निलंगेकरपाटील, शिवाजीराव भाऊराव (Nilangekar–Patil, ShivajiraoBhaurao) : (९ फेब्रुवारी १९३१– ५ ऑगस्ट २०२०). महाराष्ट्र राज्याचे तेरावे मुख्यमंत्री. त्यांचा जन्म नणंद (ता. निलंगा, जि. लातूर) येथे झाला. शिवाजीराव यांचे मूळ आडनाव गायकवाड; परंतु लोक त्यांना पाटील म्हणायचे. नंतर १९६२ च्या विधानसभा निवडणुकीत ते आमदार झाले. त्यावेळी या सभागृहात शिवाजीराव पाटील नावाचे चार आमदार होते. त्यामुळे त्यांना शिवाजीराव पाटील-निलंगेकर असे संबोधले जाऊ लागले. तेव्हापासून ते याच नावाने परिचित आहेत.

शिवाजीराव सहा महिन्यांचे असताना वडील हिवतापाने दगावले (इ. स. १९३१). तेव्हापासून शेतकरी कुटुंबातील या एकुलत्या एक मुलाचे पालन-पोषण त्यांची आई वत्सलाबाई हिने अतिशय कष्टाने व जिद्दीने केले. शिवाजीराव लहानपणापासून हुशार होते. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण स्वग्रामी घेऊन, नूतन विद्यालय गुलबर्गा येथून इ. स. १९४८ मध्ये दहावीची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. याच काळात निजामाविरुद्ध घडून आलेल्या हैदराबाद मुक्ती संग्रामात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. पुढे १९५२ मध्ये त्यांनी उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद येथून बी. ए. ही पदवी संपादन केली. तत्पूर्वी १९५१ मध्ये त्यांचा विवाह धानोरी (बामणी) येथील सुशिलाताई यांच्याशी झाला. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते नागपूर येथे दाखल झाले.  नागपूर विद्यापीठातून (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ) एम. ए. (राज्यशास्त्र) आणि एल. एल. बी. (१९५५) या पदव्या त्यांनी मिळविल्या.

एल. एल. बी. नंतर त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी वकिली व्यवसाय सुरू केला. वकिलीबरोबरच समाजकार्य व राजकारण यांत सहभाग घेण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्यामुळे त्यांना काँग्रेस पक्षाकडून निलंगा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली (१९५७); पण ते अयशस्वी ठरले. नंतर ते जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य (१९५८), ब्लॉक डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष (१९६०), निलंगा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष (१९५८-६२) इत्यादी पदांवर होते.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर १९६२ मधील विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव काँग्रेस पक्षाकडून निलंगा मतदार संघातून निवडून आले. ते १९६२ ते १९६७ या कार्यकाळात आमदार, उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य होते. त्यांनी या काळात आपल्या विकास निधीतून रस्ते, विद्युतीकरण, बंधारे-सिंचन प्रकल्प, सहकारी बँकांची निर्मिती, पाझर तलाव इत्यादी समाजपयोगी कार्ये केली. त्यानंतर १९६७, १९७७ आणि १९८० मध्ये झालेल्या निवडणुकांत सलग विजय मिळवून राज्यमंत्री आणि कॅबिनेटमंत्री म्हणून महसूल, पुनर्वसन आणि विधानकार्य, आरोग्य, कुंटुबकल्याण, सार्वजनिक बांधकाम, तांत्रिक शिक्षण, दुग्धविकास, पशुसंवर्धन, मत्स्यविकास, रोजगार कायदा व न्याय, पाटबंधारे, सहकार, सांस्कृतिक, कार्ये आणि युवाकल्याण या खात्यांवर काम केले. या कार्यकाळात त्यांनी तेरणा, उजनी, कुकडी, कृष्णा, मांजरा, धरणी इत्यादी प्रकल्प पूर्ण केली आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले. त्यांनी अनेक साखर कारखाने, बँकांचे जाळे, रस्ते विकास, पुण्यातील काही पूल, अधिक चांगल्या रितीने प्रशासन चालवता यावा, यासाठी लातूर व जालना या दोन जिल्ह्यांची निर्मिती आणि औरंगाबादला महानगरपालिका व खंडपीठाची निर्मिती इत्यादी कामे केली. तसेच लातूर जिल्ह्यातील गरीब व शिक्षणप्रेमी मुलांना प्राथमिक ते उच्चशिक्षण मिळावे, या हेतूने त्यांनी १९६८ मध्ये महाराष्ट्र शिक्षण ट्रस्ट संस्थेची स्थापना केली. त्यांतर्गत १५ प्राथमिक शाळा, १२ उच्च माध्यमिक शाळा, ४ वरिष्ठ महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालय (१९८३) आणि फार्मसी कॉलेज (१९८४) या शिक्षण संस्थांची निर्मिती केली.

