एक प्रसिद्ध शिवरूप. या प्रकारच्या प्रतिमेचे कंकालशिव प्रतिमेशी बरेच साम्य आहे. दोन्ही रूपांबद्दल प्रचलित असलेल्या कथांमध्येही साधर्म्य आढळते.
‘पद्मपुराणा’तील कथेनुसार ब्रह्मा एकदा १००० वर्षे चालणारा मोठा यज्ञ करत होता. शिव त्या यज्ञात नग्न होऊन भिक्षा मागण्यासाठी गेला. त्याने ‘पञ्चमुंड’ (जटामुकुटाला जोडलेल्या पाच कवट्या) आणि ‘बृहत्कपाल’ (भिक्षापात्र) धारण केले होते. त्याने अन्न मागितले, ब्रह्माने होकार दिल्यावर आपले कपाल तेथेच ठेवून शिव पुष्कर तीर्थावर स्नानासाठी गेला. इकडे ती अपवित्र वस्तू म्हणजे कपाल फेकून देण्याचा ब्रह्माने खूप प्रयत्न केला. पण त्याला ते शक्य होत नव्हते. एक कपाल काढून फेकल्यावर त्या जागी दुसरे प्रकट होऊ लागले. सरतेशेवटी, ब्रह्माने यज्ञासाठी तयार केलेल्या पुरोडाशातील काही भाग शिवाला देण्याचे मान्य केले. शिवाने ब्रह्माचे गर्वहरण करण्याची ही कथा आहे. ‘लिंगपुराणा’त आणखी एक कथा येते : जे लोक ऐहिक जीवनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून तप करतात, त्यांचे मन संसारमार्गाकडे पुन: वळावे म्हणून शंकराने काळे, कुरूप असे विचित्र रूप धारण केले आणि नग्न होऊन दारुवनात या साधकांमध्ये भिक्षा मागू लागला. त्याच्या या स्वरूपामुळे तप करणारे स्त्रीपुरुष भानावर आले आणि मानवाच्या मूळ प्रकृतीनुसार आचरण करू लागले.

कंकालमूर्ती शिवाच्या कथेनुसार ब्रह्माने ऋषीमुनींच्या एका सभेत आपणच विश्वाचे निर्माते आहोत असे प्रतिपादन केले, त्यामुळे साहजिकच शिवाला राग आला. वेद आणि प्रणव (उच्चारी ॐ) यांनीही शिवाची बाजू घेतली तरीही ब्रह्मा आपला हेका सोडत नव्हता, तो शिवाची निंदा करू लागला. तेव्हा शिवाने भैरवाला आज्ञा केली की, ब्रह्माच्या पाच मुखांपैकी हे निंदा करणारे मुख तोडून टाक. ही एकप्रकारे ब्रह्महत्याच होती आणि ते पातक शिवाच्या शिरावर आले. त्यातून मुक्त होण्याचा मार्ग पुनः शिवाने ब्रह्मालाच विचारला. ब्रह्माने सांगितले की, त्या कापलेल्या मुंडक्यात भिक्षा मागत तीर्थयात्रा करावी. वाराणसी या तीर्थक्षेत्रीच त्याला मुक्ती मिळेल. त्याप्रमाणे शिव भिक्षा मागत तीर्थयात्रा करू लागला. तो वैकुंठापाशी आला असताना तेथील द्वारपाल विश्वकसेन याने त्याला अडवले. तेथे झालेल्या द्वंद्वयुद्धात विश्वकसेनाचे शीर धडावेगळे झाले; याचे शिवाला फार दुःख झाले. शिवाने विश्वकसेनाचा सापळा (कंकाळ) त्रिशुळाला बांधला आणि तो वाराणसीला गेला व तेथे तो पापमुक्त झाला. विश्वकसेनालाही जीवनदान मिळाले.
भिक्षाटन शिवाचे वर्णन आगम ग्रंथांत आढळते. ‘अंशुमद्भेदागम’, ‘उत्तरकारणागम’, ‘शिल्परत्न’, ‘सुप्रभेदागम’ तसेच ‘श्रीतत्त्वनिधी’ या ग्रंथांत या प्रकारच्या प्रतिमेचे बारकावे सांगितले आहेत. उत्तर भारत व दक्षिण भारत दोन्हीकडे या प्रतिमा घडवल्या जात. ग्रांथिक वर्णनाप्रमाणे शिवप्रतिमा त्रिनेत्र व चतुर्भुज असावी. शिवाचा डावा पाय ठामपणे जमिनीवर रोवलेला असावा आणि उजवा पाय जणू चालण्याच्या आविर्भावात आहे अशा प्रकारे वाकलेला असावा. बेंबीपर्यंत उचललेल्या पुढच्या डाव्या हातात कपाल/भिक्षपात्र तर मागच्या उजव्या हातात डमरू असावा. त्याच्या जटा सर्वत्र पसरलेल्या तरी असाव्यात किंवा गोलाकार गुंडाळलेल्या तरी असाव्यात. मस्तकावर चंद्रकोर आणि तीन नरमुंडे असावीत. शिव नग्न असावा आणि कमरेला सर्प गुंडाळलेला असावा. इतरही आभूषणे सर्पाची असावीत. कंकालमूर्ती आणि भिक्षाटनमूर्ती या दोन्ही प्रकारच्या प्रतिमांमधील मुख्य फरक म्हणजे भिक्षाटन प्रतिमेत शिव नग्न असतो.
लखनौ संग्रहालयात एक सुरेख भिक्षाटन शिवप्रतिमा आहे. तेथे आढळणारे एक वैशिष्ट्यपूर्ण लक्षण म्हणजे आयुधपुरुषाच्या रूपात त्रिशूल दिसतो. तंजावरच्या बृहदीश्वर मंदिरात एका भिंतीवर भिक्षाटनमूर्ती आहे. शिव चतुर्भुज असून तो नग्न आहे. पुढच्या डाव्या हातात कपाल, तर मागच्या डाव्या हातात सोटा असून तो खांद्यावर घेतला आहे. त्याच्या डाव्या पायाला एक छोटी घंटा बांधलेली आहे. त्याच्या उजवीकडे हरीण आणि डावीकडे डोक्यावर पात्र घेऊन एक गण उभा राहिलेला दिसतो. कांचीपुरम येथील कैलासनाथ मंदिरावरील भिक्षाटनमूर्ती द्विभुज आहे.
संदर्भ:
- Rao, T. A. G., Elements of Hindu Iconography, Vol. II, Part I, Motilal Banarsidass Publishers Pvt. Ltd., Delhi, 1914; 1997.
- खरे, ग. ह., ‘मूर्तिविज्ञान’. भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९३९; २०१२.
- जोशी, नी. पु., ‘भारतीय मूर्तिशास्त्र’, प्रसाद प्रकाशन, पुणे, १९७९; २०१३.
- देगलूरकर, गो. बं., ‘शिवमूर्तये नमः’, स्नेहल प्रकाशन. पुणे, २०१४.
समीक्षक : श्रीकांत गणवीर