ऐसमोग्लू, डेरॉन (Acemoglu, Daron) : (३ सप्टेंबर १९६७). आर्मेनियन वंशाचे प्रसिद्ध तुर्की-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि २०२४ च्या नोबेल स्मृती पुरस्काराचे सहमानकरी. त्यांचा जन्म तुर्कस्थानमधील इस्तांबुल येथे झाला. त्यांचे वडील केवोर्क असेमोग्लू इस्तंबूल विद्यापीठात व्यावसायिक वकील आणि व्याख्याते होते; तर आई इर्मा असेमोग्लू या अरामयान उन्कुयानच्या प्राचार्य होत्या. एखाद्या देशात संस्था कशा तयार होतात आणि त्यांचा समृद्धीवर कसा परिणाम होतो, यावर डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए. रॉबिन्सन यांनी संशोधन केले असून त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना २०२४ या वर्षीचा नोबल पारितोषिक जाहीर करण्यात आला.

डेरॉन यांचे शिक्षण न्यूयॉर्क विद्यापीठातून झाले असून तेथे त्यांनी १९८९ मध्ये अर्थशास्त्रात बी. ए. केले आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून १९९० मध्ये अर्थमीती आणि गणितीय अर्थशास्त्रात एम. एससी आणि १९९२ मध्ये अर्थशास्त्रात पीएच. डी प्राप्त केली. ‘एसेज इन मायक्रोफाउंडेशन्स ऑफ मॅक्रोइकॉनॉमिक्स : कॉन्ट्रॅक्ट्स अँड इकॉनॉमिक परफॉर्मन्स’ हे त्यांच्या डॉक्टरेट प्रबंधाचे शीर्षक होते. पीएच. डी. पूर्ण करण्यासाठी केविन डब्ल्यू. एस. रॉबर्ट्स यांनी मार्गदर्शक व सल्लागार म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. एलएसईमधील त्यांच्या डॉक्टरेट परीक्षकांपैकी एक जेम्स माल्कमसन म्हणाले की, ‘त्यांच्या प्रबंधातील सात प्रकरणांपैकी कोणतेही तीन प्रकरणे हे पीएचडीच्या पुरस्कारासाठी पुरेशी होती’. असेमोग्लू हे १९९२-९३ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अर्थशास्त्राचे व्याख्याते होते. त्यांना १९९३ मध्ये एमआयटीमध्ये साहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त करण्यात आले. तेथे १९९७ मध्ये ते पेंटी कौरी अर्थशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक झाले आणि २००४ ते २०१० या काळात त्यांनी तेथे चार्ल्स पी. किंडलबर्गर प्रोफेसर ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक्स म्हणून काम केले. नंतर २०१० मध्ये डेरॉन यांना एमआयटीमध्ये अर्थशास्त्राचे एलिझाबेथ आणि जेम्स किलियन प्रोफेसर म्हणून नियुक्त करण्यात आले. जुलै २०१९ मध्ये त्यांना एमआयटीमधील सर्वोच्च प्राध्यापक सन्मान इन्स्टिट्यूट प्रोफेसर म्हणून नियुक्त करण्यात आले. ते गृप ऑफ थर्टी चे सदस्यही आहे.

डेरॉन यांनी १९९३ पासून एमआयटीशी संबंधित त्यांच्या संशोधन कार्यात राजकीय आणि आर्थिक संस्थांचा प्रभाव समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या संशोधनात राजकीय आणि आर्थिक संस्था एखाद्या देशाच्या समृद्धीवर कसा परिणाम करतात, यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या मते, सर्वसमावेशक संस्था आर्थिक विकासास चालना देतात. त्यांनी जगातील देशांच्या समृद्धीमध्ये इतका मोठा फरक का आहे, याबद्दल नवीन अंतर्दृष्टी प्रदान केली आणि वर्षानुवर्षे प्रगती करूनही गरीब देशांचा श्रीमंत देशांसारखा विकास कसा होऊ शकला नाही, याचे कोडे सोडविण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही देशाच्या समृद्धीचा तेथील संस्थांशी संबंध काय? सोव्हिएत युनियन का कोसळले? निरंकुश चीनचा अंतही सोव्हिएत युनियनप्रमाणे होईल का? या प्रश्नांचा शोध घेतल्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक जाहीर झाले.

