकूर आढळतो. उपलब्ध नाण्यांवरून मागील बाजूचा मजकूर पूर्णपणे वाचण्यात तूर्तास यश आलेले नाही. त्याखेरीज हिजरी वर्षांचाही उल्लेख आढळतो. सिद्दी इब्राहिम खानाला अशा पूर्णपणे वेगळ्या मजकुराची नाणी पाडावीशी वाटण्याचे कारण त्याच्या कारकीर्दीतील राजकीय अस्थैर्याशी निगडित आहे. सिद्दी इब्राहिमखानाचा त्याच्या दरबाऱ्यांशी बेबनाव होऊन, पूर्ण जंजिरा संस्थानात अव्यवस्था माजलेली होती. त्यामुळे ब्रिटिशांनी महत्त्वाच्या गोष्टींचा निवाडा करण्यासाठी एक स्वतंत्र समिती नेमली. काही वर्षांतच सिद्दी इब्राहिमखानाकडून त्याच्या न्यायदानाचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले. सिद्दींच्या यापूर्वीच्या नाण्यांवर येणारा ‘फिदवी’ हा शब्द त्याच्या नाण्यांवर आढळत नाही. त्यामुळे या अस्थैर्याच्या काळात स्वत:चे स्थान बळकट करण्याचा एक प्रयत्न म्हणूनही त्याच्या तांब्याच्या नाण्यांकडे पाहता येते. त्यांवरील ‘कोकन’ हा प्रदेशवाचक उल्लेखही रोचक आहे. या नाण्यांवर येणारे शेवटचे हिजरी वर्ष १२८८ आहे. याच्याशी संबंधित इसवी सनातील वर्ष १८७२-७३ हे असून, यानंतर इ. स. १८७९ मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत व त्यानंतरचा सत्ताधीश सिद्दी अहमदखान याच्या कारकीर्दीतही जंजिरा संस्थानात अव्यवस्थेचे वातावरण तसेच राहिले व पुढे इ. स. १८८० नंतर ब्रिटिश रेसिडेंटने अल्पवयी शासक असल्याने स्वत:च्या हातात राज्यकारभार घेतल्यावर तांब्याची स्वतंत्र नाणी पाडणेही बंद झाले.

सिद्दी इब्राहिमखान तिसरा याच्या काळातील सोन्याची मोहोर. हिजरी वर्ष १२८३ (इ. स. १८६६-१८६७). छायाचित्र सौजन्य :  https://www.zeno.ru/showphoto.php?photo=18590

चांदी व तांब्याखेरीज जंजिऱ्याची सोन्याची नाणीही ज्ञात असून ती दुर्मीळ आहेत. सुमारे ११ ग्रॅम वजनाच्या या मोहोरा असून, यांवर पुढील बाजूस फार्सी भाषेत ‘सिक्का झद दर जहान चूं बद्र मुनीर, शाह औरंगझेब आलमगीर’ व हिजरी वर्ष १२८३ नमूद आहे. मागील बाजूस ‘सिक्का झद दर मुल्क कोकन शाह इब्राहिम खान’ असा मजकूर आहे. हे नाणे सिद्दी इब्राहिम खान तिसरा याच्या काळात इ. स.१८६६-१८६७ मध्ये पाडलेले असून, यावरील मागील बाजूचा मजकूर हा त्याच्या तांब्याच्या पैशावरील मागील बाजूच्या मजकुराशी जवळपास पूर्ण साधर्म्य दर्शवितो. या नाण्यावरील औरंगजेबाचा उल्लेख हा त्याच्या काळातील तांब्याच्या नाण्यांवरील मजकुरापेक्षा वेगळा असला तरी त्याप्रमाणेच राजकीय अस्थैर्य दर्शवितो. औरंगजेबाच्या काळात सिद्दींची मोगल आरमाराच्या प्रमुखपदी नेमणूक झाली. मोहोरेवर त्याचा उल्लेख करून मोगलांद्वारे दीडेक शतकभरापूर्वी मिळालेल्या पाठबळाचे आणि त्याद्वारे स्वत:च्या सामर्थ्याचे सूतोवाच करणे हा त्यामागील हेतू होता.

उपरोल्लेखित सर्व नाणी प्रामुख्याने जंजिरा संस्थानच्या मूळ प्रदेशात, म्हणजेच उत्तर कोकण किनारपट्टीत चलनात होती. याखेरीज गुजरातच्या किनारपट्टीवर सचिन आणि जाफराबाद इथेही सिद्दींच्या आधिपत्याखाली लहानसा प्रदेश होता व तिथेही उपरोल्लेखित प्रकारातील बरीच जंजिऱ्याची नाणी सापडतात. सिद्दींच्या आधिपत्याखाली लहानसाच प्रदेश असल्याने तेथे व्यापारउदीम मर्यादित स्वरूपात होत होता. त्यामुळे तेथील नाणी ही स्थानिक अर्थव्यवस्थेच्या गरजेपुरती पाडलेली होती.

संदर्भ :

  • Bhandare, Shailendra, ‘Coinage of the Habshi rulers of Janjira’, Journal of the Oriental Numismatic Society, Vol. 178, pp. 28-35, UK, 2004.
  • भोसले, बा. के., ‘जंजिरा संस्थानचा इतिहास’, बडोदे, १८९८.

समीक्षक : अमोल बनकर