भट्ट, श्रीनिवास : (१६२५ – १६९५). योगप्रकारातील हठयोग विषयावरील ‘हठरत्नावली’ या ग्रंथाचे लेखक. त्यांनी श्रीनिवास योगी या नावाने ग्रंथाचे लेखन केले आहे. ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीलाच भट्ट यांनी स्वतःबद्दलची माहिती सांगितली आहे. त्यांचे जीवन भारतातील तिराभुक्त (आंध्र प्रदेश) या प्रांतात व्यतीत झाले. त्यांचे वडील सरवर/थिमिया हे त्या काळातील प्रसिद्ध ज्योतिषी होते. त्यांच्या आईचे नाव सोमांबा होते.

भट्ट यांच्या काळात आंध्र प्रदेशात हठयोग उच्चतम शिखरावर होता. ते योगाबरोबरच वेदान्त, मीमांसा, सांख्य, योग, न्याय आणि वैशेषिक या दर्शनांचे तसेच न्यायशास्त्राचेही विद्वान होते. त्यांनी न्यायरत्न, तत्वचूडामणि या शास्त्रांचा सखोल अभ्यास करून त्यावर भाष्य लिहिले. ‘वेदान्तपरिभाषा’ ही देखील त्यांचीच रचना असल्याचे उल्लेख आढळतात. त्यांनी स्वतःला कलितार्किक, चूडामणि, सकल न्यायशास्त्र संप्रदाय प्रवर्तक, न्यायाचार्य, जयलक्ष्मी, महायोगीन्द्र अशा नावांनी संबोधले आहे. ते हठयोग परंपरेतील एक महत्त्वाचे परंतु, तुलनेने कमी परिचित असलेले योगी आहेत. हठयोगाच्या ग्रंथांमध्ये सांगितलेल्या सहा (षट्कर्म) शुद्धिक्रियांव्यतिरिक्त चक्री कर्म आणि गजकरिणी या दोन क्रिया मिळून भट्ट ‘अष्टकर्म’ सांगतात. या शुद्धिक्रिया केवळ शरीर शुद्धिसाठी नसून शरीरातील चक्रशुद्धिसाठीदेखील आहेत. सामन्यात: अष्ट कुंभक प्रसिद्ध असताना ‘भुजंगीकरण’ हा नववा कुंभक भट्ट यांनी सांगितला आहे. ‘हठरत्नावली’ ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी हठयोगातील विविध साधना, आसने आणि प्राणायाम यांना एका सुसंगत व शिस्तबद्ध स्वरूपात प्रस्तुत केले.

हठरत्नावली या शब्दाचा अर्थ ‘हठयोगातील मौल्यवान रत्नांची माळ’ असा होतो. नावाप्रमाणेच हा ग्रंथ हठयोगाच्या महत्त्वाच्या साधनांचा संग्रह आहे. या ग्रंथावर १९८२ मध्ये एम्. वेंकट रेड्डी यांनी पहिली टीका लिहिली. या ग्रंथाची बरीच हस्तलिखिते उपलब्ध आहेत, ज्यामध्ये एका नेपाळी भाष्याचाही समावेश आहे.

‘हठरत्नावली’पासून प्रेरित होऊन स्वामी चिदानन्द यांनी लिहिलेले ‘षट्कर्म-संग्रह’ आणि सुंदर देव यांनी लिहिलेले ‘हठसंकेत चन्द्रिका हे पुढील काळात आलेले ग्रंथ आहेत. हा ग्रंथ जरी हठयोगावर आधारित असला, तरी योगाचे अंतिम उद्दिष्ट ध्यान, समाधी आणि आत्मसाक्षात्कार हेच आहे, असे भट्ट स्पष्ट करतात.

भट्ट यांची भूमिका अत्यंत व्यवहार्य आणि साधनाभिमुख होती. तात्त्विक वादविवादांपेक्षा प्रत्यक्ष साधनेवर त्यांचा भर होता. त्यांच्या मते शरीर हे साधनेचे साधन आहे, अडथळा नाही. त्यासाठी संयम, शिस्त आणि सातत्य आवश्यक आहे. शुद्धी, प्राणायाम, संयम आणि ध्यान हे तितकेच महत्त्वाचे असून योगाचा अंतिम हेतू आंतरिक परिवर्तन आहे.

श्रीनिवास भट्ट यांच्या मृत्यूविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही.

पहा : हठरत्नावली

संदर्भ :

  • घरोटे, एम. एल., देवनाथ, परीमल, झा, विजय कांत, (संपा.), ‘हठरत्नावली’, लोणावळा, २००२.
  • रेड्डी, एम. वेंकट, (संपा.), ‘हठरत्नावली’, सिकंदराबाद, १९८२.

समीक्षक : नितीन तावडे