एकच प्याला : मराठी नाट्य रसिकांच्या मनावर १००वर्षानंतरही अधिराज्य गाजवणारी नाट्य कलाकृती. अवघे ३४ वर्षाचे आयुष्य लाभलेल्या राम गणेश गडकरी यांनी लिहिलेले हे नाटक त्यांच्या अकाली निधनानंतर ग्रंथरूपाने प्रकाशित झाले. किर्लोस्कर नाटक कंपनीत द्वारपालाचे काम करणाऱ्या गडकर्यांनी नाट्य लेखनाला प्रारंभ केला होता. एकच प्याला या शोकांतिकेने नाट्य क्षेत्रात प्रचंड खळबळ उडविली . या नाटकातील प्रमुख पात्र सुधाकर व सिंधू, या दोघांचे लहान बाळ. दारूच्या आहारी गेलेल्या तळीरामच्या मृत्यूने प्रेक्षक नाटकाच्या शेवटी सुन्न होतो. सूचक व प्रभावी नाटकाचे शीर्षक, नाटकातील लांबलचक स्वगते , पल्लेदार वाक्यरचना, भावविवश करणारी भाषा याद्वारे या नाटकातून गडकर्यांच्या अलौकिक प्रतिभेचा वाङमयविलास प्रतीत होतो . या नाटकात राम गणेश गडकरी यांनी वापरलेली भाषा , संवाद नाटकाच्या लोकप्रियतेत भूषण ठरली आहे. व्यावहारिक भाषेपेक्षा भावनिक भाषेच्या वापरामुळे प्रेक्षक नाट्यकृतीशी एकरूप झालेला दिसतो . पौराणिक संदर्भ , दाखले , शाब्दिक कोट्या, विनोद आणि संगीत पदरचना यामुळे मराठी नाट्य विश्वात एकच प्याला या नाटकाने अफाट यश मिळविले. वी सी गुर्जर यांनी या संगीत नाटकासाठी लिहिलेली पदे रसिकांना भारावून टाकतात .या नाटकातील पदांना सुंदराबाई जाधव यांनी चाली लावल्या.

नाटकातील नायक सुधाकर हा कर्तबगार, बुद्धिमान वकील असतो . त्याच्या कर्तुत्वाचा अभिमान बाळगणारी सुंदर सुस्वभावी पत्नी या दोघांच्या जोडीचा हेवा करावा अशी आहे . या नाटकाची नायिका सिंधू या सामान्य स्त्रीची भूमिका थोर गायक बालगंधर्व साकारत असत. बालगंधर्वांची सर्वोत्कृष्ट भूमिका म्हणजे एकच प्याला मधील सिंधू याच भूमिकेच्या अभिनयासाठी त्यांना प्रसिद्धी मिळाली. न्यायाधीशाकडून झालेला अपमान सहन न झाल्याने सुधाकर तळीरामने दिलेल्या दारूच्या घोटाला बळी पडतो आणि याच क्षणापासून त्याच्या जीवनात अध:पतनाला सुरुवात होते . सिंधू आपल्या व्यसनी पतीच्या पाठीशी ठामपणे उभी राहते परंतु तिचे कष्ट ,निष्ठा ,प्रेम याबद्दल नवऱ्याला काहीच वाटत नाही . सिंधूच्या चारित्र्य संशयाने पछाडून सुधाकर आपल्या मुलाला काठीने मारतो यात बाळाचा व सिंधूचा मृत्यू होतो या साऱ्या पश्चातापाने सुधाकर विष घेऊन आत्महत्या करतो.
सुधाकरच्या स्वभावाचे कंगोरे, सिंधूचे पातिव्रत्य रसिकांच्या मनाला भिडणारे प्रभावी संवाद या साऱ्यामुळे नाटक यशस्वी झाले. दारुमुळे सुधाकर सारखा बुद्धिमान तेजस्वी माणूस आपल्या साध्वी पत्नीचा, स्वतःच्या संसाराचा कसा नाश करून घेतो हे नाट्यमय घटना प्रभावी भाषेतून व रोमांचकारी घटनांमधून मांडल्याने प्रेक्षकांवर परिणामकारक प्रभाव टाकतात. प्रत्यक्ष नाटक पाहताना प्रेक्षकांच्या काळजाला पिळ पडतो. नाटक पाहिल्यानंतर साऱ्यांची मने सुन्न झालेली असतात. प्रेक्षकांच्या भावना हेलावून टाकणारे प्रभावी नाटक गडकर्यांनी लिहिले परंतु स्वतः राम गणेश गडकरी यांना या नाटकाचा प्रयोग पाहता आला नाही. त्यांच्या मृत्यूनंतर एक महिन्याने बडोदा येथे संभाजी महाराजांच्या उपस्थितीत २० फेब्रुवारी १९१९ ला नाटकाचा पहिला प्रयोग झाला. दारूचे भयानक परिणाम मांडणारे हे नाटक प्रेक्षकांबरोबरच मराठी प्रेक्षकांनीही पाहिले. कर्नाटकमध्ये या नाटकाचे प्रयोग झाले तसेच कानडी व हिंदी भाषेत नाटकाचे भाषांतर झाले. सिंधू व गीता या स्त्रियांच्या व्यक्तिरेखेतून गडकरी यांनी पातिव्रत्याची अनेक बाजूंनी मांडणी केलेली दिसते. मदिरा सेवनाचे परिणाम व कुटुंबाचा होणारा सत्यानाश याचे वास्तव चित्रण गडकरी यांनी एकच प्याला मध्ये रेखाटले आहे.
संदर्भ : गंधे, विनायक, एकच प्याला, मराठी साहित्याचे वैभव, मुंबई , २०२३.
समीक्षण : जगतानंद भटकर