‘अनिर्वचनीय’ या विशेषणाचा शब्दशः अर्थ अवर्णनीय असा आहे. भारतीय ज्ञानमीमांसेतील विशेषतः अद्वैतवेदान्तातील ही एक पारिभाषिक संकल्पना आहे. कोणत्याही पारिभाषिक संकल्पनेचा अर्थ ज्याप्रमाणे नेमक्या व निश्चित अशा संदर्भामध्येच समजावून घेता येतो, त्याप्रमाणे अद्वैताच्या परंपरेमध्येही याला नेमका व निश्चित असा संदर्भ व अर्थ आहे. अद्वैत मतामध्ये अनिर्वचनीय हा शब्द ब्रह्म आणि माया अथवा अविद्या या दोन्ही संदर्भात येतो. अद्वैताच्या घरामध्ये ‘ब्रह्मन्’ हे पारमार्थिक सत् अवर्णनीय आहे; तसेच अविद्या, माया व त्यापासून निर्माण होणारा अध्यास किंवा भ्रमज्ञानही अवर्णनीय आहे. परंतु या दोन्ही संदर्भांमध्ये अवर्णनीयत्वाच्या अर्थच्छटा व त्यामागील कारणमीमांसा मात्र अतिशय भिन्न आहेत.

एखादी वस्तू किंवा पदार्थाचे स्वरूप समजावून घेण्याचा सर्वांत सुलभ, सोपा मार्ग म्हणजे त्या वस्तूचे तिच्या विविध गुणधर्मांच्या साहाय्याने केलेले वर्णन विचारात घेणे होय. शंकराचार्यांच्या मते, ‘ब्रह्मन्’ ही एकमात्र सद्वस्तु आहे. ब्रह्म हे सत्, चित् आणि आनंदस्वरूप आहे. निर्गुण आणि निराकार दोन्ही आहे. तसेच सर्वगत, सर्वव्यापकही आहे (वस्तुमात्र पर्यावसायीनि हि ब्राह्मवाक्यानि | ब्रह्मसूत्रभाष्य ३.२.२१). विभू , परिपूर्ण, सर्वांन्तर्यामी असे सूक्ष्म असल्याने आपल्या ज्ञानाचा विषय कधीही होऊ शकत नाही. कोणत्याही लौकिक प्रमाणाने (प्रत्यक्ष, अनुमान इ. ज्ञानसाधनांनी) तिचे ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही; कारण सर्व प्रमेय-प्रमाण व्यवहार अद्वैताच्या नव्हे, तर द्वैत, भेद, व नानात्व यांच्या संदर्भात व चौकटीतच समजावून घेता येतात. त्यामुळे त्याचे वर्णन भाषेतील विविध शब्द, पदे आणि संकल्पना यांच्या साहाय्याने करण्याचा प्रयत्न केला, तरी कोणतेही भावरूप वर्णन त्याचे यथार्थ व योग्य स्वरूप पकडण्यात, ते शब्दबद्ध करण्यात सफल होत नाही. कोणतेही शब्द ते नेमके कसे आहे, हे स्पष्ट करण्यासाठी अपूर्ण, अपर्याप्त ठरतात. ते वर्णनाच्या पलीकडे किंवा शब्दातीत आहे. या अर्थाने शंकराचार्यांच्या मते ‘ब्रह्मन्’ अवर्णनीय आहे. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील व्हिट्गेन्श्टाइन यांच्या कितीतरी शतके पूर्वी उपनिषदांनी आणि शंकराचार्यांनी आपल्या लौकिक प्रमाणांच्या आणि भाषेच्या मर्यादा स्पष्टपणे अधोरेखित केलेल्या आहेत. म्हणूनच त्याचे वर्णन ‘नेति-नेति’ या निषेधात्मक वा नकारार्थक शब्दांनी केले जाते. हा मुद्दा त्यांनी आपल्या ‘एतरेयोपनिषदभाष्या’मध्ये (२.४.१) ‘यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह’ या श्रुतीच्या साहाय्याने अतिशय सुंदर पद्धतीने स्पष्ट केला आहे. ते म्हणतात, “असणे-नसणे, एक-अनेक, सगुण-निर्गुण, जाणणे-न जाणणे, सक्रियता-निष्क्रियता, सफल-निष्फल, सबीज-निर्बीज, सुख-दुःख, मध्य-अमध्य, शून्य-अशून्य, जीवात्मा-परमात्मा इत्यादी सर्व वाक्प्रत्यय ‘ब्रह्मन्’ला लागू पडत नाहीत, आणि जो या शब्दांच्या द्वारा निर्गुण-निराकार, शब्दातीत अशा ‘ब्रह्मन्’चे स्वरूप पकडण्याचा प्रयत्न करतो असा कोणताही प्रयत्न आकाशाला चामड्यासारखे काहीतरी गुंडाळण्याचा किंवा शिडीसारखे आकाश चढून जाण्याचा, पाण्यावर माशांच्या पावलांच्या, किंवा आकाशात भरारी घेणाऱ्या पक्षांच्या पाऊलखुणा शोधण्याचा प्रयत्न करण्यासारखे व्यर्थ आहे”.