१९८५ मधील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवाजीराव यांऐवजी त्यांचा पुत्र दिलीपराव उभे राहिले व निवडून आले. त्यावर्षी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले; परंतु काही कारणास्तव दादांनी पदत्याग केला. त्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी विधिमंडळाची बैठक झाली. त्यात वसंतदादा पाटील, सुशिलकुमार शिंदे आणि सुधाकरराव नाईक यांनी  शिवाजीराव यांची निवड केली व ते सर्वांना मान्य झाले. कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेले शिवाजीराव पाटील-निलंगेकर ३ जून १९८५ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले.

राज्याची धुरा सांभाळताच त्यांनी राज्याचा दौरा केला आणि शेतकरी व गरीबांचे दु:ख व समस्या जाणून त्यांच्या विकासासाठी त्वरीत कृती आराखडा तयार करून तशी कार्यवाही केली. शेतकर्‍यांनी घेतलेल्या कर्जाच्या व्याजदरात सवलत देण्याबाबत बँकांना सूचना दिल्या. त्यांच्याकरीता पिकविमा योजना सुरू केली. त्यांनी पर्यावरण या नवीन खात्याची निर्मिती; महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिकांच्या मानधनात तातडीने वाढ ; नव्या विधानभवनाच्या भव्य इमारतीची निर्मिती ; मुंबई शहराच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष उपाययोजना इत्यादी महत्त्वपूर्ण कामे केली. मुलींना बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य करण्याचा मान शिवाजीराव यांच्याकडे जातो. त्यांनी राज्यातील दुष्काळ परिस्थिती सोडविण्यासाठी रोजगार, पाणीपुरवठा आणि जनावरांना चारा पुरविणे ही कामे ग्रामीण भागांसाठी युद्धपातळीवर कार्य केले. राज्याचा प्रमुख म्हणून आपले कार्य उत्तम प्रकारे पार पाडत असताना काही कारणास्तव त्यांना १३ मार्च १९८६ रोजी या पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर १९९० मध्ये राजीव गांधी यांनी शिवाजीराव यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड केली. त्याच वर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका शिवाजीराव यांच्या नेतृत्वाखाली होऊन काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात मोठे यश मिळाले.

शिवाजीराव यांना सर्वसामान्य माणसाबद्दल खूप कणव होती. त्यांना वाचन-लेखन यांची  खूप आवड होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर १९८६ मध्ये त्यांनी नागपूर विद्यापीठातून ‘मराठवाड्यातील राजकीय जागृती, चळवळी आणि बदल’ असा विषय घेऊन पीएच. डी. ही पदवी मिळविली. त्यांना दिलीप, शरद, अशोक, विजयकुमार आणि चंद्रकला अशी एकूण पाच अपत्ये असून ते सर्व विद्याविभूषित आहेत.

शिवाजीराव यांचे पुणे येथे निधन झाले.

संदर्भ : मेहेंदळे, विश्वास, यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण, पुणे, २०१२.

समीक्षक : जगतानंद भटकर