(स्थापना : १९१९). जर्मनीतील एक कलाशिक्षण संस्था. कला, कारागिरी व तंत्रविद्या यांचा समुचित समन्वय साधून या संस्थेने पश्चिमी कलाशिक्षणात क्रांती घडवून आणली. जर्मन वास्तुविशारद वॉल्टर ग्रोपिअस (१८८३ – १९६९) याने वायमार येथे त्याच्या संचालकत्वाखालील ‘ग्रँड ड्यूकल सॅक्सन स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट्स’ आणि ‘सॅक्सन अकॅडमी ऑफ फाइन आर्ट्स’ या दोन संस्थांचे एकत्रीकरण करून ‘बौहाउस’ (इं.शी. हाउस ऑफ बिल्डिंग म्हणजे वास्तुघर) या संस्थेची १९१९ मध्ये स्थापना केली. पुढे १९२८ पर्यंत संस्थेचा संचालक या नात्याने त्याने तिची जडणघडण केली. संस्थेच्या शिक्षणक्रमात चित्रकला, मूर्तिकला अशा ललित कलांचा अंतर्भाव असला, तरी मुख्यत्वे वास्तुकला व तत्संबद्ध उपयोजित कलाप्रकार यांवरच विशेष भर दिला जात असे. त्या दृष्टीने सुतारकाम, धातुकाम, मृत्पात्री, चित्रकाचतंत्र, भित्तिचित्रण, विणकाम, आरेखन कला, मुद्रणयोजन, रंगमंचतंत्र इ. विषय शिकवले जात. कलात्मक सौदर्यांची मूल्ये, समाजशास्त्र यांसारख्या विषयांचाही त्यात अंतर्भाव असे. एकोणिसाव्या शतकात कला व कारागिरी असा स्पष्ट भेद केला जात असे ग्रोपिअसने या संस्थेच्या शिक्षणक्रमात त्यांचा समन्वय साधून त्यांना परस्परपूरक स्वरूप दिले. विसाव्या शतकातील प्रचंड यांत्रिकीकरणास प्रतिकार न करता यंत्र हे साधन मानून त्याचा उपयोग करावा व यांत्रिक उत्पादनामागे कारागीर-आकृतिबंधकार यांचा अर्थपूर्ण सहभाग असावा, असाही दृष्टिकोण या शिक्षणपद्धतीमागे होता. या दृष्टीने या संस्थेने वस्तूच्या प्रचंड घाऊक यांत्रिक उत्पादनासाठी तिचे मूळ आकृतिबंध (प्रोटोटाइप) निर्माण केले. कलावंतांना कारागिरीचे व औद्योगिक आकृतिबंधांचे प्रशिक्षण देऊन समाजामध्ये व्यवहारोपयोगी घटक म्हणून सन्माननीय स्थान मिळवून देण्याचे कार्यही या संस्थेने केले. आकृतिबंधाची साधीसुधी अनलंकृत शैली घडविण्याकडे या संस्थेचा कटाक्ष होता. सुटसुटीत कार्यपद्धती, भौमितिक आकारांना प्राधान्य आणि वस्तु-उत्पादनामध्ये जी माध्यमद्रव्ये वापरावयाची, त्यांच्या नैसर्गिक गुणधर्मांचे आकृतिबंधातून राखलेले भान ही बौहाउस कलाशिक्षणपद्धतीची ठळक वैशिष्ट्ये होत. विसाव्या शतकातील अनेक श्रेष्ठ कलावंत या संस्थेच्या शिक्षकवर्गात होते. पॉल क्ले (चित्रकाच आणि चित्रकला), लास्लो मोहॉइनॉड्य, व्हस्यील्यई कंड्यीन्स्कई (भित्तिचित्र), लायनिल फायनिंगर (आरेखन कला), ओस्कार श्लेमेर (रंगतंत्र आणि मूर्तिकला), मार्सेल ब्रॉयर (अंतर्गत सजावट), हर्बर्ट बायर (मुद्रणयोजन आणि जाहिरात), गेरहार्ड मार्क्स (मृत्पात्री), गेओर्ख मुख (विणकाम) इत्यादीचा उदाहरणादाखल निर्देश करता येईल. वायमार येथील राजकीय विरोधामुळे १९२५ मध्ये बौहाउसचे देसौ येथे स्थलांतर झाले. त्या ठिकाणी ग्रोपिअसने संस्थेच्या वेगवेगळ्या शाखांसाठी विशेष वास्तूंची वैशिष्ट्यपूर्ण आखणी केली. ग्रोपिअस १९२८ मध्ये संस्थेच्या संचालकपदावरून निवृत्त झाले आणि हान्स मायर या स्वीस वास्तुशिल्पज्ञाची त्याच्या जागी नियुक्ती झाली. १९३० मध्ये त्याच्या जागी संचालक म्हणून प्रसिद्ध जर्मन वास्तुशिल्पज्ञ मीएस व्हान डेर रोअ याची नेमणूक करण्यात आली. १९३२ मध्ये वाढत्या राजकीय विरोधापायी संस्था देसौहून बर्लिनला हालविण्यात आली; परंतु पुढे अल्पावधीतच १९३३ मध्ये नाझी राजवटीने या संस्थेवर कायमची बंदी घातली. मात्र दरम्यान या संस्थेने वास्तुकला, फर्निचर, वस्त्रप्रावरणे, मुद्रणयोजन इ. कलाक्षेत्रांत निर्माण केलेले आकृतिबंध व कलाशिक्षणाच्या अभिनव संकल्पना अनेक देशांत प्रसृत झाल्या व त्यांना मोठ्या प्रमाणावर मान्यता लाभली. अमेरिकेमध्ये मोहॉइनॉड्य याने शिकागो येथे १९३७ मध्ये नव्या बौहाउसची स्थापना केली. पुढे तिचे नामकरण ‘द इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन’ असे झाले. बौहाउसची कार्यप्रणाली पुढे चालू ठेवणारी ही एक उल्लेखनीय संस्था होय.
बौहाउसमध्ये स्त्रीयांनानासुद्धा प्रवेश देण्यात आले होते. पूर्वी जर्मनीमध्ये महिलांना घराबाहेर जाऊन कलेचे शिक्षण घेण्याच्या फार कमी संधी होत्या. ॲनी अल्बर हिने चित्रकलेचे शिक्षण घेऊन सुद्धा तिची नियुक्ती बौहाउसमध्ये विणकाम शाखेत करण्यात आली. सुरुवातीच्या तिच्या अनिच्छेनंतर तिने या माध्यमातील आव्हाने स्वीकारण्यास सुरुवात करून असामान्य पदार्थ विणण्याचा प्रयोग केला. तसेच चित्रकार मारियान ब्रँड्स हिने व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी कलाकृतींपैकी एक कांडेम बेडसाइड टेबल लँप (१९२८) तयार केले होते.
संदर्भ :
- Bayer, H. Ed. The Bauhaus 1919-1928, 1966.
- Gropius, Walter, The New Architecture and the Bauhaus, London, 1955.
समीक्षक : वेदान्त विजय महाजन