कुस्टो, झाक इव्ह : (११ जून १९१० — २५ जून १९९७). फ्रेंच नौदल अधिकारी, समुद्रशास्त्रज्ञ, चित्रपट निर्माते आणि लेखक. त्यांनी पहिले यशस्वी मुक्त परिपथ स्वयंपूर्ण पाण्याखालील श्वासोच्छवासाचे उपकरण (SCUBA) सह-तयार केले. त्याला ॲक्वालंग अर्थात म्हणतात. ॲक्वालंग (शब्दशः अर्थ पाण्यातील फुफ्फुसे) म्हणजे शाळकरी मुलांच्या पाठीवरील दप्तराप्रमाणे, सूर मारणाऱ्याच्या पाठीवर बांधायच्या उच्चदाबाखालील ऑक्सिजनच्या दोन नळकांड्यांचे उपकरण. त्याच्या साहाय्याने त्यांना पाण्याखालील माहितीपट तयार करण्यास मदत झाली.

कुस्टो यांचा जन्म फ्रान्सच्या नैऋत्य भागात सेंट आन्द्रे द कब्झॅक गिरोंदे गावात झाला. ते दहा वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब न्यूयॉर्कला स्थलांतरित झाले. तेथे त्यांनी इंग्रजी भाषा उत्तम लिहायला आणि वाचायला शिकले. काही काळाने त्यांचे कुटुंब अमेरिकेतून फ्रान्सला मार्सेलिस येथे परतले. तेथील पाण्याखाली पोहण्याच्या त्यांच्या धाडसी खेळ कौशल्याला बहर आला. त्यांनी एक चलतचित्रकाच्या (मूव्ही कॅमेरा) साहाय्याने पाण्याखाली त्याचा वापर करण्याबाबत प्रयोग केले. अभ्यासातील प्रगती आणि धाडसी खेळांतील कौशल्य या दुहेरी गुणांमुळे त्यांना फ्रेंच नाविक शिक्षण संस्थेतील प्रशिक्षण (१९२३) पूर्ण करून सेकंड लेफ्टनंट हे पद देण्यात आले. पुढे शस्त्रभांडार विभागात काम करण्याची संधीही प्राप्त झाली. नंतर त्यांना नाविक वैमानिकाचे शिक्षण मिळाले. नंतर ते प्रशिक्षित नौदल वैमानिक झाले. भूमध्य सागरात पोहून, पाण्याखाली जाऊन वैमानिक वापरतात ते काळे चष्मे किती चांगले आहेत, ते आणखी चांगले कसे करता येतील यावर ते काम करू लागले. परंतु अचानक झालेल्या अपघातामुळे ते वैमानिक म्हणून निकामी झाले. आकाशात उंच झेपावण्या ऐवजी त्यांनी समुद्रात खोल जाण्याचे मनावर घेतले.

कुस्टो यांनी पाण्याखाली छायाचित्रण करताना उपलब्ध असणाऱ्या ॲक्वालंग्जचा वापर केला. ॲक्वालंग्जमध्ये असणाऱ्या विभाजकाची कामगिरी त्यांना संतोषजनक वाटली नाही. त्यांनी आपल्या सहकार्यासह विभाजकात बदल करून ते कार्यक्षम बनविले. त्यामुळे ते पाठीवर श्वसन साहाय्यक ऑक्सिजनची दोन नळकांडी घेऊन पाण्याखाली जाणे आणि बराच वेळ तेथे राहणे शक्य झाले, तसेच सागरतळाचा अभ्यास करणे शक्य झाले. कालांतराने त्या उपकरण संचाला स्कूबा साधन संच (Self-Contained Underwater Breathing Apparatus- SCUBA) म्हणून लागले. या उपकरण संचामुळे अनेकविध फायदे झाले. या उपकरण संचाला त्यांनी १९४३मध्ये स्वामित्वहक्क मिळविले. त्यांनी ‘सूरमारी तबकडी – Diving Saucer’चाही शोध लावला (१९५९).

कुस्टोंवर नाविक दलात कार्यरत असताना इटालियन सैन्याच्या नाविक प्रगतीवर नजर ठेवण्याचे काम होते. त्यासाठी पाण्याखाली बुड्या मारणे, निरीक्षणे करणे, उपकरणांच्या चाचण्या घेणे अशी त्यांच्या आवडीची कामे त्यांच्याकडे चालून आली. या साहसी कामांबद्दल त्यांना ‘क्रॉस ऑफ वॉर १९४५’ हे युद्धपदकही बहाल करण्यात आले.

