अँल्युमिनोसिलिकेट गटातील खनिज. हे नेसोसिलिकेट प्रकारची संरचना दाखवते. रासायनिक संज्ञा Al2SiO5. हे खनिज ठिसूळ असून समचतुर्भुज स्फटिक प्रणालीत तयार होते. लांबट निमुळते वा स्तंभाकार आकाराचे स्फटिक. पांढरट, गुलाबी लाल, जांभळा, तपकिरी, पिवळसर हिरवा असे रंग वैविध्य या खनिजात दिसून येते. स्पेनमधील अँडेलूशा प्रांतात हे सर्वप्रथम आढळून आले, त्यावरून त्याला अँडॅलुसाइट नाव देण्यात आले. परंतु नंतर पश्चिम मेक्सिको राज्यातील ग्वाडलजारा या शहरात हे सर्वप्रथम आढळल्याचे सिद्ध झाले.
या खनिजामध्ये कार्बन वा क्लेच्या अशुद्धी मिसळल्या गेल्यास याच्या स्फटिकामध्ये फुलीसारखा आकार तयार झालेला दिसतो, या प्रकाराला ‘चिॲस्टोलाइट’ संबोधले जाते. उच्च दाब व तापमानात याचे सिलिमॅनाइटमध्ये रूपांतर होते. अँडॅलुसाइट हे कायनाइट व सिलिमॅनाइट यांचे बहुरूपिक (Polymorph) आहे.
भौतिक गुणधर्म – पाटन ठळक, पारदर्शकता पारदर्शक – अपारदर्शक, द्युति काचेसारखी, कठिनता ७.५, विशिष्ट गुरुत्व ३.१८, कस रंगहीन. प्रवृत्ती स्तंभकार स्फटिक.
प्रकाशीय / सूक्ष्मदर्शकिय गुणधर्म : वर्णबदल तीव्र, अपवर्तनांक १.६३, वर्णबदल तीव्र, व्यतिकरण निम्न श्रेणीचे, विलोपन समांतर, अपस्करण क्षीण.
आढळ : मध्यम ते उच्च श्रेणीच्या रूपांतरित खडकात (अभ्रक सुभाजा, पट्टिताश्म किवा स्पर्शी रूपांतरण झालेल्या हॉर्नफेल्समध्ये) हे खनिज आढळून येते. हे ठरावीक तापमानास व दाबास स्थिर असते. स्पेन, फ्रान्स, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ऑट्रेलिया, रशिया व ब्राझील या देशात हे खनिज सापडते. भारतात उत्तर प्रदेश, झारखंड, तामिळनाडू, छत्तीसगड व राजस्थानात या खनिजाचे साठे सापडतात.
उपयोग : स्पार्क प्लग तयार करण्यासाठी, उच्च तापमान १२००° ते १५५०° से. सहन करू शकत असल्याने पोर्सेलीन तयार करण्यासाठी, तसेच धातू कारखान्यात (Foundry) लागणाऱ्या अति उष्ण भट्ट यामध्ये या खनिजाचा उपयोग होतो. ब्राझील व कॅलिफोर्निया या देशांमध्ये रंगीत व पारदर्शक स्फटिकांचा उपयोग रत्न म्हणून व दागिने तयार करण्यासाठी केला जातो.
संदर्भ : Read, H. H., Rutley’s Elements of Mineralogy, 24th edition, Londan, 1947.
समीक्षक : पी. एस. कुलकर्णी