बाबी नालंग : (जन्म ८ मे १९३१- मृत्यू २१ नोव्हेंबर २००५). संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते दशावतारी कलावंत. दशावतारी लोककलेत परिवर्तन घडविणारा आणि कोकणचा दशावतारी राजा अशी त्यांची ओळख आहे. पूर्ण नाव शिवराम जयराम परब उर्फ बाबी नालंग. जन्म कोकणातील ओसारगाव येथे. शालेय शिक्षण फक्त नववीपर्यंत. उदरनिर्वाहासाठी सुरुवातीच्या काळात मुंबईत दिवसा नोकरी करून रात्री प्रायोगिक नाटकात काम केले. मात्र कोकणच्या दशावतारी कलेत गुंतलेले त्यांचे मन मुंबईत काही केल्या रमेना. मुंबईला रामराम ठोकून त्यांनी १९५८ सालापासून दशावतारी कलेत स्वतःला झोकून दिले आणि आपल्या अभिनय कौशल्याने श्रीराम, श्रीकृष्ण, विष्णू, लक्ष्मण या भूमिका अजरामर केल्या. त्यांनी साकारलेल्या भूमिकांचा पगडा लोकमानसावर आजही आहे.
बाबी नालंग यांनी दशावतार कलेत अनेक बदल घडवून आणले. पूर्वी दशावताराचा खेळ फक्त सिंधुदूर्ग जिल्ह्यातच जत्रोत्सवात होत असे. बाबी नालंग यांनी इंडियन नॅशनल थिएटरच्या सौजन्याने मुंबईत दशावतारी प्रयोग केले. त्यामुळे दशावतारी कलेला सिंधुदूर्गाबाहेर रसिक मिळाला. दिल्ली इथे दशावताराचा पहिला प्रयोग करण्याचा मानही बाबी नालंग आणि त्यांच्या वालावलकर दशावतारी नाट्य मंडळाला जातो. कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दशावताराच्या स्पर्धा आयोजित करण्यात बाबी नालंग यांचा महत्वाचा वाटा होता. त्यांनी दशावतारी कलेला शासन मान्यता मिळविण्यासाठी अनेक पातळीवर प्रयत्न केले. दशावतारात अनेक नवी आख्याने सादर करणे, नाट्यात समर्पक संगीताचा वापर करणे, आधुनिक रंगभूषा आणि वेशभूषेचा वापर करण्याचे काम त्यांनी केले. दशावतारी कलावंतांसाठी प्रशिक्षणे शिबीरे आयोजित करणे, संयुक्त दशावताराची संकल्पना राबविणे, कलाकारचे राहणीमान उंचविणे यासाठी बाबी नालंग नेहमीच प्रयत्नशील होते. अनेक नवोदित कलावंतांना आपल्या नाट्यमंडळात संधी देऊन कलावंत घडविण्याचे कार्य त्यांनी केले आहे. एका वर्षात ३५/४० दशावतारी खेळ करणाऱ्या मंडळाचे सुमारे २००/२५० खेळ करण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले.
बाबी नालंग यांना महाराष्ट्र शासन, गोवा कला अकादमी यांनी तसेच भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीने (१९९२) पुरस्कार देवून गौरविले आहे. कोकणचा दशावतारी राजा अशी त्यांची लोकमानसात प्रतिमा आहे.