कुस्टो यांना आपल्याला मिळालेले ज्ञान आणि रोमांचक अनुभव इतरांना मिळावे याकरिता उपलब्ध प्रसारमाध्यमे वापरली. त्यांनी छोटे चलतचित्रपट-माहितीपट काढले, पुस्तके लिहिली. त्यांना त्यांच्या मित्रवर्यांनी कॅमेरे आणि ‘कॅलिप्सो’ ही छोटी पूर्वी सुरुंगनाशक म्हणून वापरली जाणारी नौदल बोट उपलब्ध करून दिली. त्यांनी मनुष्यवाहक छोटी पाणबुडी ‘डीपस्टार ४०००’ (१९६५) आणि एचएमएचएस ब्रिटानिक या बुडालेल्या बोटीचे अवशेष शोधण्यासाठी ‘डेनिस’ ही पाणबुडी बांधली. कॅलिप्सो बोट व छायाचित्रण साहित्य वापरून त्यांनी अनेक माहितीपटांची निर्मिती केली. एकूण तब्बल १२० माहितीपट आणि ५० पुस्तके त्यांनी निर्माण केली.

कुस्टो यांच्या ‘द ओशन वर्ल्ड ऑफ झाक कुस्टो’ या शीर्षकाचे पुस्तक म्हणजे समुद्रविज्ञानाचा एक ज्ञानकोशच आहे (प्रकाशित : १९७३—७८). त्यांच्या माहितीपटांपैकी तीन छोटे चलतचित्रपट-‘द सायलेंट वर्ल्ड’, ‘द गोल्डन फिश’, आणि ‘द वर्ल्ड विदाउट सन’-प्रतिष्ठित ऑस्कर पारितोषिक विजेते ठरले. ‘द गोल्डन फिश’ची कान्स चित्रपट उत्सवासाठीही निवड झाली. फ्रेडरिक द्युमा यांच्याबरोबर लिहिलेले ‘द सायलेंट वर्ल्ड’ आणि ‘द स्प्लेन्डिड सॅव्हेज ऑफ द सी’ हे फिलिप या आपल्या पुत्राबरोबर लिहिलेले अशी त्यांची दोन पुस्तके आणि ‘व्हॉएज टू द एज ऑफ द वर्ल्ड’ हा माहितीपट फार प्रसिद्ध झाले. ‘द ह्युमन’, ‘द ऑर्चिड’ अँड ‘द ऑक्टोपस’ हे त्यांचे अखेरचे पुस्तक त्यांच्या मृत्युनंतर २००७मध्ये प्रकाशित झाले. त्यांनी १९७३मध्ये ‘झाक कुस्टो सोसायटी’ स्थापन केली. ‘क्राईज फ्रॉम द डीप ’ या माहितीपटात कॅनडातील सुंदर सागराचे चित्रण आहे आणि प्रदूषणामुळे त्याची कशी क्षती होत आहे ते प्रभावीपणे दाखविले आहे.

कुस्टो यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पॅरिस येथे निधन झाले.

कुस्टो यांच्या इच्छापत्रात नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या पुस्तकांच्या, सिनेमांच्या, दूरदर्शन कार्यक्रम प्रसारणांचे सर्व उत्पन्न ‘झाक कुस्टो सोसायटी’ला मिळाले आहेत. त्यांच्या जीवनाचा परिचय करून देणारा माहितीपट ‘बिकमिंग कुस्टो’ प्रसिद्ध दिग्दर्शिका, सिनेनिर्मात्या लिझ गार्बज यांनी तयार केला. या चित्रपटाबद्दल त्यांना ब्रिटिश फिल्म ॲवॉर्ड प्रदान करण्यात आले. कुस्टो यांनी सहकार्यासह पाण्याखाली छायाचित्रण करून ‘एटीन मीटर्स डीप’ चित्रपट बनवला. त्याबद्दल त्यांना सिनेकलाक्षेत्रातील पदक मिळाले.

कळीचे शब्द :  #स्कूबा #SCUBA

संदर्भ :

  • https://web.archive.org/web/20150603002152/http://history.cmas.org/jacques-yves-cousteau-1959-1973-130328095802
  • https://en.wikipedia.org/wiki/The_Silent_World:_A_Story_of_Undersea_Discovery_and_Adventure
  • https://web.archive.org/web/20090125071615/http://cousteau.org/jyc.html
  • https://films.nationalgeographic.com/becoming-cousteau
  • films.nationalgeographic.com
  • https://www.vision.org/biography-jacques-cousteau-voice-silent-world-135

समीक्षक : मोहन मद्वाण्णा