‘सद्ही नाही आणि असद्ही नाही ते अनिर्वचनीय’ अशी अनिर्वचनीयची व्याख्या मायेच्या संदर्भात अद्वैतवेदान्तात येते. ब्रह्मज्ञान झाल्यावर माया नाहीशी होत असल्याने तिला सद् म्हणता येत नाही आणि जगताचा विस्तार मायेच्या शक्तीमुळे झाल्यामुळे तिला असद्ही म्हणता येत नाही. म्हणून तिचा निर्देश अनिर्वचनीय असा करण्यात येतो. या मायेच्या प्रभावामुळेच संपूर्ण जग हे ब्रह्म या एकेमेव सद्वस्तूवरील अध्यास आहे असे म्हटले आहे. म्हणून अद्वैत मतात जगाला मिथ्या म्हटले आहे. जीवाच्या दृष्टीने मायेला अविद्या म्हटले जाते. म्हणूनच माया, अविद्या, अध्यास इत्यादींच्या संदर्भात अनिर्वचनीय शब्द येतो.

शंकराचार्य अविद्या, अज्ञान व अध्यास हे तीनही शब्द समानार्थक आहेत, असे स्वीकारतात आणि तसाच त्यांचा प्रयोगही करतात. परंतु विशेषतः ‘विवरण’कार पद्मपाद आणि प्रकाशात्मन अविद्या आणि अध्यास यांमध्ये कार्यकारणसंबंध मानतात. त्यांच्या मते अविद्या हे अध्यासाचे कारण आहे. पद्मपादांपासून ‘विवरण’परंपरेतील सर्वच आचार्य ‘अनिर्वचनीय’ या शब्दाचा प्रयोग मिथ्यावस्तू आणि मिथ्याज्ञानाच्या संदर्भात करतात. ‘भामति’कार वाचस्पतिमिश्राही अविद्या व मायेच्या संदर्भात हा शब्दप्रयोग करतात (‘ब्रह्मसूत्र’ १.४.३). त्यांचे भ्रमज्ञानविषयक विवेचन मात्र न्यायदर्शनाच्या अन्यथाख्यातीसारखे वाटते. भ्रमज्ञानाच्या संदर्भात ‘अनिर्वचनीय’ या विशेषणाचा उल्लेख सर्वप्रथम ‘विवरणप्रस्थाना’चे प्रणेते पद्मपादाचार्यांनी आपल्या ‘पंचपादिके’मध्ये केला. आपल्या ‘अध्यासभाष्या’मध्ये सुरुवातीलाच त्यांनी ‘मिथ्या’ या शब्दाचा अर्थ अनिर्वचनीय असा होतो, हे स्पष्ट केले (मिथ्येति अनिर्वचनीयता उच्यते| माया, मित्थ्या अनिर्वचनीयख्याति:|). ‘विवरणप्रस्थाना’चे हिरिरीने समर्थन करणारे व ते नावारूपाला आणणारे प्रकाशात्मन पद्मपादांच्याही एक पायरी पुढे जाऊन भावरूप व वस्तुरूप अशी मूलाविद्या स्वीकारतात. तसेच अविद्या आणि माया यांमध्ये दोन भिन्न प्रकारे भेद करतात. एक म्हणजे अविद्या; तिला ते तूलाविद्या असेही म्हणतात. ही मूलाविद्येची सूक्ष्मजैविक पातळीवरील अभिव्यक्ती होय. तर माया ही वैश्विक पातळीवरील अभिव्यक्ती होय. अविद्या ही व्यक्तिनिष्ठ असते, तर माया सामायिक किंवा वस्तुनिष्ठ असते. दुसऱ्या प्रकारे भेद त्यांनी मूलाविद्येच्या आवरण आणि विक्षेप या दोन शक्तींच्या साहाय्याने स्पष्ट केला आहे. अध्यासाच्या संदर्भात मूलाविद्येच्या आवरणात्मक शक्तीचे प्राधान्य असेल, तर तिला ते ‘अविद्या’ किंवा ‘तूलाविद्या’ असे म्हणतात. याउलट, तिच्या विक्षेप शक्तीचे प्राचूर्य असेल, तर