चर्चच्या सभागृहात किंवा प्रार्थनेच्या ज्या जागी बाप्तिस्मा हा ख्रिस्ती संस्कारविधी करण्यात येतो, अशी जागा. बाप्तिस्मागृहाचा इंग्रजी शब्द बाप्त‍िस्ट्री हा मूळचा लॅटिन शब्द बाप्त‍िस्टेरीयम (Baptisterium) शब्दावरून तयार करण्यात आलेला असून त्याचा अर्थ स्नानाचे ठिकाण असा होतो. फ्रेंच आणि ग्रीक भाषेतील मूळ शब्द सुद्धा याच अर्थाचे आहेत.

ख्रिस्ती धर्मात प्रवेश करून ख्रिस्ताचा अनुयायी बनण्यासाठी बाप्तिस्मा विधीचा संस्कार करण्यात येतो. या विधीत पाण्यात तीनदा बुडी मारून सचैल स्नान करणे किंवा पवित्र जलाचे तीनदा प्रोक्षण करण्यात येते. बाप्तिस्मागृहात पाण्याचे कारंजे किंवा हौद असतात. बाप्त‍िस्मा करतांना स्नानासाठी किंवा विधिवत बुडी मारण्यासाठी हौदात तीन पायऱ्यांची संरचना आढळते. विश्वाचा निर्माता देव अर्थात पिता, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आणि भाविकांना मार्गदर्शन करणारा पवित्र आत्मा या त्रयदेवाचे (ट्रिनीटी) प्रतीक म्हणून तीन पायऱ्यांची रचना केलेली आढळते. तसेच चार किंवा सहा पायऱ्यांचीही रचना आढळते. पायऱ्यांच्या या संख्येमागे ख्रिस्ती धर्मातील संकेतांचा विचार आढळतो. हौदाच्या मध्यभागी सोनेरी किंवा रुपेरी कबुतर दर्शविलेले आढळतात. ख्रिस्ती धर्मात कबुतर हे नवीन आयुष्याच्या सुरुवातीचे किंबहुना प्रत्यक्ष पवित्र आत्म्याचे रूप मानले जाते. सेंट जॉनचे चित्र भिंतीवर काढण्याचा प्रघात आढळतो. त्याचबरोबर बायबलमधील प्रसंगांचे वर्णन करणारी चित्रे आणि उत्थित शिल्पे सुद्धा भिंतीवर आढळतात. बाप्तिस्मावेळी स्नान केल्यावर अनुयायांना ऊब मिळावी म्हणून शेकशेगडीचीही व्यवस्था आढळते. तसेच विधीपूर्व माणसांना तयार होण्यासाठीही खोल्या आढळतात. हौदाभोवताली खांबांना पडदे लावून माणसांचा खासगीपणा जपला जात असे.

बाप्तिस्मा विधीकरिता सुरुवातीला लहान रोमन वास्तूंचा वापर करण्यात येई. परंतु दिवसागणिक ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने वास्तूंमध्ये बदल करण्यात आले. उदा., रोम मधील लॅटेरान बाप्तिस्मागृह. चौथ्या शतकातील चौकोनी आकाराची बाप्त‍िस्मागृहे पाचव्या शतकापर्यंत अष्टकोनी आकारात बांधली गेली. त्याचे छत घुमटाकृती स्वरूपाचे आढळते. घुमट हे स्वर्गाचे प्रतीक मानलेले असल्याने बायझंटिन काळातील बाप्तिस्मागृहात अष्टकोनी कारंजाभोवती खांबांची रचना करून प्रदक्षिणा पथ तयार करण्यात आला. इटली आणि दक्षिण फ्रान्स मध्ये हे विशेषत्वाने दिसून येते. बाप्तिस्मागृहासाठी इतरत्र चौकोनी किंवा आयताकृती आराखडे वापरले गेले. बाप्तिस्मागृहामध्ये मृत ख्रिस्ती माणसांना पुरण्याचा प्रघात नसला, तरी इटलीतील फ्लोरेन्स, इंग्लंडमधील  कॅन्टेरबरी बाप्तिस्मागृहांत तत्कालीन धर्मगुरू, राजघराण्यातील व्यक्ती वगैरेंची काही थडगी आणि स्मृतिशीला आढळतात. नवव्या शतकात मात्र जेव्हा बालकांनाही ख्रिस्ती धर्माची दीक्षा देणे सुरू झाले, तेव्हा पासून स्वतंत्र इमारती बांधणे हळूहळू कमी झाले.

सुरुवातीला चर्चचा बिशप ख्रिस्ती धर्मात प्रवेश करणाऱ्यांना वर्षातील ईस्टर, पेंटेकॉस्ट, एपिफनी या तीन शुभदिनी बाप्तिस्मा देत असे. त्यामुळे सामुहिक बाप्तिस्मा देण्याची जागा चर्चपासून वेगळी आणि प्रशस्त असणे आवश्यक होते. ही बाप्तिस्मागृहे स्थानिक चर्चच्या आवारात नसून बिशपच्या अधिपत्यातील कॅथीड्रलच्या आवारात होती. इतर दिवशी हे बाप्तिस्मागृह बंद ठेवले जात असे. काही कॅथीड्रलमध्ये स्त्री आणि पुरुषांसाठी वेगवेगळी बाप्तिस्मागृहे असत किंवा एकाच बाप्तिस्मागृहात दोन वेगळेवेगळे भाग आढळतात. उत्तर इटलीमध्ये स्त्री आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या बाप्तिस्मागृहांचे पुनरुज्जीवन केले गेले. अशा ठिकाणी त्याच्याबरोबर स्वतंत्र घंटा मनोरासुद्धा बांधला जाई. बहुतांश बाप्तिस्मागृहामध्ये खिडक्यांची रचना बरीच उंचावर केलेली आढळते.

संदर्भ :

समीक्षण : श्रुती बर्वे