रॉसिटर, मार्गारेट : (८ जुलै १९४४ — ३ ऑगस्ट २०२५). अमेरिकन विज्ञान इतिहासकार. महिला शास्त्रज्ञ आणि संशोधकांच्या कामगिरीची कबुली पुरुष सहकाऱ्यांना देण्याविरुद्ध असलेल्या पक्षपाताचे वर्णन करण्यासाठी त्यांनी १९९३ मध्ये ‘माटिल्डा इफेक्ट’ हा शब्द रूढ केला.

रॉसिटर यांचा जन्म माल्डेन मॅसॅच्यूसेट्स येथे झाला. त्यांना माध्यमिक शाळेत विज्ञान-इतिहास विषयाचे अध्यन करता आले. त्यांनी रॅडक्लिफ विद्यापीठातून रसायनशास्त्र आणि विज्ञान-इतिहास या विषयांत पदवी संपादन केल्यानंतर त्या स्मिथसोनियन संस्थेत रुजू झाल्या. त्यांनी विस्कॉन्सिन मॅडिसन विद्यापीठातून एम. ए. आणि येल विद्यापीठातून अमेरिकन सायन्स हिस्ट्री या विषयात एम.फिल. केले. याआधी त्यांनी अमेरिकन सायन्टिस्ट इन जर्मनी या विषयात एम.फिल. केले होते. ॲग्रिकल्चरल सायन्स यामध्ये त्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली.

रॉसिटर यांनी येल विद्यापीठात असतांनाच महिला शास्त्रज्ञावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आयुष्यभर झटायचा निश्चय केला. त्यांनी विमेन सायन्टिस्ट इन अमेरिका-स्ट्रगल अँड स्ट्रॅटेजीज टू १९४० या पुस्तकाचे लेखन केले. त्यात १९४० पर्यंत झालेल्या अमेरीकन शास्त्रज्ञ महिलांच्या कार्याची माहिती होती. त्यांनी या पुस्तकाचे आणखी दोन भाग लिहिले त्यातील तिसरा खंड २०१२ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर त्यांनी २०१० नंतरच्या शास्त्रज्ञ महिलांचा शोध सुरू केला.

रॉसिटर यांना हार्वर्डमध्ये संशोधन करीत असतांना ‘अमेरिकन मेन ऑफ सायन्स’ या ज्ञानकोशाचा परिचय झाला, त्यात स्त्रियांबद्धलचीही माहिती होती. स्त्रियांनी वनस्पतिशास्त्र, भूशास्त्र अशा अनेक क्षेत्रपरिक्षणात्मक विषयात नावाजण्याजोगे कार्य केले होते. संदर्भाकरिता पुरावे गोळा करण्याच्या प्रयत्नात त्यांना स्त्री व्याख्यात्यांना वरच्या पदी बढती का देऊ नये, याबद्दल अनेक स्पष्टीकरण देणारी पत्रेही सापडली. विविध पत्रांच्या संदर्भावरून पुरुषी वर्चस्ववाद स्पष्ट होतो, असे त्यांच्या निदर्शनास आले.

रॉसिटर यांचे पदव्युत्तर शिक्षण संपवून दहा वर्षे झाली तरी त्यांना कुठेही कायमस्वरूपी नोकरी काही मिळाली नव्हती (१९८२). ॲलिस किंबाल स्मिथ या इतिहासतज्ञ स्त्रीने रॉसिटर यांनी १९व्या आणि २०व्या शतकातल्या वैज्ञानिक स्त्रिया यांचा सामाजिक परिस्थितीचा आयुष्यावर आणि संशोधनावर पडलेला प्रभाव याचा खूप खोलात अभ्यास केला असून तो पुस्तकात सविस्तररित्या मांडला आहे’ असे मत नोंदविले. न्यूयॉर्क टाइम्सच्या या परीक्षणामुळे रॉसिटर यांचे कार्य जगासमोर आले. कॉर्नेल विद्यापीठाने नव्याने सुरू केलेला ‘हिस्ट्री अँड फिलॉसॉफी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ या विभागात त्यांची अधिष्ठातापदावर नियुक्‍ती केली (१९९१). पुढे त्या गुणश्री प्राध्यापक म्हणूनही कार्यरत होत्या.

रॉसिटर यांनी इंग्रजी भाषेत ‘माटिल्डा इफेक्ट’ हा नवा वाक्प्रचार रुढ केला. महिलांना त्यांनी केलेल्या वैज्ञानिक संशोधनाचे श्रेय नाकारले जाते, तेव्हा ही संज्ञा वापरली जाते. याच्या उलट पुरुषांनी केलेल्या छोट्या संशोधनाचा खूप गवगवा होतो. तसेच साहाय्यक स्त्रियांचे संशोधन त्यांना योग्य ते श्रेय न देता पुरुष शास्त्रज्ञ स्वत:च्या नावावर घेतात. त्यांनी ही संज्ञा ‘मॅथ्यू गेज’ (१८२८-१८९९) या महिला वैज्ञानिकाच्या स्मरणार्थ वापरत आणली.

रॉसिटर यांना पुढील अनेक मानसन्मान आणि पारितोषिके प्रदान करण्यात आली आहेत :  गुगेनहाईम पारितोषिक, मॅकार्थर फेलो (१९८९), फायझर पारितोषिक (१९९७) इत्यादी. त्यांना ‘मेरी अंडरहिल नॉल प्रोफेसर ऑफ हिस्ट्री ऑफ सायन्स एमेरीटस’ हे पद देण्यात आले (२०१७). त्यानंतर या पारितोषिकाचे नाव बदलून ‘रॉसिटर पारितोषिक’ असे करण्यात आले.

रॉसिटर यांना झालेल्या गुंतागुंतीच्या संसर्गामुळे सलेम, मॅसॅच्युसेट्स येथे निधन झाले.

कळीचे शब्द : #महिला शास्त्रज्ञ #मानसन्मान #विमेन सायन्स

संदर्भ :

समीक्षक : अ. पां. देशपांडे