नोगल्स हे शहर अमेरिका-मेक्सिको सीमेवर स्थित असून ते मेक्सिकोच्या सोनोरा प्रांताचा भाग आहे. सीमावर्ती भाग असल्याने ते शहर भौगोलिक दृष्ट्या विभागलेले आहे. या शहराचा एक भाग अमेरिकेच्या ॲरिझोना बाजूला येतो, तर दुसरा भाग मेक्सिकोच्या बाजूला येतो. या अनोख्या स्थितीमुळे मेक्सिकन लोक या शहराला नोगेल्स ॲरिझोनादेखील म्हणतात. या शहराचा अभ्यास करताना डेरॉन यांनी म्हटले की, ‘ॲरिझोनाच्या अमेरिकन बाजूने येणारा नोगल्स शहराचा भाग अधिक समृद्ध, तर मेक्सिकोच्या बाजूने येणारा भाग आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे. शहराच्या या दोन्ही भागांमध्ये हवामान, भूगोल आणि लोकसंख्या समान आहे; पण संस्थांच्या संरचनेत फरक आहे. एकीकडे अमेरिकेने राजकीय हक्कांचे संरक्षण करणाऱ्या व आर्थिक संधी निर्माण करणाऱ्या सर्वसमावेशक संस्था निर्माण केल्या. त्याच वेळी मेक्सिकोचा भूतकाळ स्पेनच्या वसाहतवादाशी जोडला गेला. त्याने स्वतःच्या फायद्यासाठी मेक्सिकोचे प्रत्येक स्तरावर शोषण केले. त्यामुळे अमेरिकेपुढे असूनही मेक्सिको मागासलेला आहे. म्हणून एकाच शहरातील दोन्ही भागांत संबंधित संस्थांचा प्रभाव वेगवेगळा होता.

डेरॉन यांनी त्यांच्या या अभ्यासातून वसाहतकालीन इतिहास व त्याचा राजकीय सामाजिक संस्थांशी असलेला परस्परसंबंध आणि त्याचा आर्थिक विकासावर होणारा परिणाम यांची यथायोग्य सांगड घातली आहे. राजकीय व सामाजिक संस्थांचा उदय, त्यांची रचना आणि त्यांचा आर्थिक विकासावर होणारा अभ्यास या विषयांवर बेतलेला हा अभ्यास प्रकल्प हा एकप्रकारे जागतिक अर्थव्यवस्थेचा वसाहतपूर्वकाल आणि वसाहतोत्तर कालखंड यांची स्पष्ट माहिती दर्शविते. विशेषतः भारतासारख्या वसाहतवादाचा बळी ठरलेल्या आणि दीर्घकाळ विकासापासून वंचित राहिलेल्या समाजाचा आर्थिक इतिहास डेरॉन यांच्या या संशोधनातून दिसून येतो. या वंचित राष्ट्रांमध्ये भारत आहे; पण एकीकडे ‘डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो’ सारखे आजचे देश, तर दुसरीकडे १९९९ पर्यंत ब्रिटिशांच्या ताब्यात राहिलेले हाँगकाँगही आहे. संस्था संरचना उभारणी आणि राजकीय आंदोलने यांच्या परस्परसंबंधांचाही परिणाम या देशांच्या विकासावर झालेला आहे, असे मत डेरॉन यांनी मांडले आहे.

डेरॉन यांनी आपल्या अभ्यासातून देशाच्या समृद्धीसाठी सामाजिक संस्थांचे महत्त्व दाखवून दिले. देशातील सामाजिक-सांस्कृतिक संस्था जितक्या चैतन्यशील व लोकशाही स्वरूपाच्या असतील, तितका तो देश समृद्ध होण्याची शक्यता जास्त असेल. याच अभ्यासाच्या आधारे सोव्हिएत युनियनप्रमाणेच चीनही निरंकुश राजवटीने कोसळेल, असे त्यांनी मत व्यक्त केले. त्यांचा हाच अहवाल अधोरेखित करताना नोबेल अकादमीने म्हटले की, ’ज्या समाजात कायद्याची स्थिती खराब आहे आणि संस्था लोकसंख्येचे शोषण केले जाते, त्या समाजात देशाचा विकास होऊ शकत नाही. डेरॉन यांच्या संशोधनामुळे हे समजण्यास मदत होते‘.

डेरॉन यांनी सहा पुस्तकांचे लेखन केले आहे ꞉ इकॉनॉमिक्स ओरिजिन्स ऑफ डिक्टॅटोरशिप अँड डेमॉक्रसी, २००५; इंट्रोडक्शन टू मॉडर्न इकॉनॉमिक ग्रोथ, २००८; व्हाय नेशन्स फेल : पॉवर, प्रोस्पेरिटी आणि पॉव्हर्टी, २०१२; इकॉनॉमिक्स, २०१४; द सर्च ऑफ यूरोप, २०१५; मॅक्रोइकॉनॉमिक्स, २०१६; द नॅरो कॉरिडॉर : स्टेट्स, सोसायटीज आणि द फेट ऑफ लिबर्टी, २०१९; बियाँड द टेक्लॅश, २०२०; रिडिझायनिंग एआय, २०२१; पॉवर अँड प्रोग्रेस, २०२३: अवर थाउजंड इयर स्ट्रगल ओव्हर टेक्नॉलॉजी अँड प्रोस्पेरिटी, २०२४ इत्यादी.

समीक्षक ꞉ संतोष दास्ताने