दुर्मीळ मृत्तिकांची मूलद्रव्ये असलेला फ्ल्युओरो-कार्बोनेट खनिजांचा एक समूह. प्रथम वर्णन १८३८ मध्ये स्वीडनमधील बॅस्टनास खाणीवरून.  रसायनिक संज्ञा CO₃F; ज्यामध्ये सेरियम, लँथॅनम आणि निओडिमियम सारखे हलके घटक आणि क्वचित इट्रियम असतात. मूलद्रव्याच्या  प्राबल्यावरून बॅस्टनासाइट-(Ce), बॅस्टनासाइट-(La) किंवा बॅस्टनासाइट-(Y) अशी त्याची प्रजाती निश्चित होते. सामान्यतः ६५-७५% विरल मृत्तिका ऑक्साइड्स स्वरूपात आढळतात. त्याच्या संरचनेत कॅल्शियम, लोह, थोरियम व यूरेनियम यांसारखी मूलद्रव्ये अल्प प्रमाणात आढळतात.

भौतिक गुणधर्म : स्फटिक प्रणाली षट्कोनी. आकार : बहुधा वटिकाकार (प्रिझमी). सुबक स्फटिक; तुलनेने दुर्मीळ. सामान्यतः दाणेदार समूह, मोठ्या पिंडांच्या स्वरूपात किंवा यजमान शैलांमध्ये सूक्ष्म विखुरलेल्या कणांच्या रूपात. रंग साधारणपणे पिवळा, मधासारखा तपकिरी, तांबूस-तपकिरी किंवा फिकट हिरवा. चमक काचेसारखा ते किंचित तेलकट,  पृष्ठभागावर मोत्यासारखा.  एका दिशेने स्पष्ट विदरण.  भंजन असमान किंवा उप-शंखाकृती. पारदर्शकता पारदर्शक ते अर्धपारदर्शक.  कठिनता ४ – ५ . विशिष्ट गुरुत्व  ४.७ –५.२. दृढता ठिसूळ. थोरियम किंवा युरेनियमच्या सूक्ष्म प्रमाणामुळे काही नमुन्यांमध्ये सौम्य किरणोत्सारीता. कार्बोनेट घटकामुळे हे खनिज विरळ आम्लांशी धीम्या गतीने प्रतिक्रिया देते.

प्रकाशीय गुणधर्म : एक-अक्षीय धनात्मक. अपवर्तनांक तुलनेने जास्त असून द्वि-अपवर्तन (birefringence) मध्यम ते जास्त. पातळ छेदामध्ये ध्रुवीकृत प्रकाशाखाली पाहिल्यास यामध्ये ठळक व्यतिकरण  रंग. विलोपन सरळ तथापि, अनेक खडकांमध्ये हे खनिज अतिशय सूक्ष्म कणांच्या स्वरूपात असल्याने त्याची अचूक ओळख करण्यासाठी सूक्ष्मदर्शकीय व सूक्ष्म-विश्लेषण तंत्रांची आवश्यकता भासते.

आढळ : सर्वांत मुबलक प्रमाणात विरल मृत्तिका असणारा खनिज. प्रामुख्याने क्षारीय आणि अति-क्षारीय अग्निजन्य खडकांत, कार्बोनेटाइट संकुले, नेफेलिन सायनाइट, अल्कली ग्रॅनाइट आणि पर-अल्कलाइन पेग्माटाइट, आणि उष्णजलीय शिरा, उष्ण व उपोष्ण कटिबंधातील सखोल अपक्षयामुळे तयार झालेले लॅटेराइट (आयन-अधिशोषण मृदामध्ये).

प्राप्तिस्थान : बहुधा मोनॅझाइट, पॅरिसाइट, सिंकिसाइट, झेनोटाइम आणि ॲलॅनाइट यांसारख्या खनिजांसोबत आढळतो.

संदर्भ : https://www.britannica.com/science/Bastnäsite.

समीक्षक : पी. एस. कुलकर्णी