सहानी, बिरबल : (१४ नोव्हेंबर १८९१ — १० एप्रिल १९४९). भारतीय जीवशास्त्रज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ आणि पुरावनस्पतिशास्त्रज्ञ. भारतातील जीवाश्म वनस्पतींचा आणि वनस्पती उत्क्रांतीच्या अभ्यासात त्यांचे प्रमुख योगदान होते. भारतीय विज्ञान शिक्षणाच्या स्थापनेतही सहभागी होते.

सहानी यांच्या जन्म पंजाबमधील शाहपूर जिल्ह्यातील भेरा (सध्या पाकिस्तानात) या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण लाहोरच्या मिशन अँड सेन्ट्रल मॉडेल स्कूलमध्ये झाले. त्यांनी पुढील शिक्षणासाठी लाहोरच्या शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांचे वडील प्रा. रुची राम सहानी हे तेथेच रसायनशास्त्राचे प्राधापक होते. वनस्पतिशास्त्राचे प्रसिद्ध अभ्यासक व संशोधक प्रा. शिवराम कश्यप हे शासकीय महाविद्यालयात त्यांचे प्राध्यापक होते. त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी पंजाब विद्यापीठातून पदवी प्राप्त केली (१९११).त्यांनी नॅचरल सायन्स ट्रायपॉसचा पहिला भाग (१९१३) आणि दुसरा भाग (१९१५) पूर्ण केला. त्याचवेळी त्यांनी लंडन विद्यापीठाची बी.एस्सी. पदवीही मिळवली. यानंतर त्यांनी प्रसिद्ध पुरावनस्पतिशास्त्रज्ञ अल्बर्ट चार्ल्स सेवर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली पुरावनस्पतिशास्त्रात (पॅलिओबॉटनी) या विषयात संशोधनकार्य करून जीवाश्म वनस्पतीमधील शोधकार्यासाठी लंडन विद्यापीठाची डी. एस्सी. पदवी संपादन केली (१९१९).

सहानी यांना केंब्रिमध्ये असताना लॉवसन यांच्या ‘टेक्स्टबुक ऑफ बॉटनी’ या पुस्तकाची सुधारित आवृत्ती काढण्यास सांगितले गेले. हे पुस्तक भारतातील विद्यार्थ्यांना आजही उपयोगी पडते. पुढे काही काळ जर्मनीत राहून भारतात परतल्यावर एक वर्ष त्यांनी वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठ आणि नंतर पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर लखनौ विद्यापीठात नव्याने सुरू झालेल्या वनस्पतिशास्त्र विभागात प्राध्यापक (१९२१) आणि नंतर विभाग प्रमुख म्हणून काम केले. याच विद्यापीठात त्यांनी भूगर्भशास्त्र हा विभाग सुरू केला. त्यांनी विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागाला शिक्षण आणि संशोधनाच्या बाबतीत जागतिक दर्जा मिळवून दिला.

सहानी यांच्या पुरावनस्पतिशास्त्रातील शोधकार्याने भारतातील सर्व भाग व्यापल. त्यांनी मोठ्या प्रमाणात बिहारच्या राजमहाल हिल्स येथील जीवाश्मांचा अभ्यास केला आणि संकलनही केले. याच भागात त्यांनी ‘जिग्मारपर्म’ जीवाश्माचा नवीन गट तयार केला आणि त्याचे ‘पॅन्टोझाईली’ म्हणून नामकरण केले. त्यांनी राजमहाल हिल्समधील जीवाश्म ‘टिलोफायलम’ यावरही संशोधन केले. ‘स्टेन बुआकलेंडीया’, ‘पान टिलोफायलम’ आणि फूल ‘विलियमसोनिया’ हे एकाच वृक्षाचे भाग आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी या जीवाश्म वनस्पतीची पुनर्रचना करून त्यास विलियमसोनिया सेवार्डीयाना असे नाव दिले. याचा उल्लेख जागतिक स्तरावर प्रसिद्ध झालेल्या सर्व पुस्तकात आवर्जून केला गेलेला आहे. त्यांना असा विश्वास होता, की पुरावनस्पतिशास्त्राचा अभ्यास भूगर्भशास्त्र आणि भूगोल या विषयांसोबत झाला पाहिजे. कारण याच वातावरणात वनस्पती जन्मतात आणि नष्ट पावतात. त्यांना पुरातत्त्वशास्त्रात रुची असल्याने त्यांनी भारतात प्राचीन काळी नाणी कशी गाळली जायची याच्या तंत्रावरसुद्धा शोधकार्य केले.

सहानी यांना अनेक सन्मान आणि पुरस्कार प्राप्त झाले. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे : नेल्सन राईट पदक, बर्कले पदक, फेलो ऑफ रॉयल सोसायटी ऑफ लंडन, इन्साचे उपाध्यक्ष, आंतरराष्ट्रीय वनस्पतिशास्त्र परिषदेचे मानद अध्यक्ष, नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेसचे अध्यक्ष, अमेरिकन अकादमी ऑफ आर्टस अँड सायन्सेसचे परदेशी सभासद, इंडियन सायन्स काँग्रेसच्या वनस्पतिशास्त्र विभागाचे दोनदा अध्यक्ष आणि एकदा भूगर्भशास्त्र विभागाचे अध्यक्ष, पुरावनस्पतिशास्त्र विभागाचे उपाध्यक्ष आणि इंडियन सायन्स काँग्रेसचे जनरल प्रेसिडेंट.

सहानी यांनी लखनौ येथे बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओबॉटनी या संस्थेची स्थापना केली (१९४६). लखनौ येथील सीएसआयआरच्या वनस्पतिशास्त्र प्रयोगशाळेचे नाव त्यांच्या स्मरणार्थ ‘बिरबल सहानी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओबॉटनी’ असे करण्यात आले.

सहानी प्रमस्तष्कि आंतरक्लथन या आजाराने पीडित झाल्याने लखनौ येथे त्यांचे निधन झाले.

कळीचे शब्द : #पॅलिओबॉटनी

संदर्भ :

समीक्षक : नागेश टेकाळे