योगशास्त्रातील प्रमुख आठ सिद्धींना ‘अष्टसिद्धी’ म्हणतात. सामान्यतः ‘सिद्धी‘ या मराठी शब्दाचा अर्थ ‘साधनेतून मिळणारी विशेष शक्ती’, परंतु योगशास्त्रानुसार सिद्धी म्हणजे बाहेरून प्राप्त होणारी विशेष शक्ती नसून आपल्याच शरीरात, इंद्रियांमध्ये आणि चित्तामध्ये असलेल्या क्षमतांना साधनेद्वारे प्रकट करणे होय. संस्कृतमध्ये सिद्ध किंवा सिद्धी याचा अर्थ ‘जे पूर्वीपासून अस्तित्वात आहे, नित्य आहे’ असे तत्त्व होय.
महर्षी पतंजलीच्या ‘योगसूत्रां’मधील विभूतीपादामध्ये चित्ताची एकाग्रता केल्याने सिद्धी प्राप्त होतात यांचे वर्णन आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांवर चित्ताच्या एकाग्रतेद्वारे संपूर्ण नियंत्रण मिळविणाऱ्या सिद्धीला भूतजय म्हणतात. याद्वारे योगी एका महाभूताचे परिवर्तन दुसऱ्या महाभूतातही करू शकतो. भूतजय प्राप्त झाल्यावर योग्याला सहज ‘अष्टसिद्धी’ प्राप्त होतात, त्या पुढीलप्रमाणे :
अणिमा : या सिद्धीद्वारे योगी स्वतःच्या चित्ताच्या सामर्थ्याने आपले शरीर सूक्ष्मतम अणूच्या आकाराइतके लहान करू शकतो.
महिमा : या सिद्धीमुळे योगी इच्छेप्रमाणे त्याचे शरीर अमर्याद मोठे करू शकतो.
लघिमा : या सिद्धीमुळे योग्याचे शरीर एकदम हलके होऊन शरीराचे वजन नगण्य होते.
गरिमा : या सिद्धीमुळे योगी आपल्या शरीराचे वजन अमर्याद प्रमाणात वाढवू शकतो. शरीराचा आकार सीमित राहतो, परंतु त्याच्या शरीराचे वजन वाढते.
प्राप्ति : योगी स्वत:चे स्थान न सोडता त्याच ठिकाणी कोणतीही वस्तू प्राप्त करू शकतो. ‘प्राप्ति’ ही सिद्धी अवकाशीय मर्यादा दूर करून कोणतीही वस्तू मिळवण्याची शक्ती दर्शवते.
प्राकाम्य : या सिद्धीद्वारे योग्याच्या चित्तातील सर्व इच्छा, कामना पूर्ण होतात. अदम्य इच्छाशक्तीद्वारे, आवश्यकता पडल्यास योगी नैसर्गिक मर्यादांवर मात करूनही इच्छित साध्य करू शकतो.
ईशित्व : निसर्गातील कोणत्याही तत्त्वाला उत्पन्न करण्याची, त्याची स्थिती राखण्याची आणि त्याला नष्ट करण्याची क्षमता ही सिद्धी प्रदान करते.
वशित्व : अन्य जीवांवर म्हणजेच मनुष्य, प्राणी, पक्षी यांच्या मनातील भाव ओळखून त्यांवर संपूर्ण नियंत्रण प्राप्त करण्याचे सामर्थ्य ही सिद्धी देते.
‘योगसूत्रा’वरील व्यासभाष्यामध्ये अष्टसिद्धींमध्ये ‘यत्रकामावसायित्व’ सिद्धीचा उल्लेख आहे. त्यात योग्यांच्या इच्छाशक्तीला अबाधित ठेवण्याची किंवा त्यांना हवे ते प्रकट करण्याची शक्ती म्हणून ही सिद्धी परिभाषित केली आहे. योग्यांच्या इच्छाशक्तीला कोणत्याही भौतिक मर्यादांमुळे अडथळा येत नाही.
आधुनिक काळात प्राचीन ग्रंथांमधील सिद्धींचे वर्णन काल्पनिक किंवा अवैज्ञानिक वाटू शकते. परंतु, योगशास्त्राच्या मूळ सिद्धान्ताप्रमाणे माणसाचे चित्त (मन) हे अत्यंत सामर्थ्यशाली आहे. माणसाच्या चित्तामध्ये असणाऱ्या शक्तींची त्याला जाणीव नसते. तमोगुणाच्या प्रभावामुळे या शक्ती सुप्त असतात. तर, भौतिक सृष्टीतील महाभूते अचेतन स्वरूपाची तत्त्वे आहेत. चित्ताच्या सामर्थ्याने निश्चितच त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवून आणता येऊ शकते आणि महाभूतांमध्ये परिवर्तन करता आले तर या अष्टसिद्धी सहज प्राप्त होऊ शकतात.
योग तत्त्वज्ञानात वर्णन केलेल्या अष्टसिद्धी सांख्य दर्शनात ‘ऐश्वर्य’ म्हणून उल्लेखिलेल्या आहेत. बुद्धीच्या धर्म, अधर्म, ज्ञान, अज्ञान, वैराग्य, राग, ऐश्वर्य आणि अनैश्वर्य या आठ भावांपैकी ऐश्वर्य हा एक भाव आहे. बुद्धीमध्ये सत्त्व गुण प्रबळ झाला असताना ऐश्वर्य भाव प्रकट होतो.
संतकवी तुलसीदास यांनी लिहिलेल्या ‘श्री हनुमान चालीसा’मध्ये हनुमानाला सर्व अष्टसिद्धी प्राप्त आहेत असा उल्लेख आढळतो. योगशास्त्र, तंत्रशास्त्र आणि काही पुराण ग्रंथांमध्येही अष्टसिद्धींचे वर्णन केले आहे.
पहा : बुद्धीचे आठ भाव
संदर्भ :
- स्वामी श्री ब्रह्मलीनमुनि, ‘पातञ्जलयोगदर्शन’, चौखम्भा संस्कृत संस्थान, वाराणसी, २००३.
समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर