फेस्त : ख्रिस्ती समाजाच्या चर्चमधून होणारा धार्मिक जत्रोत्सव. फेस्त हा मूळ पोर्तुगीज शब्द. त्याचा अर्थ मेजवानी; परंतु चर्चमधील फेस्त या संकल्पनेमागे मेजवानीबरोबरच धार्मिक सोपस्कार, नृत्य-गायनाच्या आणि मनोरंजनाच्या मैफिली,संतपुरुषांच्या नावाने मिरवणूक इत्यादीचा समावेश असतो. काही फेस्ते ही संबंधित चर्चची किंवा चॅपेलची असतात. ज्या विभूतीच्या नावाने चर्च चालविले जाते त्या विभूतीचे ते फेस्त मानले जाते.सर्वच चर्चची फेस्ते साजरी केली जातात; परंतु काही सार्वजनिक स्वरूपाची फेस्तेही असतात. प्रत्येक फेस्तामध्ये नित्योपयोगी वस्तूंचा बाजार भरतो. फेस्ताची आगाऊ सूचना आणि प्रसिध्दी करण्यासाठी पूर्वतयारी म्हणून फाम नावाचा विधी केला जातो.
फेस्ताअगोदर नऊ दिवस खास प्रार्थनासभा होतात. त्याला नोव्हेना असे म्हणतात. प्रार्थनेच्यावेळी गर्नाळ फोडतात. त्याचप्रमाणे घंटानाद केला जातो. त्यावरून चर्चमध्ये चालू असलेल्या विधीची कल्पना आसमंतातील लोकांना येते.
गोव्यातील काही महत्त्वाच्या शहरात असलेल्या चर्चमध्ये मे महिन्यात फेस्ते होतात. त्याला पुरिमेंताचे फेस्त म्हणजे नित्योनयोगी वस्तूंचा साठा करून ठेवायचे फेस्त असे म्हटले जाते. पुढील चार महिने पावसाळा असल्याने सुकी मिर्ची, कांदे, कोकमाची साले आणि आमसुले, सुकी मासळी, मीठ, मसाले, मातीची व धातूची भांडी यांसारख्या वस्तू या फेस्तातून प्रामुख्याने विकल्या जातात. चणे- फुटाणे, वडया, खाजे इत्यादी मिठाई लोक खरेदी करतात. जुने गोवे येथील सेंट झेव्हियरचे, मडगाव येथील मेरी इमॅक्युलेटचे, पणजी येथील मेरी इमॅक्युलेटचे, म्हापसा येथील अवर लेडी ऑफ मिरेकलचे अशी पुरिमेंताची फेस्ते प्रसिध्द आहेत. पूर्वीच्या काळात या फेस्तांमधून फार मोठया प्रमाणात खरेदी- विक्री आणि आर्थिक व्यवहार होत असत. बदलत्या तंत्रज्ञानामुळे जीवनोपयोगी वस्तूंची साठवण करून ठेवण्याची निकड कमी झाल्याने या पुरिमेंताच्या फेस्तांचे महत्त्व कमी झालेले दिसते.
संदर्भ : खेडेकर, विनायक विष्णू ,लोकसरिता गोमंतकीय जनजीवनाचा समग्र अभ्यास, कला अकादेमी, गोवा.