तिला ते ‘माया’ असे संबोधतात (एकस्मिन्नपि वस्तुनि विक्षेपप्राधान्येन माया आच्छादनप्राधान्येन अविद्येति व्यवहारभेदः|). त्यामुळे विवरणाच्या परंपरेमध्ये प्रकाशात्मनांपासून ‘विवरणप्रस्थाना’तील सर्वच अद्वैती ‘अनिर्वचनीय’ या शब्दाचा प्रयोग प्रामुख्याने भावरूप व वस्तुरूप अशा मूलाविद्या व तिच्या दोन वस्तुरूपच असलेल्या वैश्विक आणि सूक्ष्मजैविक पातळ्यांवरील शक्ती क्रमशः माया व अविद्या/तूलाविद्या या मिथ्यावस्तूंच्या संदर्भात करतात. एवढेच नव्हे, तर त्यांच्यामुळे वैश्विक आणि सूक्ष्मजैविक पातळ्यांवर घडून येणारा अध्यास म्हणजे मिथ्याज्ञान, भ्रमज्ञानाच्याही संदर्भात करतात. यासंदर्भातही ‘अनिर्वचनीय’ याचा अर्थ अवर्णनीय असाच आहे. मात्र अर्थच्छटा भिन्न आहे. मूलाविद्या आणि तिच्या दोन शक्ती अविद्या/तूलाविद्या व माया या मिथ्यावस्तू पारमार्थिक सत् ‘ब्रह्मन्’प्रमाणे सर्वदा सत् नाहीत. कारण त्यांना ‘ब्रह्मन्’पासून वेगळे व स्वतंत्र असे अस्तित्वच नाही. अर्थात त्यांचा आश्रय व विषय दोन्ही ‘ब्रह्मन्’च आहे. तसेच त्या पूर्णतः असत् ही नाहीत. कारण त्या आपल्या आवरण आणि विक्षेप शक्तींच्या साहाय्याने वैश्विक आणि सूक्ष्मजैविक पातळींवर मिथ्या स्वरूपाचे ज्ञान किंवा भ्रमज्ञान निर्माण करण्यात यशस्वी ठरतात. त्या सदसत् विलक्षण, सदसदनिर्वचनीय आहेत. अनिर्वचनीय वस्तूपासून निर्माण झालेले ज्ञानही तितकेच अनिर्वचनीय असते. ते पूर्णतः सत्यही म्हणता येत नाही किंवा पूर्णतः असत्यही म्हणता येत नाही. जोपर्यंत आपल्यावर अविद्या किंवा माया यांचा प्रभाव किंवा पगडा असतो, तोपर्यंत ते आपल्याला सत्य वाटते. परंतु सत्य वा यथार्थ ज्ञानाचा उदय झाल्यावर त्याचे मिथ्यात्व बाधज्ञानाने स्पष्ट होते. थोडक्यात माया, अविद्या या मिथ्यावस्तू व त्यापासून निर्माण होणारे मिथ्याज्ञान, भ्रमज्ञान किंवा अध्यास अनिर्वचनीय अर्थात अवर्णनीय  आहे.

१६ व्या शतकात विज्ञानभिक्षूनेही आपल्या ‘योगवार्तिकभाष्या’त ‘आदित्यपुराणा’तील वचनाच्या आधारे माया नेमकी कशी आहे त्याचे स्वरूप स्पष्ट केले आहे. माया सत् नाही तसेच असत् ही नाही, किंवा सत् व असत् दोन्ही नाही. कारण एकाचवेळी तिला सत् व असत् मानण्यात अंतर्विरोध आहे. म्हणून ती अनिर्वाच्य म्हणजे अवर्णनीय आहे. म्हणजे ती सदसत् विलक्षण, सदसदनिर्वचनीय आहे.

पहा : अनिर्वचनीयख्याती.

संदर्भ :

  • पद्मपादाचार्य; प्रकाशात्मयती, ‘पंचपादिका पंचपादिकाविवरणं च’, शासकीय प्राच्यविद्यामाला, मद्रास, १९५८.
  • शंकराचार्य, ‘ब्रह्मसूत्रशांकरभाष्यम्’, निर्णयसागर प्रत, मुंबई, १९४८.

समीक्षक : सीमा सोनटक्के